Frequent Muscle Twitches : डोळ्याचं फडफडणं तुम्ही अनेकदा अनुभवलं असेलच, सोबतच कधी कधी स्नायूंचंही फडफडणंही अनुभवलं असेल. तुम्हाला जाणवलं असेल की, अचानक स्नायूंमध्ये हालचाल होते. हे शरीराच्या कोणत्याही भागात होऊ शकतं. तुम्हालाही अनेकदा प्रश्न पडला असेल की, असं का होतं? तर कधी कधी असं होणं सामान्य आहे. पण जर असं अनेकदा होत असेल तर हा एखाद्या आजाराचा संकेत असू शकतो. स्नायूंमध्ये फडफड शरीराच्या कोणत्याही भागात होऊ शकते. पण सगळ्यात जास्त पापण्या, दंड, पाय, बोटं आणि तळपायांमध्ये ही फडफड जाणवते.
स्नायूंमध्ये असं काही झालं तर वेदना होत नाहीत. पण पुन्हा पुन्हा असं झाल्यानं व्यक्तीची चिंता वाढू शकते. अनेकदा ही समस्या तंत्रिका तंत्र म्हणजे नर्वस सिस्टीमशी संबंधित समस्येचा संकेत असू शकते. न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर प्रियंका शेहरावत यांनी स्नायूंमध्ये फडफड होण्याची कारणं सांगितली आहेत. सोबतच यावर काही उपायही सांगितले आहेत.
कॅफीनचं अधिक पिणं
डॉक्टरांनुसार, जास्त चहा, कॉफी, निकोटीनचं सेवन अधिक प्रमाणात केलं तर नर्वस सिस्टीम अधिक उत्तेजित होऊ शकते, ज्यामुळे स्नायूंमध्ये फडफड वाढते. या पदार्थांचं सेवन कमी केलं तर ही समस्या दूर होईल.
तणाव आणि चिंता
जास्त तणाव आणि चिंता केल्यानं नर्वस सिस्टीम जास्त सक्रिय होते, ज्यामुळे स्नायूंमध्ये फडफड किंवा हालचाल होऊ शकते. हे सामान्यपणे पापण्या आणि चेहऱ्यावर अधिक जाणवतं.
पाणी कमी पिणं
स्नायूंनी योग्यपणे काम करण्यासाठी पोटॅशिअम, कॅल्शिअम, सोडिअम आणि मॅग्नेशिअमसारख्या मिनरल्सची गरज असते. पाण्याची कमतरता किंवा मिनरल्समध्ये गडबड झाली तर स्नायूंमध्ये तणाव निर्माण होतो आणि त्यामुळे त्यात फडफडही होते.
कमी झोप
झोप पुरेशी न घेतल्यानं नर्वस सिस्टीमचं संतुलन बिघडतं. ज्यामुळे स्नायूंमध्ये झटके लागल्यासारखं किंवा फडफड झाल्यासारखं वाटतं. त्याशिवाय जास्त एक्सरसाईज केल्यानं किंवा स्नायूंचा जास्त वापर केल्यानं स्नायू थकतात आणि त्यांमध्ये फडफड होते.
काय कराल उपाय?
स्नायूंमध्ये नेहमीच फडफड होत असेल तर काही उपाय तुम्ही करू शकता. यासाठी रोज फिजिकल अॅक्टिविटी करा. रोज किमान अर्धा तास पायी चाला. दिवसातून कमीत कमी ३ लीटर पाणी प्या. कॅफीन, चहा, एनर्जी ड्रिंक्स आणि निकोटीनपासून दूर रहा.