व्यायाम, मग तो कोणत्याही प्रकारचा असो तो केल्याने शरीरास फायदा व्हावा हाच उद्देश असतो. पण जर व्यायामामुळे शरीरात कुठे दुखत असल्यास, वेदन होत असल्यास व्यायामाचा त्रास होतो असं मानू नये. चुकीच्या पध्दतीचा व्यायाम केल्यानं हा त्रास होतो हे लक्षात घेऊन आपण व्यायाम करताना कुठे चुकतो आहोत याकडे लक्ष द्यावं असं फिटनेस तज्ज्ञ म्हणतात.
रनिंग हा एरोबिक व्यायामाचा महत्त्वाचा भाग. पळून व्यायाम करणं हे अनेकांना सोपं वाटतं. काय नुसतं पळायचं तर आहे असं त्यांचा ग्रह असतो. पण प्रत्यक्षात पळायला सुरुवात केली की दमछाक होते. पायाचे, पाठीचे स्नायू दुखावतात. याला कारणीभूत ठरतं ते पळण्याचं चुकीचं तंत्र. तज्ज्ञ म्हणतात तुम्हाला मॅरेथॉनमधे पळायचं असू देत किंवा आपलं आरोग्य चांगलं राहावं म्हणून पळायचं असू देत, पळण्याचा उद्देश कोणताही असला तरी पळण्याचा/ धावण्याचा शरीरास योग्य फायदा होण्यासाठी योग्य तंत्रानं धावायला शिकायला हवं. हे योग्य तंत्र कोणतं?
Image: Google
पळण्याचं योग्य तंत्र
1. पळताना खूप पुढे वाकून पळालं तर पुढच्या बाजूला भार पडतो. याचा परिणाम म्हणजे गुडघे आणि हाताच्या गतीवर होवून पळण्याची गती कमी होते. पळतान नेहेमी आपल्या दोन पायात खांद्याइतकं अंतर असलं पाहिजे. दोन पायात अंतर ठेवून थोडं पुढच्या बाजूस झुकून पळावं. पळताना आपल्या वजनाच भार पावलांवर, घोट्यांवर यायला हवा. तो गुडघ्यावर येत असेल तर पळतान चूक होतेय हे समजावं.
2. एका विशिष्ट लयीत, गतीत पळणं हे योग्य तंत्र आहे. जोरानं पळणं, आपले पाय पळताना जोरात जमिनीवर आपटणं ही चुकीची पध्दत आहे. यामुळे पायचे स्नायु दुखावतात. तसेच वेगानं , जोरानं पावलं टाकत पळल्याणं अस्वस्थही वाटतं. पळताना सहज आणि सुलभ वाटायला हवं यासाठी पळताना जमिनीवर पावलं हळुवार पडतील याकडे लक्ष द्यावं.
Image: Google
3. पळताना पावलांची हालचाल सरळ रेषेत व्हायला हवी. पळताना शरीर अधिक हलवल्यास पावलं सरळ रेषेत पडत नाही. अणि आपल्याला पळताना जास्त ऊजा खर्च करावी लागते. यामुळे पळताना थकवा जाणवतो आणि पायात वेदनाही.
4. कोणत्याही प्रकारच्या व्यायामात श्वासाच्या लयीला खूप महत्त्व आहे. पळताना आपला श्वासोच्छवास व्यवस्थित ठेवणं आवश्यक आहे. पळताना धाप लागणं, दम लागणं हे चुकीच्या पळण्याचे परिणाम आहेत. पळताना आपली श्वासाची गती काय असायला हवी याबाबत तज्ज्ञांकडून योग्य ते मार्गदर्शन घ्यायला हवं.पळताना दमछाक होणं म्हणजे चुकीचं पळणं होय. पळताना मन शांत असायला हवं. तरच पळण्यावर लक्ष केंद्रित होतं. पळताना श्वासांवर लक्ष केंद्रित करायला हवं असं तज्ज्ञ म्हणतात.
5. पळताना आपल्या शरीराची स्थिती योग्य असायला हवी. पळताना शरीर जर योग्य पोश्चरमधे असेल तर पळताना, पळून झाल्यावर शरीराला वेदना होत नाही. आणि जर वेदना होत असतील तर पळताना आपल्या शरीराची स्थिती चुकीची तर नाही ना याकडे लक्ष द्यायला हवं. पायात योग्य मापाचे शूज आहेत का? याकडेही लक्ष द्यायला हवं. तसेच पळताना उंच उड्या मारत पळू नये. त्याचा परिणाम पावलांवर अतिरिक्त भार पडून पावलं दुखतात.