आपण जाड होऊ लागलो आहोत, याचा सगळ्यात आधी अंदाज येतो तो आपल्या पोटावरून. पोटाचा घेर वाढत चालला आणि त्यावर टायर वाढणे सुरू झाले आहे, असे लक्षात आले तर लगेचच जागरुक व्हा. कारण एकदा का टायर वाढायला सुरुवात झाली की मग परत स्लीम ट्रीम बेली मिळवणं अतिशय अवघड होऊन बसतं. त्यामुळे अगदी कमी वयापासूनच ही तीन आसनं नियमितपणे करत जा. यामुळे निश्चितच तुमच्या पोटावरची चरबी कमी होईल आणि तुम्ही दिसू लागाल एकदम फिट.
१. भुजंगासनपोटावरची चरबी कमी करण्यासाठी हे अतिशय प्रभावी आसन आहे. शिवाय भुजंगासन करण्यास एकदम सोपं आहे. हे आसन करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्ही पोटावर झोपा नंतर दोन्ही हात छातीच्या बाजूला ठेवा व हळूवार श्वास घेत शरीर वर उचला. नाभीपर्यंत शरीर वर उचलले जाईल, याकडे लक्ष द्या. मान छताच्या दिशेने असायला हवी. एखादा मिनिट ही आसन स्थिती टिकवून ठेवा. किंवा असे शक्य झाले नाही तर आसन स्थिती सोडा आणि पुन्हा पहिल्यापासून सांगितल्याप्रमाणे आसन करा.
Photo Credit- Google
२. उष्ट्रासनउष्ट्रासन केल्यामुळे दंड, मांड्या, पाठ, कंबर आणि पोट या सगळ्या अवयवांचा व्यायाम होतो. त्यामुळे त्या भागांच्या मांसपेशी मजबूत करण्यासाठी हे आसन अतिशय योग्य आहे. उष्ट्रासन करण्यासाठी सगळ्यात आधी वज्रासनात बसा. यानंतर गुडघे जमिनवर ठेवून शरीर उचला. गुडघ्यांवर उभे राहिल्यानंतर मान मागच्या बाजूने वळवा. दोन्ही हात मागच्या बाजूला सरकवा आणि देान्ही हातांनी तुमचे दोन्ही पायांचे घोटे धरण्याचा प्रयत्न करा. साधारण एक मिनिट ही आसन स्थिती टिकवून ठेवा.
३. नौकासनहे आसन केल्याने पोटाच्या मांसपेशी चांगल्याच ताणल्या जातात. त्यामुळे पोटाची चरबी झरझर उतरण्यासाठी हे आसन अतिशय फायदेशीर ठरते. पोटासोबतच मांड्यांवरील चरबी कमी करण्यासाठी देखील नौकासन उपयुक्त आहे. नौकासन करण्यासाठी सगळ्यात आधी पाठीवर झोपा. यानंतर दोन्ही पाय तीस अंशावर उचला. याचवेळी डोके, पाठ आणि हात उचला. हात पायाच्या दिशेने पण जमिनीला समांतर असतील, अशा बेताने ठेवा. ही आसनस्थिती अवघड आहे, पण प्रयत्न केल्यास जमणे कठीण नाही. साधारण ३० सेकंद तरी ही आसन स्थिती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करा.