Join us  

2022 मधे कोणते फिटनेस ट्रेण्ड असतील हिट, कोणते आता आउटडेटेड? फिटनेसचे नवे 6 नियम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2021 2:03 PM

New Fitness Rules for 2022: फिटनेस आणि व्यायाम याबाबतीत एकच एक गोष्ट कुरवाळून बसणं आताच्या काळात शक्य नाही. त्यात ओमिक्रॉंनचा वाढता धोका पाहाता 2022 मधे फिटनेसच्या बाबतीतला ट्रेण्ड काय असणार आहे, कोणता फिटनेस रुल ट्रेण्डिग ठरेल हे आधीच जरा पाहून ठेवायला हवं नाही का?

ठळक मुद्दे 15-20 मिनिटं चालणं आणि चालून घाम काढणं या व्यायामाला नेहमीपेक्षा 2022 मधे जरा जास्तच महत्त्व असणार आहे.योग असू देत किंवा सूर्यनमस्कार, दोरीवरच्या उड्या मारणं, स्ट्रेचिंग करणं. असा कोणताही व्यायाम एकतर तो इमारतीच्या गच्चीवर करण्यावर किंवा सोसायटीच्या पार्कमधे मोकळ्या वातावरणात करण्याचा कल असणार आहे.व्हर्च्युअल व्यायाम हा ट्रेण्ड लोकप्रिय होणार आहे. जमेल त्या दिवशी घरुन आणि जमेल त्या दिवशी प्रत्यक्ष जिम आणि क्लासमधे जाऊन व्यायाम करणं आणि आपला व्यायाम विशिष्ट कारणामुळे करायचा राहिला नाही याचं समाधान मिळवणं या नवीन ट्रेण्डमुळे शक्य होणार आहे.

New Fitness Rules for 2022: नवीन वर्षात स्वत:साठी काहीतरी नवीनचा शोध घेतला जातो. नवीन वर्षात फिटनेस संदर्भात नवीन संकल्प करण्याचे आणि ते संकल्प नवीन वर्षाचा पहिला महिना संपण्याआधीच विरल्याचा अनुभव आपण प्रत्येकानं घेतला आहे. त्यामुळे फिटनेससाठी नवीन संकल्प करण्यआधी आपल्यासाठी एकूणच परिस्थितीचा विचार करता नवीन वर्षात फिटनेससाठी काय उपलब्ध असणार आहे याचा कानोसा घेणं आवश्यक आहे. कारण 2019 च्या डिसेंबरमधे कोरोनानं घातलेला वेढा 2020मधे घट्ट होता तो 2021 च्या शेवटी शेवटी थोडा थोडा सैलावल्यासारखा झाला तोच ओमिक्रॉननं जगभर हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. त्यामुळे 2022मधे फिटनेसपासून पर्यटनापर्यंत सर्व गोष्टी मनमोकळ्या करायला मिळतील ही अपेक्ष आताच बाळगणं आणि त्यानुसार पूर्ण वर्षभराचं नियोजन करणं थोडं धाडसाचं ठरणार आहे. त्यामुळे येत्या वर्षासाठी निर्धाराची भाषा करण्यापेक्षा कानोसा घेऊन काय शक्य आहे, काय उपलब्ध असणार आहे हे बघणं गरजेचं आहे.

Image: Google

2019 पेक्षाही 2020 -21 मधे आपलं आरोग्य चांगलं असेल तरच आपला कोरोनासारख्या विषाणुंच्या संसर्गाच्या परिस्थितीत निभाव लागणं शक्य आहे हे लक्षात आलं आहे. आरोग्य राखणं हे औषधं घेऊन राखलं जात नाही तर त्यासाठी व्यायाम आणि त्याला संतुलित आणि पौष्टिक आहाराची जोड दिली तरच शक्य आहे. याचीही खात्री पटली आहे. त्यामुळे व्यायाम हा जगभरात बहुतांशाच्या दिनचर्येतला महत्त्वाचा भाग झाला आहे. कामाच्या बाबतीत काटेकोर असलेलेही एखादं काम नंतर करु आधी व्यायाम महत्त्वाचा म्हणत व्यायामाला महत्त्व देऊ लागले आहे. असा हा जीवनावश्यक झालेला व्यायाम 2022 मधे आपण कसा करु, नेहमीच्या व्यायामपध्दतीत आपण काय बदल करु शकू हे समजावून घेणं गरजेचं आहे.

