Join us  

Rheumatoid Arthritis : अर्थराइटिसचा हा प्रकार नक्की काय असतो? सांधे दुखणे, आखडणे, सूज काय सांगतात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 2:13 PM

Rheumatoid Arthritis : हा ऑटो इम्यून आजार असून त्याची लक्षणं दिसू लागताच वेळीच, उपचार, फिजिओथेरपी केली तर आजार आवाक्यात राहू शकतो.

ठळक मुद्दे या आजाराचं निदान झाल्यावर घाबरून न जाता तातडीने उपचारांना सुरुवात करा. ह्या आजाराच्या वाढण्याचा वेग व्यायामांनी नक्कीच कमी करता येऊ शकतो.

डॉ. देविका गद्रे

आज आपण रूमेटाइड अर्थराइटिसबद्दल (Rheumatoid Arthritis) जाणून घेणार आहोत. अर्थराइटिस ह्या शब्दाचा अर्थ नक्की काय? तर सांध्यांना आलेली सूज म्हणजे अर्थराइटिस. अर्थराइटिसचे अनेक प्रकार आहेत पण सर्वांना माहित असलेले दोन प्रकार म्हणजे ऑस्टिओ अर्थराइटिस आणि रूमेटाइड अर्थराइटिस. आता या दोघांमधला फरक जाणून घेऊया.ऑस्टिओ अर्थराइटिस: हा वयानुसार होत जाणारा आजार आहे. स्त्रिया व पुरुष ह्यांच्यात सम प्रमाणात आढळतो. बऱ्याचदा ५०-६० वयोगटातील व्यक्तींना लक्षणे दिसू लागतात.ऱ्हुमॅटॉइड अर्थराइटिस: सांध्यांना आलेल्या सुजेमुळे लक्षणे दिसून येतात. चाळीशीच्या पुढील वयोगटातील स्त्रियांमद्धे ह्या आजाराची सुरुवात जलद गतीने होते. मात्र काही वेळा हा आजार अगदी विशीत सुध्दा होऊ शकतो. पुरुषांमध्ये कमी प्रमाणात आढळतो. सांध्यांप्रमाणेच त्वचेत किंवा फुफुसांतसुद्धा बदल दिसून येतात.

(छायाचित्र : गुगल)

 

सांधा कसा तयार होतो?

२ हाडे एकत्र येऊन सांधा बनतो. दोन्ही हाडांच्या संरक्षणासाठी एक विशिष्ट प्रकारचा आवरण असतं. त्याला आर्टिक्युलर कार्टिलेज असे म्हणतात. ह्यासोबतच स्नायूंना एक वंगण असतं ज्याला सायनोव्हिअल फ्लुइड असं म्हणतात. रूमेटाइड अर्थराइटिसमध्ये सांध्यांना सूज येऊन हाडे अशक्त झालेली आढळतात ज्यामुळे सांध्याच्या वंगणावरही परिणाम होतो.

रूमेटाइड अर्थराइटिस कशामुळे होतो?

हा अटोइम्युन आजार आहे म्हणजेच काही कारणांमुळे आपले शरीर आपल्याच शरीरातील पेशींविरुद्ध काम करायला लागते. याला अनुवंशिकता सुद्धा कारण ठरू शकते. तसेच अति धूम्रपान केल्याने ह्या आजाराचा धोका वाढतो असे लक्षात आले आहे. सांध्यांना येणारी सूज वाढत जाऊन काही वेळा दोन्ही बाजूंच्या सांध्यांमध्ये सम प्रमाणात दिसून येते. तसेच दुर्लक्ष झाल्यास त्वचा व आतल्या रक्त वाहून नेणाऱ्या नलिका, यकृत, फुफुसे, मेंदू ह्यांवरही ह्या आजाराचे पडसाद उमटतात.

कोणत्या सांध्यांना सगळ्यात जास्त त्रास होतो?

हाताच्या बोटांचे सांधे सर्वात पहिल्यांदा परिणाम दाखवतात. हळू हळू आजार वाढत गेल्यावर खांदे, कोपरं, गुढघे आणि घोट्यांवरही आजाराची लक्षणे दिसू लागतात.

(छायाचित्र : गुगल)

 

लक्षणे

१) सूज येणे२) सांध्यामध्ये व आजूबाजूच्या भागात गरम वाटणे३) सांध्यांवर लालसरपणा येणे४) दुखणे५) सकाळच्या वेळी सांधे आखडणेही सर्वसाधारण लक्षणे दिसून येतात. हातातल्या बोटांमद्धे काही बदल दिसून येतात. बोटांचा आकार बदलणे, तिथल्या स्नायूंना घट्टपणा येणे इत्यादी समस्या आढळतात. त्यातील काही बदलांची (Deformity) नावे पुढीलप्रमाणे:१) अलनार डेव्हिएशन: म्हणजेच हाताची सर्व बोटे करंगळीच्या बाजूला झुकणे२) बोटोनियर डिफॉर्मिटी: म्हणजेच बोटाचा मधला सांधा आपोआप दुमडला जाणे३) स्वान नेक डिफॉर्मिटी: म्हणजेच बोटाचा सर्वात वरचा सांधा दुमडला जाणेह्याशिवाय दिसणारी काही लक्षणे पुढीलप्रमाणे: गुढघ्याच्या मागच्या बाजूला बेकर्स सिस्ट नावाचा प्रकार आढळू शकतो तसेच ताप, थकवा. भूक कमी लागणे, शरीरावर ठिकठिकाणी काही गाठी दिसणे. या गाठी बऱ्याचदा कोपरांवर आढळतात तर काही वेळा त्या फुफुसांवर किंवा हृदयावरही आढळून येतात. या व्यतिरिक्त ह्या रुग्णांमध्ये रक्तवाहिन्या बारिक झाल्याने हार्ट अटॅक व पॅरालीसीसचा धोका अधिक प्रमाणात आढळतो.

