आपण व्यायाम करायला सुरुवात केली की साधारणपणे आपले पोट कमी होण्यासाठी, कंबरेचा भाग कमी होण्यासाठी किंवा आणखी कशासाठी प्रयत्न करतो. त्यादृष्टीने आपण व्यायामाला सुरुवातही करतो. पण आपल्या पायांकडे मात्र आपण म्हणावे तितके लक्ष देत नाही. अनेकदा आपले पाय सतत उभे राहून किंवा सतत खुर्चीत लोंबकळत राहिल्याने खूप दुखतात. दिवसभर आपण ज्या पायांच्या जोरावर इकडेतिकडे धावाधाव करत असतो ते पाय अचानक गळून गेल्यासारखे होतात. त्यातले बळ जाते. त्यामुळे पायांकडे दुर्लक्ष न करता ते मजबूत राहतील यासाठी योग्य पद्धतीने व्यायाम करायला हवा. पाहूयात पायांच्या मजबूतीसाठी करायला हवीत अशी आसने....
१. बद्धकोनासन
ताठ बसून दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून एकमेकांच्या जवळ घ्या. दोन्ही पावले एकमेकांना जोडली की तुम्हाला मांडीच्या आतल्या भागाला ताण पडल्यासारखे वाटेल. आपल्या शरीराला झेपेल तेवढेच करा, जास्तीचा ताण देऊ नका. याठिकाणी हळूवार श्वास घेऊन श्वास सोडा. आपले पाय, मांड्या, गुडघे जमिनीला टेकलेले राहतील असा प्रयत्न करा. किमान ५ आकड्यांपर्यंत हा व्यायाम करा. मग ब्रेक घेऊन पुन्हा ५ आकड्यांपर्यंत करा. यामुळे पायाचे स्नायू ताणले जाऊन पायातील ताकद वाढायला मदत होईल.
२. मलासन
दोन्ही पायांमध्ये खांद्यापेक्षा थोडे जास्त अंतर घ्या. श्वास सोडून दोन्ही पायांवर आहेत त्याच स्थितीत खाली बसा. यावेळी आपली पाठ ताठ राहील याकडे लक्ष द्या. यामध्ये आपल्या नडगीवर आणि पोटऱ्यांवर ताण पडेल. याच पद्धतीने वर उठा. पुन्हा खाली बसा. असे काही वेळा केल्याने पायातील ताकद वाढण्यास मदत होईल.
३. पार्श्वकोनासन
दोन्ही पायांमध्ये ३.५ ते ४ फूट अंतर घ्या. एक पाय गुडघ्यात वाकवून त्याबाजूला कमरेतून खाली जा. हाताचा पंजा पायाच्या तळव्याच्या शेजारी टेकलेला ठेवा. पाय, हात आणि खांदा एका रेषेत सरळ राहतील असे पाहा. दुसरा हात वरच्या दिशेला सरळ घेऊन त्याकडे पाहा. या स्थितीत १० आकड्यांपर्यंत थांबू शकू असा प्रयत्न करा.