Image: Google

पूर्वी वर्ष बदललं तरी मूलभूत गोष्टींमधे फार काही बदल व्हायचा नाही. म्हणजे व्यायाम म्हणून रोज चालायला जाणारे नवीन वर्ष लागलं तरी चालायलाच जायचे. त्यापुढच्या काळातही ते चालण्याचा आपला नित्यनेम चालू ठेवायचे. सलवार आणि कुर्ता घालणं आवडणार्‍याही नवीन वर्षात स्वत:साठी आवडीप्रमाणे सलवार कुर्तीच घ्यायचे. पण आता तसं राहिलं नाही. आता आपल्या जगण्यावर बदलणारा ट्रेण्ड प्रभाव टाकतो, किंबहुना बदलणार्‍या ट्रेण्डनुसार आपण वागलो नाही तर मग आपण आउटडेट ठरु हे आजच्या काळातल्या आजी आजोबांना देखील माहीत असतं. ते आपल्या नातवांच्या बदललेल्या सवयी बघून , ‘ हं हा काय नवीन ट्रेण्ड वाटतं!’ असं कौतुकानं विचारताना दिसतात. जे शक्य आहे ते ट्रेण्डनुसार करण्याचा प्रयत्न करतात.   त्यामुळे फिटनेस आणि व्यायाम याबाबतीत एकच एक गोष्ट कुरवाळून बसणं आताच्या काळात शक्य नाही. त्यात ओमिक्रॉंनचा वाढता धोका पाहाता 2022 मधे फिटनेसच्या बाबतीतला ट्रेण्ड काय असणार आहे, कोणता फिटनेस रुल ट्रेण्डिग ठरेल हे आधीच जरा पाहून ठेवायला हवं नाही का?

2022 मध्ये कोणत्या फिटनेस रुल असणार ट्रेण्ड

Image: Google

1.  चालणं

चालणं या व्यायामाला खूप जुन्या पिढ्यांपासून महत्त्व असून ते महत्त्व गेल्या काही वर्षात वाढलं आहे. चालण्याला पूर्वी सर्वांगिण व्यायाम समजला जायचा आताही इतर कुठला व्यायाम करणं शक्य नसेल ना मग फक्त पाऊण तास चाला/ रोज किमान 3 कि.मी चाला असा सल्ला मुलांपासून वृध्दांपर्यंत आरोग्यतज्ज्ञ आणि फिटनेस तज्ज्ञ देताना दिसतात. 2022 मधे चालणं या व्यायामाचा ट्रेण्ड जगभर दिसणार आहे. कारण हा व्यायाम करताना कोणत्याही व्यायामाच्या साधनांची ,विशिष्ट कपड्यांची गरज नसते. फुकटात होणारा हा मोलाचा व्यायाम आहे. येतं वर्ष आर्थिकदृष्ट्या आपल्यासाठी कोणती आव्हानं घेऊन येणार हे माहीत नसल्यानं चालणं हा व्यायाम सगळ्यांना परवडणारा आणि आरोग्यास लाभ मिळवून देणारा आहे. व्यायामाचा कोणताही संकल्प पाळला जात नसेल तर हा संकल्प सवयीत उतरण्यासाठी सोप्या व्यायामापासून सुरुवात करा असं तज्ज्ञ म्हणतात. चालणं हा मनाला आनंद, शरीराला ऊर्जा देणारा, घराबाहेर पडण्याची, इतरांशी ओळखपाळख होण्याची संधी देणारा व्यायाम आहे. त्यामुळे घराबाहेर पडून विशिष्ट लयीत आणि गतीत किमान 15-20 मिनिटं चालणं आणि चालून घाम काढणं या व्यायामाला नेहमीपेक्षा 2022 मधे जरा जास्तच महत्त्व असणार आहे हे नक्की!

