उन्हाळ्याच्या दिवसांत उकाड्यामुळे अंगाची लाहीलाही होते. बाहेर तळपता सूर्य असल्याने आपल्याला सतत पाणी पाणी होते. इतकेच नाही तर घामाघूम होत असल्याने आपल्याला थकवा आल्यासारखे होते. दुपारच्या वेळी सतत खूप तहान लागत असल्याने आपण एकतर सारखं गार पाणी पितो किंवा आईस्क्रीम, सरबत असं काही ना काही घेत राहतो. उन्हाळ्याच्या दिवसांत चहा अजिबात नको होतो. अनेकदा उष्णता असताना चहा प्यायला तर अॅसिडीटी, तोंड येणे अशा काही ना काही समस्या उद्भवतात. अशावेळी नेहमीचा चहा घेण्यापेक्षा स्पेशल चहा घेतला तर तब्येत चांगली राहण्यास मदत होते. आयुर्वेदतज्ज्ञ दिक्षा भावसार हा स्पेशल चहा कसा करायचा आणि त्याचे फायदे काय याविषयी सांगतात (Recipe And Benefits of Ayurvedic Summer Tea)..
कसा करायचा चहा?
१. गॅसवर पातेल्यात १ ग्लास पाणी घेऊन त्यात १ चमचा धणे, १ मूठ गुलाबाच्या पाकळ्या घालाव्यात.
२. तसेच ७-८ पुदिन्याची पाने, कडीपत्ता, एका वेलचीची पावडर घालावी.
३. हे मिश्रण ५ ते ७ मिनीटे मध्यम आचेवर चांगले उकळावे आणि गार करावे.
४. मग कपात गाळून एक एक घोट करत हा आयुर्वेदिक चहा प्यावा.
आयुर्वेदिक चहाचे फायदे
१. धणे पोटाच्या समस्यांसाठी अतिशय फायदेशीर असतात. तसेच मायग्रेन, डोकेदुखी, हार्मोन्सचे असंतुलन यांसारख्या समस्यांवरही धणे फायदेशीर ठरतात. रक्तातील साखरेची पातळी, थायरॉईड यांसारख्या समस्यांसाठीही धणे फायदेशीर ठरतात.
२. गुलाबाच्या पाकळ्या प्रजनन क्षमता वाढण्यासाठी उपयुक्त असतात. गुलाब थंड असल्याने हृदय, मन, झोप आणि त्वचेसाठी या पाकळ्यांचा अर्क घेणे अतिशय उत्तम असते.
३. कडीपत्ता तर आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतो. अँटी ऑक्सिडंट, अँटीफंगल, अँटीअल्सर, अँटीबॅक्टेरीयल असे अनेक गुणधर्म असल्याने कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी, हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यासाठी आणि केस चांगले राहण्यासाठी कडीपत्ता खाणे महत्त्वाचे असते.
४. पुदिना हा कोणत्याही सिझनमध्ये आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर अशी औषधी वनस्पती आहे. तसेच पुदिन्यामुळे चांगला फ्लेवर येत असल्याने चहाची चव सुधारते. अॅलर्जी, पुरड, डोकेदुखी, सर्दी-कफ, अपचन यांसारख्या समस्यांसाठी पुदीना फायदेशीर असतो.
५. वेलचीला असणाऱ्या स्वादामुळे हा अनेकांना आवडणारा मसाल्याचा पदार्थ आहे. हे एक उत्तम अँटीऑक्सिडंट असल्याने त्वचेचे विकार, रक्तदाब, अस्थमा, लघवीच्या समस्या, प्रमाणापेक्षा जास्त तहान लागणे यसारख्या तक्रारींसाठी वेलची फायदेशीर असते.