व्यायाम तर करायचा असतो, पण प्रत्यक्ष वेळ आली की मात्र आपण टाळाटाळ करू लागतो.. त्यात आता उन्हाळ्याच्या दिवसात तर खूपच घामघाम होत असल्याने व्यायाम अगदी नकोसाच वाटतो. उन्हाळा, पावसाळा असो किंवा मग हिवाळा.. व्यायाम न करण्यासठी अगदी कोणतंही कारण पुरेसं ठरतं. व्यायाम न करण्याचे दुष्परिणाम कळतात, पण तरीही त्यात सारखा खंड पडतो. असं होऊ नये, म्हणूनच तर नेमकं मानसशास्त्रात (8 psycological tips for motivation) काय उपाय सांगितले आहेत, ते वाचा आणि करून बघा..
व्यायामाचा कंटाळा येऊ नये म्हणून...
१. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही व्यायाम का केला पाहिजे, याची कारणं एका कागदावर लिहून ठेवा आणि ती सतत स्वत:ला सांगत रहा.. वजन वाढणं, धाप लागणं, उर्जा कमी होणं, थकवा, अशक्तपणा, बीपी, शुगर, हार्ट प्रॉब्लेम असे काही ना काही कारणं असतातच. ती कारण स्वत:ला वारंवार सांगितली की आपल्याला त्याचे गांभिर्य हळूहळू समजू लागते.
२. व्यायाम करण्यासाठी कुणाची तरी सोबत शोधा किंवा मग जीम, योगा क्लास, झुंबा क्लास जॉईन करा. कारण मानसशास्त्रानुसार मित्र, कुटूंब यांच्यासोबत व्यायाम केल्यामुळे उत्साह येतो. तसेच एकट्याने व्यायाम केला तर लवकरच माणूस कंटाळतो.
३. स्वत:साठी व्यायामाचे कपडे, शुज, जीम बॅग अशा काहीतरी ॲक्सेसरीज विकत घ्या, ज्या तुम्हाला व्यायाम करताना दररोज उपयोगी पडतील. आणि त्या गोष्टी घेतल्या की स्वत:ला रोज त्याबाबत बजावून सांगा...थोडे पैसे खर्च केले की माणूस आपोआपच त्याबाबत गंभीर होतो.
४. व्यायामाची एक वेळ निश्चित करा आणि ती वेळ फाॅलो करा. काहीही झालं तरी त्या वेळेला व्यायाम करणं टाळू नका. असं नियमित केल्याने १५- २० दिवसांतच शरीराला व्यायामाची सवय लागते. मानसशास्त्रानुसार व्यायामाची सवय लागण्यासाठी संध्याकाळपेक्षा सकाळची वेळ अधिक उपयुक्त ठरते.
५. तुम्हाला जो व्यायाम आवडेल, त्या हलक्याफुलक्या व्यायामाने सुरुवात करा. सुरुवातीलाच अवघड व्यायाम करायला मुळीच जाऊ नका. यामुळे व्यायामाचा सगळा उत्साहच जातो.
६. तसेच सुरुवातीला व्यायामाची वेळही अगदी कमी ठेवा. सुरुवातीला मोजके ७ ते ८ मिनिटं व्यायाम करा.. २- ३ दिवसांतच तुम्हाला व्यायामाची वेळ वाढवावी, असं स्वत:हून वाटू लागेल.
७. संगीत ऐकत व्यायाम करा.. जे तुम्हाला आवडेल, ते संगीत ऐका, पण ऐका. कारण व्यायाम करताना संगीताच्या बिट्स नक्कीच तुमचा उत्साह वाढविण्याचा प्रयत्न करतात.
८. स्वत:ला काहीतरी ध्येय दाखवा.. एवढे दिवस व्यायाम केला तर मी स्वत:साठी अमूक गोष्ट विकत घेईल किंवा मग अमूक अमूक किलोने वजन कमी झाले, तर मी स्वत:साठी काहीतरी करेल, असे स्वत:च स्वत:साठी एखादे ध्येय ठरवा.