Image: Google

2. मोकळ्या वातावरणात व्यायाम

कोरोनामुळे जिम बंद, योगचे क्लासेस बंद त्यामुळे व्यायाम बंद हे अनेकांच्या बाबतीत सुरुवातीला घडलं. मग त्यावर उपाय म्हणून घरातल्या घरात व्यायाम हा पर्याय अनेकांनी शोधला. पण घरात व्यायाम करुन शरीर आणि मनाला जो ताजेपणा आणि उत्साह हवा तो मात्र मिळत नाही अशी तक्रार अनेकांची आहे. त्यामुळे 2022मधे जो व्यायाम आपण घरात, चार भिंतीच्या आत करत होतो , तोच व्यायाम बाहेर जाऊन करण्याचा ट्रेण्ड असणार आहे. योग असू देत, सूर्यनमस्कार असू देत, दोरीवरच्या उड्या मारणं, स्ट्रेचिंग असा कोणताही व्यायाम असू देत एकतर तो इमारतीच्या गच्चीवर करण्यावर किंवा सोसायटीच्या पार्कमधे मोकळ्या वातावरणात करण्याचा कल असणार आहे. यामुळे किमान मोकळा श्वास, ताजी हवा घेण्याची संधी मिळेल असा विचार वाढेल. व्यायाम हा आरोग्यासाठी फायदेशीरच असतो, तो मोकळ्या वातावरणात केल्याने त्याचा फुप्फुसांच्या आरोग्याला फायदाच होणार आहे , हा विचार ठेवून जगभरात मोकळ्या वातावरणात व्यायाम हा ट्रेण्ड 2022 मधे हिट असेल.

Image: Google

3. आभासी व्यायाम

कोरोनानं बराच काळ बाहेर जावून आपला दिनक्रम पाळणं अवघड होतं आणि अजूनही आहे. कोरोनामुळे लोकांन वर्क फ्रॉम होम करण्याची वेळ आली. आधी हे कसं साध्य होईल याची चिंता असणारे आता झूम, गुगल मीट याद्वारे ऑफिसचं काम घरुन करायला सरावले आहेत. आता अनेकजण आठवड्यातले 3 दिवस ऑफिसला जातात आणि 3 दिवस घरुन काम करतात. जीममधे जाऊन व्यायाम करण्याची सवय असणार्‍यांमधे हा व्हर्च्युअल व्यायाम करण्याचा ट्रेण्ड 2022 मधे लोकप्रिय होणार आहे. आठवड्यातले 3 दिवस शिस्तीत जिममधे जाऊन व्यायाम करायचा आणि 3 दिवस घरात जमेल त्यावेळी, घरातल्या जमेल त्या खोलीत व्यायाम करणं शक्य होणार आहे. आभासी व्यायामामुळे व्यायामाच्या पध्दतीत लवचिकता येणार आहे. रोज कामाचं स्वरुप बदलत असणार्‍यांसाठी जिमची , योग क्लासेसची विशिष्ट वेळ पाळणं, विशिष्ट जागा गाठणं शक्य होत नाही. मग त्यांचा व्यायाम करायचा राहून जातो. आता 2022 मधे व्हर्च्युअल व्यायाम हा ट्रेण्ड लोकप्रिय होणार आहे. जमेल त्या दिवशी घरुन आणि जमेल त्या दिवशी प्रत्यक्ष जिम आणि क्लासमधे जाऊन व्यायाम करणं आणि आपला व्यायाम विशिष्ट कारणामुळे करायचा राहिला नाही याचं समाधान मिळवणं या नवीन ट्रेण्डमुळे शक्य होणार आहे.

