स्वप्नाली बनसोडे
सुरू केलंत ना १-२-३ मेथड वापरायला? रोज एक बाऊल भाजी, दोन फळांचे तुकडे आणि तीन बाटल्या पाणी पिताय ना? कसं वाटतंय आता? थोडं हलकं वाटतंय की नाही, नुसते कार्ब्जवर कार्ब्ज, पोळी- भात किंवा मधल्या वेळचं खाणं म्हणून चिप्स, मॅगी, बिस्किटं खाण्यापेक्षा? अरे वा, काही जणं हो म्हणतायत. काय म्हणताय? काही जण म्हणतायत, अवघड जातंय रोजच्या रोज भाज्या खायला. आता? तर लॉकडाऊन आहे, तुमच्याकडे वेळच वेळ आहे. हॉटेलचं खाणं आपोआप टळतंय, बाहेरचं संध्याकाळचं टपरी हातगाड्यावरचं खाणं- वडापाव, भजी, मॅगी यावर अघोषित बॅन आहे. तुम्ही मस्त स्वयंपाकघरात प्रयोग करू शकताय, हाताशी स्मार्टफोन आहेत, यू ट्यूब आहे, हजारो ब्लॉग्ज, फेसबुक, इन्स्टाग्राम आहे. करा ना थोडेसे प्रयोग भाज्यांवर, त्याचे सूप्स, स्मूदीज, सॅलडस बनवा, घरच्या तेला- तुपात मस्त पालक- पनीर, मेथी मलाई मटार, भरपूर भाज्या घालून ऑम्लेटस, पास्ते, ब्राऊन ब्रेड सँडविचेस बनवा. म्हणजे भाज्या पण पोटात जातील आणि प्रोटीन्स पण.अहो अगदी अजिबात कार्ब्ज न वापरता, झुकिनी सारख्या भाज्यांचे नूडल्स, कॉलिफ्लॉवर राईस बनवतात लोक, तुम्ही ट्राय तर करून बघा. वेगवेगळ्या डिशच्या रूपाने का होईना, घरात सगळ्यांच्या पोटात भरपूर भाज्या, फळं जाऊ द्या. ( पुरुषांनीही हे करायला हरकत नाही. घरी रोज स्वयंपाक करणाऱ्या आईला/ बहिणीला/ बायकोला पण फार भारी वाटेल, तुम्ही स्वयंपाकात रस घेताय हे पाहून.)
एक, एक मिनिट. तो तो पलीकडचा आवाज काय म्हणतोय? तुम्ही गेले दोन आठवडे मी सांगितलंय म्हणून फक्त एक बाऊल भाजी, दोन फळांचे तुकडे आणि तीन बाटल्या पाणी इतकंच खाताय? आणि यानं तुमचं किलो- दीड किलो वजन कमी झालंय, म्हणून खुश आहात?
अरे देवा, मित्रांनो पण मी असं सांगितलं नव्हतंच. तुमच्या लक्षात आहे ना, मी म्हणले होते, हे फक्त चांगल्या सवयी लावण्यासाठी आहे, हा नवीन डाएटचा प्रकार नव्हे. तुम्ही फक्त हे आणि एवढंच खाल तर वजन कमी होईलही कदाचित पण प्रचंड वीकनेस येईल, चेहरा सुकेल, कुठल्याच कामात मन लागणार नाही, आनंद उत्साह वाटणार नाही. देव न करो, कदाचित खूप अशक्त झाल्यानं सलाईन लावायला दवाखान्यातही ॲडमिट करावं लागेल, कारण तुम्ही तुमच्या गरजेपेक्षा फारच कमी खाताय. नका रे नका असं करू.
