-नेहा सराफ
‘पोलीस खात्यात नोकरी करत असल्याने फिटनेस माझ्यासाठी तसा कायम महत्वाचा होताच पण आता मला त्याची गरजही वाटू लागली आहे.’ पुण्यातील खडकी पोलीस स्टेशनमधील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील सांगतात. त्या पोलीस अधिकारी आहेत आणि फिटनेसविषयी बोलतात तर त्यात काय विशेष असं वाटू शकतं, पण तसं नाही. त्या पोलीस अधिकारी तर आहेतच पण त्यांनी गेल्या वर्षी 'रिनिंग मिसेस इंडिया' या किताबावर आपले नावही कोरले आहे. खाकीतल्या सौंदर्यवती अशी त्यांची ओळख आहे.
पण सोपं कसं असेल पोलीस खात्यात नोकरी, कोरोनासारखा अवघड काळ आणि कामाच्या वेळा नक्की नाही. त्यात तुम्ही तुमचं फिटनेस रुटीन कसं सांभाळता असं विचारलं तर प्रेमा पाटील सांगतात, ‘व्यायाम हा फक्त शरीरासाठी नाही तर मनासाठीही तितकाच महत्वाचा आहे. आणि जेवणाच्या वेळा नाही सांभाळता आल्या तरी मी व्यायामाची शिस्त मोडत नाही.’
रोज एक तास जिममध्ये व्यायाम, त्यातही योग, ऍरोबिक्स, झुंबा, वेट ट्रेनिंग असे विविध प्रकार त्या करतात. कोरोना काळात कामाचा ताण होता मात्र त्याकाळातही व्यायाम सुरु ठेवला म्हणून फिट राहता आलं असं त्या सांगतात.
प्रेमा म्हणतात, 'कोरोना काळात काम करणं आमच्यासाठीही सोपं नव्हतं, नागरिकांचे अनेक प्रश्न होते, शहरात रुग्ण वाढत होते, अशावेळी शारीरिक सोबत मानसिकदृष्ट्या फिट राहणं महत्वाचं होतं. त्याकाळात घरातल्या घरात आणि नवऱ्याचं व्यायामाचं साहित्यात वापरुन मी व्यायाम केला. या व्यायामाचा मला फायदा झाला. दिवसभर दमून आल्यावर वीस मिनिटांचा व्यायामही खूप ऊर्जा देतो असा माझा अनुभव आहे'.
व्यायामासोबत आहारही महत्वाचा असल्याचं प्रेमा यांना वाटतं. त्या म्हणतात, 'डाएट म्हणजे काही उपाशी राहणं नव्हे. मी आपली घरगुती भाजी-पोळी, वरण, भात सगळं खाते. अगदी माझे आवडते गोड पदार्थही खाते पण प्रमाणात. घरगुती जेवण आणि प्रमाणात खाल्लेले गोड, अगदी क्वचित खाल्लेले फास्ट फूड अशी माझी आहारशैली आहे. कामांमुळे जेवणाच्या वेळा सांभाळल्या जातातच असं नाही पण शक्यतो सकाळचा नाश्ता न चुकवणं, प्रोटिन्स म्हणजे डाळी, कडधान्य असलेला आहार अशा काही ठराविक गोष्टी मी मात्र आवर्जुन करते.
बारीक दिसणं, झिरो फिगर असं माझं ध्येय कधीच नव्हतं. पण जिना चढल्यावर दम न लागणं, सलग वेगानं चालल्यावर धाप न लागणं ही माझ्यासाठी फिट असण्याची लक्षणे आहेत. लिफ्ट न वापरणं, चहा टाळणं, शक्य असेल तर चालत राऊंड मारणं अशा गोष्टींकडे माझा कल असतो.’
आज अनेक मुलींना मॉडेल व्हायचं असतं, छान दिसायचं असतं. त्यासाठी त्या प्रेमा यांच्याकडे सल्ला मागतात.
त्यावर त्या म्हणतात, 'व्यायामाचा उपयोग काही वय लपवण्यासाठी होत नाही, सुंदर दिसण्यासाठीही होत नाही. पण तुम्ही फ्रेश राहणं, त्वचा छान राहणं, स्ट्रेस कमी होणं, शरीर लवचिक राहणं असे अनेक फायदे होतात. तरुण आहे तर गरज नाही म्हणून आणि वयस्कर आहे तर आता कशाला करायचा म्हणून अशा दोनही कारणांसाठी व्यायाम टाळणं चुकीचं आहे. फिटनेस हा काही अंगावर घालून मिरवायचा दागिना नसला तरी तो असेल तर दागिन्यांशिवायही महिला सशक्त दिसते. आणि म्हणून इतर कोणासाठी नाही तर स्वतःसाठी फिटनेस कमावण्याची गरज आहे'.
एका पोलीस अधिकारी असलेल्या जबाबदार अधिकारी महिलेनं फिटनेसची ही खरी सूत्र सांगणं, हा फिट होण्याचा योग्य मार्ग आहे.
( नेहा www.lokmat.com मध्ये वार्ताहर आहे.)