सगळ्यांच्या वेळा सांभाळताना अनेक महिलांना त्यांच्या स्वत:च्या तब्येतीकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही. सकाळचा किंवा सायंकाळचा एक तास जीमसाठी देणं अनेकींसाठी खरोखरच अगदी अशक्य असतं. कारण आपलं आणि सगळ्या घरादाराचं सगळं काही सुरळीत चालावं, यासाठी एक तास जीममध्ये घालविण्यापेक्षा घरकामात घालविणे अनेकींना अधिक श्रेयस्कर वाटते. म्हणूनच जर तुम्हालाही रोजच्या रूटीनमधून जीमसाठी वेळ काढणे शक्य नसेल, किंवा सध्या कोरोनामुळे जीममध्ये जाणे असुरक्षित वाटत असेल, तर किमान १५ मिनिटे स्वत:साठी द्या. घरातल्या घरात दोरीवरच्या उड्या मारा आणि आरोग्यासाठी अनेक फायदे मिळवा.
दोरीवरच्या उड्या मारण्याचे फायदे..
१. दोरीवरच्या उड्या हा एक सर्वोत्तम व्यायाम आहे. कारण यामुळे शरीराच्या सर्व अवयवांचा व्यायाम होतो. वेगवेगळ्या अवयवांचे स्ट्रेचिंग उत्तम पद्धतीने होते.
२. दोरीवरच्या उड्या मारताना दोरी आणि पाय यांचा समतोल राखणे खूप गरजेचे असते. त्यामुळे एकाग्रता वाढते.
३. दोरीवरच्या उड्या मारल्यामुळे शरीरातील अतिरिक्त कॅलरीज बर्न होण्यास खूप मदत होते.
४. दोरीवरच्या उड्या मारताना संपूर्ण शरीर एका वेगवान लयीमध्ये आलेले असते. यामुळे हृदयाचाही खूपच चांगला व्यायाम होतो. ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.
५. उडी मारताना, आपले हात, पाय, पोट, मान या प्रत्येकाची काही ना काही हालचाल होत असते. त्यामुळे हात आणि पायांच्या स्नायूंना बळकटी मिळते.
६. परफेक्ट बॉडी टोनिंग होऊन शरीराला सुडौल आकार देण्यासाठी दोरीवरच्या उड्या प्रभावी ठरतात.
७. सगळ्या शरीरात उत्तम पद्धतीने ब्लड सर्क्युलेशन होण्यासाठी दोरीवरच्या उड्या मारल्याने खूप फायदा होतो. रक्तवाहिन्यांची ऑक्सिजन धरून ठेवण्याची क्षमता वाढत जाते.
८. बॉडी डिटॉक्सिकेशनसाठी दोरीवरच्या उड्या हा एक मस्त आणि स्वस्त उपाय आहे. दोरीवरच्या उड्या १५ मिनिटे जरी मारल्या तरी आपल्याला दरदरून घाम येतो. घामावाटे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात. त्यामुळे बॉडी डिटॉक्स तर होतेच, त्वचाही सुंदर आणि तजेलदार होऊ लागते.
हे ही लक्षात ठेवा
- जेवण केल्यानंतर चार तास दोरीवरच्या उड्या मारू नयेत.
- दोरवरच्या उड्या मारल्यानंतर एक तास जेवण करू नये.
- सकाळी पोट साफ झाल्यानंतर अनायसेपोटी दोरीवरच्या उड्या मारणे अधिक श्रेयस्कर.