Lokmat Sakhi >Fitness > ना घराबाहेर जायची गरज ना जीमची;  घरच्याघरी करता येतील असे सोपे सुटसुटीत व्यायाम

ना घराबाहेर जायची गरज ना जीमची;  घरच्याघरी करता येतील असे सोपे सुटसुटीत व्यायाम

आता जीमला जाता येत नाही, बाहेर चालायला जायचीही परवानगी नाही तर काय करणार? कसा करणार? व्यायाम? त्याचं हे उत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 05:34 PM2021-05-05T17:34:45+5:302021-05-05T17:38:53+5:30

आता जीमला जाता येत नाही, बाहेर चालायला जायचीही परवानगी नाही तर काय करणार? कसा करणार? व्यायाम? त्याचं हे उत्तर

No need to go out , no gym; Simple and easy exercises that can be done at home in corona lockdown | ना घराबाहेर जायची गरज ना जीमची;  घरच्याघरी करता येतील असे सोपे सुटसुटीत व्यायाम

ना घराबाहेर जायची गरज ना जीमची;  घरच्याघरी करता येतील असे सोपे सुटसुटीत व्यायाम

 

प्राची पाठक

व्यायाम हा एक गुळगुळीत झालेला शब्द आहे. व्यायामाचं नाव काढलं की एखादा "कधीही पूर्ण न झालेला संकल्प" अशीच माहिती आपण या शब्दाला जोडून ठेवली आहे. त्यामुळे व्यायाम म्हटलं की एक तर अपूर्ण संकल्पांचे जोक्स सुरू होतात. कोरोना पूर्व काळात तर कधी एकदा जीम लावू असं व्हायचं. पण कधी आपलं आणि जिमचं टायमिंग जुळून येत नसे. मग परत दांड्या. अचानक व्यायामाचं भूत डोक्यावर बसल्याने आणि एकदम जास्तीचा व्यायाम सुरू केल्याने चार आठ दिवसांतच तो सगळा प्रकार अत्यंत दमवणारा आणि रटाळ होऊन जायचा. आपल्याला त्यात काही इंटरेस्ट उरत नसे.

मग आला कोरोनाकाळ, आता घरातच बसलो, बाहेर जाताच येत नाही तर काय व्यायाम करणार?

असा पुढचा प्रश्न.

या सगळ्या सीनमध्ये अधून मधून "योगा", सूर्य नमस्कार, प्राणायाम वगैरे देखील ट्राय करून झालेलं असतं. ते करुन काही आपण फिट होते? नाही,वजन कमी होते? नाही असं स्वत:लाच सांगितलं जातं. कोणी म्हणतं, गाई गुरं कुठे व्यायाम करतात? व्यायाम हे तर माणसांचं फॅड आहे. कोणी म्हणतं आमच्या वेळी कुठे असे जिम होते? गेलंच ना आमचं आयुष्य? ह्या सगळ्या मतांवर देखील बरा टाईमपास होऊन जातो. व्यायाम परत मागे पडतो. ते भूत कुठेतरी गायब होऊन जातं.

सगळ्यांची व्यायामाची गाडी अशीच कुठेतरी अडकलेली असते. एकदम खूप काही सुरू करायचं किंवा काहीच करायचं नाही. बराचसा काळ तर मनातच मांडे खाण्यात गेलेला असतो. व्यायाम करू- करू, असा.

त्यापेक्षा आपली लाइफस्टाइल आपण थोडी लक्षात घेतली तर? आपण उठतो केंव्हा, झोपतो केंव्हा, कितीवेळ झोपतो, दिवसातून किती वेळा आणि काय खातो, असे प्रश्न स्वतःलाच विचारायचे. आपला दिवसातला किती वेळ बैठं काम करण्यात, मोबाईल, टॅब हातात घेऊन बसण्यात जातो? शरीराची काही हालचाल होईल, अशी किती कामं आपण दिवसभरात करतो?  दिवसभर आपण किती धावपळ करतो, हे सर्व जीवनशैलीशी संबंधित प्रश्न स्वतःलाच विचारायचे. त्यातून आपलं एक हेल्थ प्रोफाइल तयार होईल. एक रेकॉर्ड बनेल.

