Join us  

रिदमीक योगा; काय आहे हा योगप्रकार? कुणी - कसा करावा? फायदे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2021 3:22 PM

कोणताही व्यायामप्रकार करायला तुमचे मन आणि शरीर तयार लागते. हे दोन्ही फ्रेश असेल तर मनापासून तुम्ही त्या व्यायामाचा आनंद घेऊ शकता. रिदमीक योगा तुम्हाला आतून टवटवीत करतो.

ठळक मुद्देसंगीताच्या तालावर एका लयीत विविध प्रकारच्या आसनांची साखळी केली जाते. संगीताचा आनंद ही मिळतो आणि योगाचे फायदे ही मिळतातसूर्यनमस्कार हा जसा पारंपरिक योगा प्रकार तसाच हा पाश्चिमात्य योगा प्रकार

हा योगाचा एक आर्टिस्टिक प्रकार आहे. यात योगाचे कोणतेही नियम नसून फक्त संगीताच्या तालावर एका लयीत विविध प्रकारच्या आसनांची साखळी केली जाते. काही लोक पारंपरिक योगाची सुरुवात करायला कंटाळतात, त्या लोकांनी रिदमीक योगा जरूर करावा. याने संगीताचा आनंद ही मिळतो आणि योगाचे फायदे ही मिळतात. रिदमीक योगा हा सध्या लहानांपासून ते वयस्कर व्यक्ती अशा सर्वांमध्ये लोकप्रिय ठरत आहे. 

रिदमिक योगाचे प्रकार

१) पावर योगा - सूर्यनमस्कार हा पारंपरिक व्यायामप्रकार असून ही ज्याप्रमाणे वेगवेगळ्या आसनांची साखळी आहे, त्याचप्रमाणे पाश्चिमात्य लोकांनी योगाच्या काही आसनांचा वापर करुन ही साखळी तयार केली. ज्यामध्ये स्नायूंची ताकद वाढून श्वासाची गती वाढते आणि हृदयालाही फायदे मिळतात.  

२) एथलेटिक योगा - हा विन्यासा योगाचा प्रकार असून त्यामध्ये एका लयीत योग आणि श्वासाची सांगड घातली जाते. पाश्चात्य लोकांनी योगात केलेले हे बदल काहीसे वेगळे असले तरीही ते उपयुक्त आहेत.

३)  आर्टिस्टिक योगा - या योगामध्ये विशिष्ट अवयवावर भर दिला जातो. एकावेळी एकच अवयव म्हणजे हात किंवा पाय यावर भर दिला जातो. याने मांसपेशी पिळदार होण्यास मदत होते. तसेच वजन कमी होण्यासही हा योग प्रकार फायदेशीर ठरतो. 

४)  अॅक्रो योगा - हा प्रकार दोन व्यक्तींमध्ये एकमेकांच्या साह्याने केला जातो. यात हवेमध्ये आसन करुन कला सादर केली जाते. यात समतोल साधण्यासाठी पोटाची व पाठीच्या कण्याची ताकद महत्त्वाची असते. ताकद आणि लवचिकता या दोन्हीला महत्त्व असते.  

( Image : Google)

योगा व संगीत केव्हा एकत्र येते 

योगाचे शरीरावर व मेंदूवर परिणाम होतात. त्याला जर संगीताची जोड दिली तर त्याचा मनावर ही सकारात्मक परिणाम होतो. सुंदर योगाची वेगवेगळ्या आसनांची साखळी तयार होते. लयबद्ध पद्धतीने केलेल्या योगा मध्ये कंटाळाही येत नाही व तुम्ही योगा सहज १ ते २ तास आनंदाने करु शकता. नवरात्रीमध्ये हा योगा देवीच्या श्लोक मंत्रावर केला जातो. देवीची पूजा करताना ज्या मंत्रांचे पठण केले जाते ते लावून योगा केल्याने शरीरात व मनात एक शक्ती जागृत होते आणि चैतन्य निर्माण होते. आपण जसे संगीत निवडतो त्याचे फायदे शरीरावर होतात. नवरात्र म्हणजे देवीचा उत्सव ज्यामध्ये अनेक श्लोक, मंत्र यांचा जप केला जातो. श्लोक मंत्रोच्चार यांची स्पंदने शरीरावर तसेच मेंदूवर होतात. सूर्यनमस्कार घालताना जसे मंत्रोच्चार व आसन याची साखळी तयार केली आहे.त्याच प्रकारे वेगवेगळ्या आसनांची साखळी तयार करून पावर योगा आणि अॅक्रोयोगा केला जातो. 

( Image : Google)

रिदमीक योगाचे फायदे -             

१) मन आनंदी व उत्साही राहिल्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढते.

२) पोटाचे व पाठीचे व्यायाम एका लयीत होतात.

३) स्नायूंची ताकद वाढते, पोटाला पिळ बसून पचनशक्ती वाढण्यास मदत होते.

४) एकट्याने व्यायाम करायला कंटाळा येत असेल तर समूहात सर्वांबरोबर आनंदाने केला जातो.

५) फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते.

६) रक्त शुद्ध होण्यास मदत होते.

७) सांगितीक स्पंदनाने मेंदूवर आलेला अतिरिक्त ताण कमी होतो.

८) संगीतामुळे सकारात्मक दृष्टिकोन वाढतो, मनाची एकाग्रता वाढण्यास मदत होते.

९) व्यायामाने शरीरातील पेशींचे कार्य सुधारते, त्याचबरोबर संगीताच्या स्पंदनाने शरीरातील प्रत्येक पेशी अधिक कार्यक्षम होतात.

१०) संगीताच्या स्पंदनांचा मेंदूवर परिणाम होऊन हार्मोन्सचा समतोल राखला जातो व कार्य सुधारते. 

मनाली मगर-कदम

फिटनेसतज्ज्ञ

manali227@gmail.com

टॅग्स :योगफिटनेस टिप्सहेल्थ टिप्स