दिवाळीच्या दिवसांत फराळाचे पदार्थ असोत किंवा पाहुण्यांकडे गेल्यावरचे गोडाधोडाचे बेत असोत आपण या सगळ्यावर मनसोक्त ताव मारतो. इतकेच नाही तर दिवाळीची सुट्टी ही वर्षातली मोठी सुट्टी असल्याने आराम, फिरायला जाणे अशा मूडमध्ये आपण सगळेच असतो. वर्षातून एकदाच येणारा मोठा सण असला तरी या काळात थंडीची सुरुवात होत असल्याने उत्तम आरोग्यासाठी आणि शरीर चांगले राहण्यासाठी व्यायाम करण्यासाठीही हा काळ अतिशय महत्त्वाचा असतो हे लक्षात घ्यायला हवे. फराळाच्या आणि गोडाच्या पदार्थांमधून शरीरात जमा केलेल्या कॅलरीज वेळच्या वेळी बर्न केल्या नाहीत तर त्याचा शरीराला भविष्यात त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे दिवाळीची मजा करताना त्यानंतर व्यायामाकडेही आवर्जून लक्ष द्यायला हवे. अन्यथा लठ्ठपणा, कोलेस्टेरॉल, रक्तातील साखर यांसारख्या तक्रारी वाढण्याचीच शक्यता जास्त. आता व्यायामाची सुरुवात करायची हे खरं. पण हीसुरुवात नेमकी कुठून करायची याबाबत मात्र आपल्यापैकी अनेकांच्या मनात संभ्रमाची भावना असते. म्हणूनच थंडीच्या दिवसांत व्यायामाला सुरुवात करायचा प्लॅन करत असाल तर त्यासाठी काही सोप्या टिप्स आज आपण पाहणार आहोत (Remember 4 things before starting Excercies in Winter season after Diwali )
१. चर्चा न करता व्यायामाला सुरुवात करा
व्यायाम करायचा म्हणजे आपण आधी त्याची बरीच चर्चा करतो. पण व्यायामाच्या बाबतीत जास्त चर्चा न करता थेट सुरुवात केली तर त्याचा जास्त उपयोग होतो. नाहीतर नुसतची चर्चा होते आणि ती हवेत विरुन जाते. त्यामुळे व्यायाम करणार हे सगळ्यांना सांगत न बसता थेट चालण्याचा, सायकलिंगचा किंवा अगदी सूर्यनमस्काराचा व्यायाम करण्यास सुरुवात करा. एकदा सुरुवात करुन १ किंवा २ आठवडे सलग व्यायाम केलात तर मग यामध्ये सातत्य ठेवणे सोपे होते.
२. किमान तयारी करुन ठेवा
आपल्याला कोणत्या प्रकारचा व्यायाम कुठे करायचा आहे याचे योग्य ते नियोजन करा. त्या व्यायामासाठी लागणारे कपडे, शूज, साहित्य यांची आधीपासूनच जुळवाजुळव करुन ठेवा. नाहीतर ऐनवेळी व्यायामाचा वेळ या सगळ्यात जाण्याची शक्यता असते.
३. स्ट्रेचिंग आठवणीने करा
एरवी व्यायामाची सवय नसेल आणि अचानक व्यायामाला सुरुवात केली तर शिरा ताणल्या जाण्याची शक्यता असते. त्यामुळे व्यायामाला सुरुवात करताना आधी आवर्जून स्ट्रेचिंग करायला हवे. व्यायाम झाल्यावरही स्ट्रेचिंग करायला हवे.
४. खूप जास्त प्लॅनिंग नको
आपण एखाद्या गोष्टीचे प्रमाणापेक्षा जास्त प्लॅनिंग केले तर ती गोष्ट प्रत्यक्षात येण्यास वेळ लागते. त्यामुळे प्रमाणापेक्षा खूप जास्त प्लॅनिंग न करता प्रत्यक्ष कृती करायला हवी. त्यासाठी एखादी गोष्ट ठरवली की त्याचे थेट एक्झिक्युशन करणे जास्त महत्त्वाचे आहे हे लक्षात घ्या.