पुन्हा एकदा सांगते, 1-2-3 मेथड ही फक्त चांगल्या सवयी लावण्यासाठी आहे. यात तुम्हांला एक भाजी, दोन फळांचे तुकडे आणि तीन बाटल्या पाणी प्यायचंच आहे, पण फक्त एवढंच खायचं नाही. तुम्ही यासोबत जो काही रोजचा आहार भात- पोळी- भाकरी- नाश्ता करताय तो सुरूच ठेवायचाय, फक्त त्या त्या आहारात या भाज्या फळं- पाणी यांचा समावेश करायचाय. हळू हळू तुमच्या लक्षात येईल की, दररोज अशी भरपूर भाजी आणि दोन फळांचे तुकडे खाल्ल्याने , भरपूर पाणी पिल्याने आपण जे मधल्या वेळात पोटात कोंबत होतो, अवेळी भूक लागून चिडचिड होत होती, ती कमी झालीये. थोडीशी कमी भात- पोळी खाऊनही आपलं पोट भरतंय.
असं तुम्हांला जमायला लागलं असेल तर अभिनंदन. या सोबतीनं वजन कमी करण्यासाठी आणखी एक अत्यावश्यक गोष्ट मी तुम्हांला तुमच्या आहारात समाविष्ट करायला शिकवणार आहे.
ती म्हणजे- प्रोटीन. आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात आपल्याला प्रोटीन अर्थातच प्रथिनांची आवश्यकता असते. आपल्या शरीराच्या वाढीसाठी, झीज भरून काढण्यासाठी, स्नायूंच्या निर्मितीसाठी, रोगप्रतिकारक क्षमता तयार करण्यासाठी, उत्तम त्वचा आणि केसांसाठी, दातांच्या बळकटीसाठी, मुख्य म्हणजे तुमच्या दीर्घायुष्यासाठी प्रत्येकाला प्रोटीनची गरज असतेच. विशेष करून वाढत्या वयातली मुले, भरपूर व्यायाम करणारे, ताकदीचे खेळ खेळणारे खेळाडू, गर्भवती महिला, स्तनदा माता, वृद्ध, आजारांमधून बरे होणाऱ्या व्यक्ती (कोविड मधून बरे होणाऱ्या पेशंटला जास्तीतजास्त प्रोटीनयुक्त आहार घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात, हे तुम्ही ऐकलंच असेल ना) अश्या सर्वांना तर सामान्यांपेक्षा जास्त प्रोटिनची गरज असते. साधारणपणे तुमचे सध्याचे किलोग्रॅममधले वजन गुणिले 0.8 असा हिशोब केला तर जे उत्तर येईल तितकं ग्रॅम प्रोटीन दररोज गरजेचे असते. उदा. 70 किलो वजनाच्या व्यक्तीला 70*0.8= 56 ग्रॅम प्रोटीन रोज गरजेचे असते.
आता विचार करा, तुम्ही खाताय का एवढं प्रोटीन दररोज? करा बरं स्वत:च हिशोब. बरं चला ठीक आहे, तेवढं नाही निदान काही ग्रॅम तरी प्रोटीन जातंय का तुमच्या शरीरात? आपण एक सोप्पा टास्क सुरू? करू आता, तुमच्या दिवसभराच्या प्रत्येक खाण्यात किमान एक तरी हिस्सा प्रोटीनचा हवा. काय म्हणता प्रोटीन कशातून मिळतं?- शाकाहारींना दूध, दही, पनीर, चीज, सोया चंक्स, विविध प्रकारच्या डाळी, कडधान्ये,इ. मांसाहारींना तर भरपूर पर्याय आहेत- अंडी, चिकन, मासे, मटण इ. अर्थात हे पदार्थ करताना तेला- तुपाने थबथबलेले करायचे नाहीत. तेल- तूप वापरा पण बेताने, तरच या सगळ्याचा फॅट लॉस या आपल्या अल्टिमेट एम साठी उपयोग होईल. मग करणार ना हा नवीन टास्क सुरू?
(लेखिका अमेरिकािस्थित डाएट आणि फिटनेस एक्सपर्ट आहेत.)
Instagram- the_curly_fit
https://www.facebook.com/fittrwithswapnali