आपल्यापैकी बहुतांश जणांचे काम हे बैठे असते. दिवसातील ८ ते १० तास एकाच अवस्थेत बसल्यामुळे अनेकदा आपला कंबरेच्या खालचा म्हणजेच सीटचा भाग खूप वाढतो किंवा आखडल्यासारखा होतो. रोजच्या धावपळीत आपल्याला व्यायामाला वेळ मिळतोच असे नाही. पण बैठ्या जीवनशैलीमुळे शरीर एकदा आखडायला सुरुवात झाली की नंतर ते लवचिक होणे अवघड जाते. पाठ, कंबर, सीट आणि पायांचे स्नायू लवचिक असतील तर आपल्या हालचाली सोप्या होतात. अन्यथा कमी वयातच आपल्याला आरोग्याच्या विविध समस्यांचा सामना करावा लागतो. यासाठीच प्रसिद्ध सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी १ खास व्यायामप्रकार सांगते (Pigeon Pose for Flexibility of Hip and lower Back).
अंशुका प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर आणि आलिया भट यांची फिटनेस ट्रेनर असून ती आपल्या सोशल मीडिया अकांऊटवरुन फॉलोअर्सना कायम काही ना काही उपयुक्त माहिती शेअर करत असते. आताही तिने सीटचा भाग लवचिक राहावा यासाठी एक खास व्यायामप्रकार सांगितला आहे. पिजन पोज असे या व्यायामाचे नाव असून ते कसे करायचे हेही अंशुकाने दाखवले आहे. इन्स्टाग्रामवर अंशुकाचे बरेच फॉलोअर्स असून करीनाही अनेकदा तिच्यासोबत व्यायाम करतानाच्या काही पोस्ट शेअर करत असते. आता केलेल्या पोस्टमध्ये सीटसाठी उपयुक्त असणारा व्यायामप्रकार करुन दाखवत या व्यायामाचे फायदे तिने सांगितले आहेत. पाहूयात हे आसन कसे करायचे आणि त्याचे फायदे...
फायदे
१. कंबरेच्या खालच्या भागाचे स्ट्रेचिंग होण्यासाठी आणि या भागाची लवचिकता वाढण्यासाठी या आसनाचा उपयोग होतो.
२. अनेकदा बैठ्या स्थितीमुळे पाठ आणि खांदे एकदम कडक होतात. ते मोकळे होण्यासाठीही या आसनाचा चांगला उपयोग होतो.
३. खांदे ताणल्यामुळे श्वसनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते.
४. पचनक्रिया सुरळीत होण्यासाठीही या आसनाचा अतिशय चांगला उपयोग होतो.
५. मूत्रविकार दूर होण्यासाठी आणि शरीराच्या आत असणारे अवयवांचे कार्य सुधारण्यासाठी हे आसन फायदेशीर ठरते.
हे आसन कसे करायचे?
१. वज्रासनात बसायचे
२. एक पाय पुढे घेऊन तो गुडघ्यात वाकवून दुसऱ्या मांडीपाशी ठेवायचा
३. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत जनिनीला टेकवून डोके पुढे जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा.
४. पुन्हा पाठ वर करुन मागे पाहण्याचा प्रयत्न करावा. असे दोन्ही पायांनी करायचे
महत्त्वाची टिप
तुम्हाला मणका, पाय, मांड्या आणि खांदे यांचा जुना त्रास असेल तर हे आसन करणे टाळायला हवे.