निकिता बॅनर्जी
..आता बास ! गेल्या वर्षांत झालं ते झालं नव्या वर्षात बदलून टाकणार लाइफस्टाइल! जान है तो जहां है, तब्येत महत्त्वाची. लवकर जेवायचं, वेळेवर जेवायचं, जंक फूड खायचं नाही, व्यायाम करायचा. असं वर्ष संपता संपता तुम्हालाही वाटतं ना? पण दरवर्षी नव्याचे नऊ दिवस. हे संकल्प टिकत नाहीत आणि पुन्हा तेच रुटीन सुरू !
असं कशानं होतं विचार केलाय?
तुम्ही म्हणालं, आळस दुसरं काय?
तर आळस हे या समस्येचं उत्तर नाही. उत्तर आहे, गरज.
म्हणजे साधं उदा. जर पहाटे ४ वाजताची गाडी पकडायची असेल तर आपण लवकर उठतोच. गजर होण्यापूर्वी जाग येते. याचं कारण लवकर उठणं हे आपलं ध्येय नसतं तर गाडी पकडणं हे ध्येय असतं, तीच गरज असते.
तसंच आपला फिटनेस, व्यायाम, शिस्त यासाऱ्यांची आपल्याला गरज काय आहे, असा प्रश्न स्वत:ला विचारून उत्तर द्या. तरच हे सारं सुरळीत सुरू होईल!
पण गरज काय आहे?
यादी करा की मुळात आपली गरज काय आहे?
१. का तुम्हाला वजन कमी करायचं आहे? कमी म्हणजे किती कमी आणि साधारण किती वर्षांत किती कमी करायचं आहे?
२. का सकाळी लवकर उठून व्यायाम करायचा आहे? व्यायाम कशासाठी? फिटनेस म्हणजे तुमचं नक्की ध्येय काय आहे?
३. चांगलंचुंगलं डाएट करायचं काय? पण कशाला- तब्येतीसाठी तुम्हाला महत्त्वाचं काय वाटतं?
४. केस गळणे ते विविध आजार, तुम्हाला छळत असतील तर ते का छळतात? कारणं आणि उपाय काय?
५. तुम्हाला येत्या वर्षाखेरीस नक्की स्वत:ला कसं पहायचं आहे?
६. ऑफिसात एक्सेल शिटमध्ये मंथली प्लॅन करता, डेडलाइन ठरवता तसा प्लॅन आखा. बघा जमतंय का?
७. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कमी गोष्टी ठरवा. रोज एकच गोष्ट नीट करु असं ठरवा. एकदम आयुष्य बदलायला जाऊ नका.
८. सातत्य हे महत्वाचं सूत्र विसरलं नाही तर आपण पुढच्या वर्षी जे जे मनात आहे ते ते नक्की करु.