सकाळी चालायला जाणं हा सगळ्यात सोपा आणि परिणामकारक व्यायाम आहे. वजन कमी करण्यासोबतच सकाळी चालायला जाण्याचे अनेक फायदे आहेत. व्यायाम हा फक्त वजन कमी करण्यासाठी किंवा वजन नियंत्रित करण्यासाठी करायचा नसतो तर शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी करायचा असतो. शरीर आणि मन दोन्हीचं आरोग्य सांभाळायचं असेल तर रोज सकाळी चालायला जायला हवं. वजन कमी करण्यासोबतच सकाळी चालण्याचे अनेक फायदे आहेत.
छायाचित्र: गुगल
सकाळी चालण्यानं काय होतं?
1. जेव्हा आपली नीट झोप झालेली असते तेव्हा शरीराचं तापमान वाढलेलं असतं. म्हणूनच सकाळी उठल्यानंतर चालायला गेल्यास शरीरातील विषारी पदार्थ सहजपणे बाहेर टाकले जातात. सकाळी चालण्यामुळे शरीराचं शुध्दीकरण होतं. तसेच आपल्या फुप्फुसांना शुध्द हवा आणि ऑक्सिजन मिळतो. ही हवा आणि ऑक्सिजन आपल्या फुप्फुसांसोबतच मेंदूचं आरोग्यही चांगलं राखण्यास मदत करतं. आयुर्वेद आणि विज्ञान या दोन्हींच्या मते चांगल्या आरोग्यासाठी सकाळी चालण्याला पर्याय नाही.
2. सध्याच्या काळात नैराश्य , उदासिनता या मानसिक आजारांचं प्रमाण खूप वाढलंय. आणि या आजाराचं गांभीर्य न ओळखता त्याकडे दुर्लक्ष केलं जातंय. हे मानसिक आजार गंभीर होवू द्यायचे नसतील तर तज्ज्ञ म्हणतात रोज सकाळी चालण्याचा व्यायाम करायला हवा. कारण सकाळी चालण्याने शरीरातील रक्तप्रवाह नीट होतो. यामुळे मेंदुला ऑक्सिजनचा पुरवठा नीट होतो. मेंदुला आक्सिजन नीट मिळाला की मनाला आनंदी करणारे हार्मोन्स जास्त स्त्रवतात आणि मानसिक आजारही बरे होण्यास मदत होते.
3. सकाळी चालणं हा मधुमेहाचा धोका टाळण्याचा उत्तम मार्ग आहे. गोड खाण्यावर नियंत्रण ठेवण्यासोबत रोज सकाळी चालण्याने मधुमेहाचा धोका टळतो. आणि मधुमेह जर असेल तर तो नियंत्रितही राहातो.
छायाचित्र: गुगल
4.भविष्यात उद्भवणारी सांधेदुखी टाळलयची असेल तर रोज सकाळी चालण्याचा व्यायाम करायला हवा. यामुळे शरीर हे क्रियाशील राहातं. हालचाली मंदावत नाहीत. सांध्यांमधील वंगण टिकून राहातं. त्यामुळे सांधेदुखी किंवा ऑस्टियोपोरोसिससारखे आजार होत नाही.
5. चुकीची जीवनशैली, सदोष आहार पध्दती यामुळे वाढत्या कोलेस्ट्रॉलचा धोका असतो. त्यासाठी जीवनशैली आणि आहाराच्या सवयी यात आरोग्यदायी बदल करणं आवश्यक असतं आणि सोबतच सकाळी चालयला जाणंही तितकंच गरजेचं असतं. सकाळी चालण्यामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नियंत्रित राहातं. कोलेस्ट्रॉल नियंत्रित असेल तर हदयाशी संबंधित आजारांचा धोकाही टळतो.
6.अनेक अभ्यासाचे निष्कर्ष सांगतात की सकाळच्या चालण्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. पोटाचं आरोग्य चांगलं राहातं. भूक चांगली लागते. आपण जो आहार घेतो तो अंगी लागतो. पचनक्रिया सुधारल्याने शरीराला आहारातून पोषक घटक मिळतात त्याचा परिणाम म्हणजे रोगप्रतिकार शक्ती वाढते.