व्यायामासाठी नेहमीच महागड्या जिमला जायची गरज नसते. आपण लहान सहान गोष्टींतून शरीर हालचाली करत काही गेम्स, काही ऍक्टिव्हिटीज ह्यांच्या माध्यमातून व्यायामाची सवय स्वतःला लावू शकतो.

 घरच्या घरी काही व्यायाम प्रकार सुरू करू शकतो.

पिंग पॉंग हा खेळ, म्हणजे एखादा लहानसा चेंडू टेबल टेनिस सारखा भिंतीवर खेळायचा. कोणाला आवाजाचा त्रास होऊ नाही, म्हणून चक्क हलका, छोटासा चेंडू घ्यायचा आणि भिंतीवर टेबल टेनिस खेळतोय अशा प्रकारे खेळायचा. त्याने कमरेचा, हाता पायांचा खूपच छान व्यायाम होतो. एखाद दोन गाणी हेडफोनवर ऐकत देखील हा व्यायाम करता येतो. 

दिवसातून दहा दहा मिनिटांचे ब्रेक घेत असा व्यायाम चार, सहा वेळा करता येतो.

घरात, घराबाहेर एखादा कापडी हँगिंग बॉल टांगून ठेवून त्यावर व्यायाम सुरू करता येतो.

  किक बॉक्सिंग घरीच सुरू करता येतं. ती बॅग देखील घरीच बनवून घेता येते. 

आपल्याला आवडतील आणि कुठेही खेळता येतील, विशेष आवाज होणार नाही, इतरांना त्रास होणार नाही, असे खेळ खेळत व्यायामाला सुरुवात करता येते. 

व्यायाम व्यायाम म्हणून न करता शारीर हालचाली वेगात होतील, अशा गेम्सच्या माध्यमातून सुरू करता येतो. हळूहळू वेळ वाढवत नेता येतो. 

त्यात गेम्स खेळायच्या आधी, मधल्या वेळात काही वॉर्म अप प्रकार, रनिंग वगैरे जोडत जाता येतं.

एकट्याने बॅडमिंटन खेळून बघा. दोन्ही हातात दोन रॅकेट्स घेऊन आपणच खेळायचं. जाम घाम निघेल. 

तसंच एखादी डिश, एखादी रिंग हवेत उडवत खेळता येतं. एकातून अनेक छोटे मोठे गेम्स आपले आपल्याला सापडत जातात. ते खेळायच्या निमित्ताने आपण बसून राहणं कमी करतो. शरीर हालचाली सुरू करतो. हळूहळू त्यात इतर मुख्य व्यायाम प्रकार जोडत जाता येतात. व्यायामाचा कंटाळा येत नाही. तासंतास आपण ह्या गेम्समध्ये रमून जातो, ते वेगळंच. हे गेम्स घरच्या घरी तयार करता येऊ शकतात. अमुक गोष्ट विकत मिळाली, तरच माझं तमुक सुरू होईल, असं अडून बसायची गरज नसते. आपला स्टॅमिना वाढत गेला की रेग्युलर व्यायाम करायला, शिकायला आपल्याला आवडायला लागतं, हा फायदाही असतोच.

तर, व्यायाम व्यायाम असा बाऊ न करता जे आपल्या घरात, हातात असेल, त्यापासून सुरुवात करायची. एकात एक अशा अनेक शरीर हालचाली त्यात जोडत जायचं. त्यातून उत्साह वाढतो. तो वाढला की व्यायाम आपोआपच होत जातो.

Web Title: No need to go out , no gym; Simple and easy exercises that can be done at home in corona lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.