Join us  

ऑफिस चेअर योगा, आता ऑफिसमध्ये खुर्चीवर बसल्या बसल्या करा ३ योगासनं, सांगू नका कारणं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2022 8:28 PM

Fitness Tips: वेळ नाही म्हणून व्यायाम करणं टाळण्याचा बहाणा आता नकोच... ऑफिसमध्ये खुर्चीवर बसल्या बसल्या करता येऊ शकतात ही ३ योगासनं...(chair yoga)  बघा हा फिटनेस जपण्याचा नवा फंडा, ऑफिस चेअर योगा. 

ठळक मुद्देऑफिसमध्ये तुम्ही ५- १० मिनिटे रिलॅक्स होताच ना, मग त्या वेळेचा सदुपयोग करा आणि करून पहा हा योगा करण्याचा नवा प्रकार.

रोज एकाच पोझिशनमध्ये बसून ८- ९ तास काम करणंं ही अजिबातच सोपी गोष्ट नाही. यामुळे तर अनेक जणांच्या शरीराची ठेवण किंवा बसण्याची, उभे राहण्याची ठेवणही बदलली आहे. यामुळे मग कित्येकांना मानेचे, पाठीचे दुखणे मागे लागले आहे. कमी वयातच पाठ- कंबर आखडून गेल्यासारखी वाटते. हे सगळे त्रास कमी करायचे असतील, तर व्यायामाशिवाय पर्याय नाही. पण तरीही हे सगळं कळतंय, पण व्यायामाला वेळच नाही, असं काही जणांचं म्हणणं असतं. अशा सगळ्यांसाठी हा बघा खुर्चीवर बसल्या बसल्या करता येण्यासारखा ऑफिस चेअर योगा (office chair yoga). ऑफिसमध्ये तुम्ही ५- १० मिनिटे रिलॅक्स होताच ना, मग त्या वेळेचा सदुपयोग करा आणि करून पहा हा योगा करण्याचा नवा प्रकार. (yoga at workplace)

 

चेअर योगा करण्याचे फायदे (Benefits of chair yoga)- मानदुखी- पाठदुखी कमी करण्यासाठी हा योगा उपयुक्त ठरतो.- खूप वेळ बैठे काम करून बिघडलेले बॉडी पोश्चर सुधारायचे असेल तर हा योगा परिणामकारक आहे.- कमी वेळेत अधिकाधिक फायदे मिळतात.- शरीराची लवचिकता वाढविण्यासाठी उपयुक्त. अंग आखडून गेल्याचा त्रास होत असेल तर हा योगा उपयुक्त ठरतो.- जमिनीवर बसून ज्यांना व्यायाम करता येणे शक्य नाही, त्यांच्यासाठी हा योगा प्रकार फायद्याचा ठरतो.

 

चेअर योगाची 3 आसने १. Chair Spinal Twistअशा प्रकारचा व्यायाम करण्यासाठी दोन्ही पाय खुर्चीच्या डाव्या बाजूला करा. दोन्ही हात मागे करून त्याने खुर्चीची मागची बाजू पकडा. चेहरा आणि संपूर्ण शरीर उजव्या बाजूला करा. दिर्घ श्वास घेऊन ही अवस्था २० ते ३० सेकंद टिकविण्याचा प्रयत्न करा. यानंतर आता दोन्ही पाय खुर्चीच्या उजव्या बाजूला तर चेहरा आणि शरीर डाव्या बाजूला करा. आधीची पोझिशन जेवढ्या वेळ टिकवली तेवढाच वेळ ही आसनअवस्था टिकविण्याचा प्रयत्न करा. यामुळे पाठीचा कणा मोकळा होण्यास मदत होते.

 

२. चेअर वीरभद्रासनहे आसन करण्यासाठी उजवा पाय खुर्चीच्या थोडा बाहेर काढून उजव्या दिशेला फिरवा. डावा पाय डाव्या बाजूला बाहेर काढा आणि तो गुडघ्यातून वाकणार नाही, याची काळजी घ्या. आता दोन्ही हात खांद्याला समांतर पसरवा. चेहरा उजव्या हाताकडे वळवा तसेच छाती, पोट हे देखील उजव्या हाताकडे वळवा. ही आसनस्थिती काही सेकंद टिकविण्याचा प्रयत्न करा. आता हेच आसन दुसऱ्या बाजूने करावे.

 

३. चेअर गरुडासनहे आसन करण्यासाठी खुर्चीवर ताठ बसा. सगळ्यात आधी उजवा पाय डाव्या पायाभोवती लपेटून घ्या. त्याचप्रमाणे उजवा हात डाव्या हाताभोवती गुंफून घ्या. ही आसनस्थिती काही सेकंद टिकवा. त्यानंतर दुसऱ्या हाताने आणि पायाने हीच आसनअवस्था करा आणि ती देखील २० ते २५ सेकंद टिकवून ठेवा.

 

टॅग्स :फिटनेस टिप्सयोगासने प्रकार व फायदेव्यायामपाठीचे दुखणे उपाय