वृषाली जोशी-ढोके
आज मेरे पास घर, गाड़ी, पैसा, धन, अच्छी नौकरी सब कुछ है तुम्हारे पास क्या है? आठवतोय ना हा फेमस डायलॉग आणि त्याच्या पुढचे उत्तर... सगळेचजण आज "रॅट रेस" मध्ये अडकले गेल्यामुळे सुबत्ता आहे परंतु मानसिक शांतता लोप पावलेली दिसतेय. अगदी तीन वर्षाच्या लहान मुलापासून ते ८० वर्षाच्या वयस्कर माणसापर्यंत सगळेच तणावग्रस्त आहेत. लहानपणी शाळा- अभ्यास - मार्क्स याचे टेंशन, तरुणांना नोकरी, टार्गेट, लग्न याचे टेंशन वयाच्या चाळीशी नंतर हेल्थ टेंशन असे एक ना अनेक. या सगळ्यातून मनःशांतीसाठी काय करायला हवे आनंद कुठे आणि कसा मिळवायला हवा याचे देखील टेंशन येते. मनावरचा ताण घालवण्यासाठी आपण रोज किमान ही ३ आसनं करू शकतो.
ताण कमी करण्यासाठी योगासनं..
(Image : google)
१. शवासन- दिसायला अतिशय सोप्पे दिसणारे आसान परंतु तेवढेच परिणाम कारक आणि अवघड आसन असे म्हणु शकतो. यामध्ये पाठीवर झोपून हात व पाय शरीरापासून ४ ते ६ इंच दूर सरकवून मान सोयीस्कर रित्या कलती ठेवायची. डोळे अलगद बंद करून लक्ष श्वासावर केंद्रित करायचे असते. जशी जशी श्वासाची गती कमी होणार आहे तसे तसे शरीर ढिले पडते आणि शरीरा बरोबरच मनावरचा ताण कमी व्हायला मदत होते.
(Image : Google)
२. शशांकासन - वज्रासन या अवस्थेत बसून दोन्ही हात समोरून डोक्यावर उभे ताठ ठेवायचे त्या नंतर सावकाश कंबरेतून खाली वाकत डोकं आणि हात जमिनीवर टेकवून द्यायचे. याआसाना मुळे कमरेची कार्यक्षमता तर वाढतेच परंतु नियमित अभ्यासाने तणावमुक्तीसाठी जास्त फायदा होतो.
(Image : Google)
3. मकरासन - या आसनामध्ये पोटावर झोपून दोन्ही हात डोक्यावर घडी घालून ठेवायचे आणि पायात जास्तीत जास्त अन्तर घेऊन मान सोयीस्कर रित्या डाव्या किंवा उजव्या बाजूला करून डोळे अलगद मिटून घ्यायचे आहेत. संपूर्ण शरीर आणि मनाचा ताण निघून जातो.या सोबत ओंकार, प्राणायाम,ध्यान यांचा नित्य नियमित अभ्यास केला तर ताणतणाव कमी होऊन आनंदी आयुष्य सहजच जगता येईल आणि मेरे पास मनःशांती है असे उत्तर सगळ्याना देता येईल...आनंदाने जगताही येईल..
(लेखिका आयुषमान्य योग आणि वेलनेस ट्रेनर आहेत.)