निकिता बॅनर्जी (पोषणतज्ज्ञ)
वाढलेल्या वजनाचं करायचं काय? वजन हा बायकांच्या दृष्टीने तसा नाजूक विषय असतो. कुणीही कधीही भेटल्या की डाएट, वाढलेलं वजन, छळणारी दुखणी हा विषय निघतोच. डाएट करण्या न करण्यावरून अतिशय जेंडर बायस जोकही केले जातात. वजन कमी करण्यासाठी अनेकजणी प्रयत्नही करतात. काहीतर अत्यंत कठोर डाएट करतात. नव्या रिलप्रेमी जगात हे खा आणि ते खाऊ नका, इतके तास खा, तितके पदार्थ कायमचे बंद करा असे सल्ले मिळतात. त्यातलं काय खोटं-काय खरं कळत नाही.
त्यातही अजून एक प्रश्न घरोघरी बायकांना पडतो. इतरांचं डाएट, आवडीनिवडी जपताना स्वत:साठी स्पेशल डाएट करणं, काही वेगळं करून खाणं, वेळा अचूक सांभाळणं हे त्यांना शक्यच होत नाही. ठरल्यावेळी ठरलेला पौष्टिक पदार्थ कुणीही त्यांच्या हातात आणून देत नाही. आणि स्वत:ला कायमच कमी महत्त्व देण्याच्या सवयीत महिलांचं वजन वाढतं, हिमोग्लोबिन कमी होतं. त्यात पाळी येणे ते रजोनिवृत्ती या टप्प्यात अनेक हार्मोन बदलही वजनवाढीस पूरक ठरतात.
व्यायामाला वेळ तर मिळतच नाही इतका कामाचा थकवा छळतो. परिणाम वजन वाढतं!
अभ्यास म्हणतो..
लॅन्सेटचा नुकताच प्रसिद्ध झालेला अहवाल म्हणतो की, भारतात लठ्ठपणाचा प्रश्न गंभीर होतो आहे.
लठ्ठ महिलांची संख्या पुरुषांच्या संख्येपेक्षा अधिक आहे.
वय वर्षे १९ च्या आत असलेल्या मुला-मुलींमध्येही लठ्ठपणा वाढतो आहे.
करायचं काय?
१. वजन कमी करण्यासाठी योग्य आहार, व्यायाम आणि त्या दोन्हीत सातत्य हवं हे अजिबात विसरता कामा नये.
२. उपाशी राहणं, व्हायरल डाएट करणं, झटपट वजन कमी करण्याचे दावे करणाऱ्या कुठल्याही ट्रिकला भुलणं काही योग्य नाही.
३. आपण फिट असणं महत्त्वाचं, दिसण्यासाठी वजन कमी करण्याचा अट्टाहास आणि स्वत:वर अघोरी प्रयोग टाळावे.