जुन्या काळातील अनेक लोक आपल्या किचनमध्ये तांब्याच्या भांड्यांचा वापर जास्त प्रमाणात करायचे. तांब हा एकमेव असा धातू आहे की ज्यात, बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंधीत करणारे गुणधर्म असतात. आयुर्वेदानुसार या धातूचा वापर करणे उपयुक्त मानले जाते. जर घरात वापरल्या जाणाऱ्या भांड्यांसाठी विशेषतः पाणी पिण्याची भांडी, ग्लासेस आणि बाटल्यांसाठी तांब्याचा वापर केला गेला तर आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकते.
तांब्याच्या भांड्यात कमीत कमी आठ तास ठेवलेले पाणी प्यायल्यास शरीरातील विविध अपायकारक घटक बाहेर फेकण्यास मदत होते. शरीरातील अशुद्धी दूर झाल्याने संपूर्ण शरीर निरोगी राहण्यास मदत होते. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. आपण जर वारंवार पाणी पिण्यासाठी तांब्याच्या भांड्यांचा वापर करत असाल तर ते आरोग्यासाठी घातक ठरू शकते. तांब्याच्या ग्लासेस किंवा बाटलीतून पाणी पिण्याआधी काही गोष्टींची खबरदारी घ्या(Remember 3 things while drinking water from a copper bottle).
तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्याआधी या ३ गोष्टींची खबरदारी घ्या...
१. सतत तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणे ठरू शकते अपायकारक :- आपल्यापैकी काही लोकांना वारंवार तांब्याच्या ग्लासातून किंवा बाटलीतून पाणी पिण्याची सवय असते. काहीजण तर तांब्याच्या बाटलीत एकदाच पाणी भरून ठेवून दिवसभर त्यातीलच पाणी पितात. असे केल्यास आपल्या शरीरात तांब्यातील काही विषारी घटक वारंवार जाऊन मळमळ, चक्कर येणे, ओटीपोटात दुखणे, यकृत व मूत्रपिंड निकामी होणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. असे पाहायला गेले तर कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करणे शरीरासाठी हानीकारकच ठरू शकते. रात्री तांब्याच्या भांड्यात भरून ठेवलेले पाणी सकाळी पिणे योग्य आहे. परंतु सतत तांब्याच्याच भांड्यातील पाणी पिणे योग्य नाही. काही दिवस दुसऱ्या धातूच्या भांड्यातील पाणी पिणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ :- जर आपण एक महिना नियमितपणे तांब्याच्या भांड्यातील पाणी पीत असाल तर पुढचे दोन महिने सामान्य पाणी प्या.
२. लिंबू आणि मधाचे पाणी तांब्याच्या भांड्यातून पिऊ नका :- काहीजण वजन कमी करण्यासाठी किंवा सकाळी फ्रेश वाटावं म्हणून लिंबू आणि मधाचे पाणी पितात. सकाळी उपाशी पोटी हे पाणी पिणे शरीरासाठी उपयुक्त आहेच. परंतु हे पाणी पिताना ते तांब्याच्या भांड्यातून पिणे टाळा. लिंबू हे आम्ल धर्मीय आहे. लिंबामध्ये सायट्रिक अॅसिडचे प्रमाण जास्त असते. लिंबातील अॅसिड आणि तांब यांच्यात प्रक्रिया होऊन काही विषारी घटक बाहेर पडतात जे आपल्यासाठी हानीकारक ठरू शकतात. असे केल्यास पोटात दुखणे, गॅस, उलटया होणे यांसारख्या समस्या उद्भवतात.
३. तांब्याच्या बाटलीची व ग्लासची स्वच्छता ठेवा :- तांब्याची बाटली किंवा ग्लास यांची स्वच्छता ठेवा. प्रत्येक वेळी वापरल्यानंतर किमान स्वच्छ पाण्याने धुणे गरजेचे आहे. दर ३० दिवसांनी लिंबू आणि मिठाचा वापर करून तांब्याची भांडी स्वच्छ धुवून घ्यावीत. कोणत्याही प्रकारच्या तांब्याच्या भांड्यात सतत पाणी साठवून ठेवल्यास ऑक्सिडेशनची नैसर्गिक प्रक्रिया होण्यास सुरुवात होते. या ऑक्सिडेशन प्रक्रियेमुळे तांब्याच्या भांड्यांवर काळे डाग पडण्यास सुरुवात होते. ऑक्सिडेशन प्रक्रियेचे डाग भांड्यांवर पडल्यामुळे तांबे या धातूंपासून मिळणारे नैसर्गिक फायदे कमी होत जातात.