Image: Google

4. फिटनेस अँपचा उपयोग करुन व्यायाम

व्यायाम करताना फिटनेस अँप वापरणं , स्मार्ट साधनं वापरणं याची सुरुवात काही वर्षांपासून झाली होती. पण हे अँप्स विशिष्ट आरोग्यविषयक समस्या असणारे, आपल्या स्लिम ट्रिम फिगरबाबत जास्तच सजग असणार्‍या तरुणी, महिला वापरतात असा समज होतात. फिटनेस अँप वापरताना लोकांमधे बॉडी पॉझिव्हिटी नव्हती. त्यामुळे जाडजूड बायकांना हातात फिटनेस बॅण्ड बांधून चालणं अवघडल्यासारखं व्हायचं. पण आता आपला रंग, आपल्या शरीराचा आकार, आपली उंची हे आपलं वैशिष्ट्य आहे, या सकारात्मक दृष्टिकोनातून बघण्याची मानसिकता वाढली आहे. फिटनेस अँप हे केवळ फिगरसाठी नाही तर फिटनेससाठी वापरण्याचं प्रमाण 2022 मधे वाढणार आहे.

Image: Google

5. बायकांसाठीची जिम

जिममधे केवळ पुरुषांसाठी, केवळ महिलांसाठी जिम असा प्रकार अजून रुढ नाही. महिला या पुरुष इंस्ट्रक्टर आणि पुरुष येणार्‍या जिममधेच जातात. महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणं, त्यासाठी वेळ काढून व्यायाम करणं ही बाब गेल्या काही काळापासून वाढते आहे. अनेक महिला, तरुणी फिटनेससाठी जिममधे जातात. पण तिथे पुरुष इंस्ट्रक्टर असेल किंवा आजूबाजूला पुरुष असतील तर विशिष्ट कपडे घालून विशिष्ट व्यायाम करायला लाजतात, आपल्याला येणार्‍या अडचणी या लाजेमुळे सांगूच शकत नाही. त्यामुळे काही काळ जिममधे व्यायाम केल्यानंतर त्या जिममधे जाईनाशा होतात. पण जिममधे जाऊन व्यायाम करण्याची आवड आणि गरज महिलांनाही असते, तिथे त्यांना कोणत्याही संकोचाशिवाय व्यायाम करता आला तर त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला फायदा होणार आहे. याचा विचार करुन महिलांसाठी असलेल्या जिमममधे, महिला इंस्ट्रक्टर असलेल्या जिममधे जाऊन व्यायाम करण्याचा ट्रेण्ड 2022 मधे हिट असेल.

Image: Google

6. होम जिम

ज्यांना जिममधे जाऊन , जिममधील विशिष्ट साधनांचा वापर करुन व्यायाम केल्याशिवाय चैन पडत नाही. पण परत मुद्दा हा वेळेचाच आहे. काम आणि वेळ यात सांगड घालताना बर्‍याचदा बळी हा व्यायामाचा जातो. पण काम झाल्यानंतर जिममधे व्यायाम करण्याची सोय असत नाही. तसेच जिममधे येणार्‍यांची संख्याही यापुढे वाढणार आहे , त्यामुळे आपल्या सोयीच्या वेळेत जिमला जाता येईल, जिममधे गेल्यावर व्यायामाची साधनं आपल्यासाठी लगेच उपलब्ध होतील असं नाही. त्यामुळे जर आपलं घर मोठं असेल, आपल्या आरोग्यासाठी खर्च करण्याची तयारी असेल तर यापुढच्या काळात घरातच जिमची विशिष्ट साधनं आणून व्यायाम करण्यावर अर्थातच होम जिम आणि फिटनेस असा फिटेनेस रुल 2022 मधे  ट्रेण्ड असणार आहे.

टॅग्स :फिटनेस टिप्स