अंग मेहनतीचं काम जसं अवघड असतं, तसंच त्रासदायक तासनतास एकाच जागी बसून मान- पाठ मोडून काम करणं असतं. लॅपटाॅप किंवा डेस्कटॉपवर काम करताना प्रत्येकाचंच शरीर एका विशिष्ट पोझमध्ये वाकलं जातं. मग पुढचे कित्येक तास आपण त्याच पद्धतीने बसून काम करतो. थोडासा ब्रेक घेतला की पुन्हा तिच पोझिशन कायम असते. अशा पद्धतीने सतत चुकीच्या अवस्थेत बसून काम केल्याने अनेकांना मान, पाठ आणि कंबरेचं दुखणं मागे लागलं आहे. पाठ- कंबर- मान अगदी आखडून गेल्यासारखी वाटते. हा त्रास कमी करण्यासाठी अगदी ५ ते १० मिनिटांत (10 Minutes chair yoga) करता येतील, अशी काही योगासनं आलिया भटच्या ट्रेनरने सांगितली आहेत. ही योगासनं तुम्ही ऑफिसमध्येही टी- टाईम किंवा लंच- टाईमला करू शकता. (quick yoga at office)
सेलिब्रिटी योगा कोच अनुष्का परवानी (Anshuka Parwani) या आलिया भटसह करिना कपूर, दीपिका पदुकोन, अनन्या पांडे, रकूलप्रित सिंग यांच्यासह अनेक बॉलीवूड स्टार्सला योगा प्रशिक्षण देतात. त्या सोशल मिडियावरही बऱ्यापैकी ॲक्टीव्ह असून त्यांची आसनं सोपी आणि सर्वसामान्यांना सहज जमण्यासारखी असल्याने ती फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. अशाच पद्धतीचा आणखी एक व्हिडिओ अनुष्का यांनी नुकताच इन्स्टाग्रामला शेअर केला आहे. जर घर- ऑफिस असं सगळं सांभाळून तुम्हाला व्यायाम करण्यासाठी पुरेसा वेळ देता येत नसेल, तर ही काही सोपी योगासनं करूनही तुम्ही फिट राहू शकता, असं त्यांचं म्हणणं आहे.
ऑफिसमध्येही सहज करता येतील अशी योगासनं..
१. गोमुखासन (Gomukhasana)
गोमुखासन करण्यासाठी खुर्चीवर सरळ ताठ बसा. दोन्ही पायांचे तळवे जमिनीवर समांतर ठेवा. यानंतर दोन्ही हात एकमेकांत गुंफून सरळ ठेवा. हे आसन केल्यामुळे बॉडीपोश्चर सुधारण्यास मदत होईल. खांद्यांना आणि हातांनाही आराम मिळेल. तसेच शरीरातील चक्र स्टिमुलेट होण्यास मदत होते.
२. Seated Spine Twist Benefits
हे आसन करण्यासाठी खुर्चीवर ताठ बसा. दोन्ही पायांचे तळवे जमिनीवर व्यवस्थित टेकवलेले ठेवा. यानंतर उजव्या बाजुला वळून दोन्ही हातांनी खुर्चीची मागची बाजू पकडण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर डावीकडे वळून पुन्हा खुर्चीच्या मागची बाजू पकडा. हे करताना पायांची अजिबात हालचाल करून नये. कंबरेच्या वरचे शरीर फक्त हलवावे. दोन्ही बाजूंनी ५- ५ वेळा हे आसन करा. यामुळे पाठीच्या मणका लवचिक होतो आणि पाठदुखी कमी होते.
३. Seated Pigeon Pose
हे आसन करण्यासाठी खुर्चीवर बसा. एक पाय गुडघ्यात दुमडून घ्या आणि त्याचा तळपाय दुसऱ्या पायाच्या गुडघ्यावर ठेवा. आता याच अवस्थेत खाली वाका आणि दोन्ही तळहात जमिनीवर टेकविण्याचा प्रयत्न करा. हे आसन केल्यामुळे हिप्सला आणि कंबरेला आराम मिळतो.
४. Seated Hand to Big Toe Pose
हे आसन करण्यासाठी खुर्चीवर ताठ बसा. एक पाय वर उचलून जमिनीला समांतर ठेवा. आता उजवा पाय वर केला असेल तर उजव्याच हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडण्याचा प्रयत्न करा. काही सेकंद ही आसनस्थिती टिकवा. आता पुन्हा दुसऱ्या पायाने हेच आसन पुन्हा करा. हे आसन केल्यामुळे पोटऱ्या, मांड्यांचे स्नायू तसेच हिप्सचे स्नायू ताणले जातात आणि आराम पडतो.