(छायाचित्र : गुगल)

हा आजार कसा ओळखता येतो?

१) रक्ताची तपासणी: ह्यात रूमेटाइड फॅक्टर नावाची रक्त तपासणी असते ज्यातून हा आजार आहे की नाही ह्याबद्दल माहिती कळते.२) एक्स रे: सांध्यांना आलेली सूज, हाडांमध्ये घडणारे बदल इत्यादींची माहिती मिळवण्यासाठी एक्स रे मदत करतात.

उपचार काय?

मोठ्या काळासाठी काही औषधे देण्यात येतात ज्यात अँटी रूमेटाइड औषधांचा समावेश असतो. तसेच सूज कमी करण्यासाठी अँटी इन्फ्लमेटोरी औषधे वापरली जातात.

(छायाचित्र : गुगल)

ह्यात फिजिओथेरपी कशी मदत करते?

फिजिओथेरपिस्ट चार गोष्टींकडे लक्ष देतात: सांध्यांना आलेली सूज, दुखणे, मंदावलेल्या व कमी झालेल्या हालचाली आणि सांध्यांमद्धे झालेले बदल किंवा डिफॉर्मिटी. तुमची हालचाल, ताकद, सुसूत्रता वाढवण्यासाठी व दुखणे कमी करण्यासाठी ते तुम्हाला काही सल्ले देतात. जसे की शरीराच्या दोन्ही बाजूंना सामान वजन घ्या (काहींना एका पायावर जास्त वजन देऊन उभे राहणे अशा सवयी असतात), शरीराची ढब म्हणजेच पोश्चर चांगले असूद्यात, शरीरातील ऊर्जा वाचवण्यासाठी प्रयत्न करा, स्नायूंची ताकद वाढवा.

फिजिओथेरपी कधी सुरु करावी?

आजाराचे निदान झाल्यावर/ लक्षणे दिसू लागल्यावर तातडीने फिजिओथेरपी सुरु करावी. ह्या लवकर उपचारपद्धतींमध्ये बर्फाच्या शेकाने सूज कमी होण्यास मदत होते तसेच काही व्यायाम दुखणे कमी करण्यासाठी व स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात. तसेच फिजिओथेरपीमधील काही यंत्रांच्या साहाय्याने दुखणे कमी होण्यास मदत होते.जर उशिरा उपचार चालू झाले तर फिजिओथेरपिस्ट मॅन्युअल थेरपीचा वापर करतात व डिफॉर्मिटी टाळण्याचा प्रयत्न करतात. ह्या काळात काही वेळा गरम पाण्याचा शेक घेण्याचा सल्ला दिला जातो. तसेच पॅराफीन वॅक्स बाथ ह्या पद्धतीच्या माध्यमातून उपचार दिले जातात. हल्ली हैड्रोथेरेपी म्हणजेच पाण्यामध्ये व्यायाम करण्याचा शास्त्र प्रसिद्धीस येत आहे.प्रत्येक रुग्णाच्या तक्रारीनुसार व्यायामप्रकार शिकवण्यात येतात ज्यामुळे रोजच्या कामांमधये ह्या आजाराचा व्यत्यय येत नाही. त्यातील काही व्यायाम पुढीलप्रमाणे:१) हाताच्या बोटांची पेरे एकमेकांना लावणे२) स्माईलीचा बॉल दाबण्याचा व्यायाम करणे३) नमस्कार करून सर्व बोटे एकमेकांना जोडण्याचा प्रयत्न करणे४) पाण्याच्या जारचं झाकण उघडण्याचा प्रयत्न करणेह्या व अशा अनेक व्यायामाच्या माध्यमातून तुमच्या क्रिया सुधारण्यासाठी फिजिओथेरपिस्ट मदत करतात. गरज असते ती रुग्णाने प्रयत्नशील राहण्याची. या आजाराचं निदान झाल्यावर घाबरून न जाता तातडीने उपचारांना सुरुवात करा. ह्या आजाराच्या वाढण्याचा वेग व्यायामांनी नक्कीच कमी करता येऊ शकतो.

(लेखिका फिजिओथेरपिस्ट आहेत. फिजिओमंत्र, विलेपार्ले, मुंबई)devikagadre99@gmail.comhttps://www.facebook.com/PhysioMantra-108691731387758/

टॅग्स :आरोग्य