ऑफिस, तिथलं कामाचं वाढतं स्वरुप, रोजच्या रोज येणारे ताण या सगळ्या गोष्टी आपल्याला नेहमीच्याच असतात. पण तरीही कधी कधी सवय असूनही या गोष्टींचा ताण येतो. मानसिक दबाव आणि वर्कलोड एवढा जास्त होतो की एका क्षणाला खरोखरच मानसिक- शारिरीक थकवा (how to reduce stress in office?) आल्यासारखं होतं. मग उठायचं आणि चहा- कॉफी घेऊन यायचं, हा त्यावरचा उपाय आपण शोधून काढतो. पण असं वारंवार चहा- कॉफी पिणंही आरोग्यासाठी चांगलं नाही. म्हणूनच हे काही व्यायाम किंवा मेडिटेशनचे प्रकार बघा. ऑफिसमध्ये बसल्या- बसल्या अवघ्या ५ ते १० मिनिटांत (5 exercises of 5 minutes for relaxation at workplace) करता येतील आणि त्यामुळे नक्कीच रिलॅक्स वाटेल.
ऑफिसमध्ये बसून करता येण्यासारखे ५ व्यायाम
१. दिर्घ श्वसन
मनावरचं ओझं कमी करण्यासाठी आणि मन शांत करण्यासाठी दिर्घ श्वसन अतिशय उपयुक्त मानलं जातं. यासाठी तुमच्या नेहमीच्याच खुर्चीवर ताठ बसा. डोळे मिटून घ्या आणि ५ मिनिटांसाठी दिर्घश्वसन करा.
हळदीचं दूध आवडत नाही? अभिनेत्री भाग्यश्री सुचवतेय त्यावरचा उपाय, दूध न पिताही मिळतील हळदीचे फायदे
२. मानेचे व्यायाम
कधीकधी कामाचा ताण वाढल्याने डोकं दुखायला लागतं. अशावेळी मानेचे व्यायाम करणं फायद्याचं ठरतं. यासाठी खाली- वर, डावीकडे- उजवीकडे अशी ५- ५ वेळा मान हलवा. क्लॉकवाईज- ॲण्टीक्लॉकवाईज दिशेने मान हलवा. डोकं मोकळं झाल्यासारखं वाटेल.
३. शरीरावर लक्ष केंद्रित करा
शवासन करताना जसं आपण शरीराच्या एकेका भागावर लक्ष केंद्रित करतो, तसंच या प्रकारात करा. यासाठी डोळे मिटून ताठ बसा आणि पायापासून डोक्यापर्यंत एकेका भागावर लक्ष केंद्रित करून तो भाग रिलॅक्स करण्याच्या सूचना स्वत:ला द्या.
४. डोक्याचे प्रेशर पॉईंट्स दाबा
दोन्ही हातांची चारही बोटं मस्तकावर ठेवून अंगठ्याने कानाच्या मागचे पॉईंट्स तसेच मानेचे काही पॉईंट्स दाबा. रिलॅक्स व्हाल.
विविध आजारांवर गुणकारी ठरतो फळांचा रस! कोणत्या आजारासाठी कशाचा रस प्यावा? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
५. पाणी प्या..
कधी कधी चहा कॉफी घेण्याऐवजी १ ग्लास थंड पाणी प्यायल्यानेही उर्जा येते, थोडी तरतरी वाटू लागते आणि पुन्हा काम करण्यास हुरूप येतो.