धकाधकीची जीवनशैली, जंक फूड, कामाचे ताण आणि इतर अनेक गोष्टींमुळे वाढतं वजन ही सध्या अनेकांपुढील एक मोठी समस्या बनली आहे. हे वाढलेलं वजन आटोक्यात आणण्यासाठी वेळीच योग्य ते उपाय करणे आवश्यक असून तसे न केल्यास मात्र ही गोष्ट आपल्या हाताबाहेर जाते. एकदा वजन कमी करायचं म्हटलं की मग डाएटपासून व्यायामापर्यंत सगळे उपाय केले जातात. सध्या डाएटचे आणि व्यायामाचे बरेच फॅड असून त्यात वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. हे सगळे ठिक आहे पण तुम्ही जो कोणता व्यायाम आणि डाएट करत आहात त्यात सातत्य ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे. यात आपल्या शरीराचा प्रकार आणि आपल्याला किती वेळात किती वजन कमी करायचे आहे हे लक्षात घ्यायला हवे.
जास्त पैसे खर्च न करता तुम्हाला वजन कमी करायचे असल्यास धावणे आणि दोरीच्या उड्या मारणे हे दोन्हीही व्यायामप्रकार उपयुक्त ठरतात. यासाठी तुम्हाला फारशा वेगळ्या जागेचीही आवश्यकता नसते. या दोन्ही व्यायामप्रकारांमुळे ताकद वाढते आणि हृदयाच्या स्नायूंना बळकटी मिळण्याबरोबरच हाडांची घनता उत्तम राखण्यास मदत होते. या सगळ्याचा दिर्घायुष्यासाठी आणि एकूण फिटनेस सुधारण्यासाठी फायदा होतो. पण या दोन्हीपैकी आदर्श व्यायामप्रकार कोणता असे विचारल्यास दोन्हीचे फायदे समजून घेणे आवश्यक आहे. पाहूयात या दोन्ही व्यायामप्रकाराचे वजन कमी करण्यासाठी होणारे फायदे...
दोरीच्या उड्यांचे फायदे
१. वेगाने वजन कमी होण्यास मदत
तुम्हाला कमी वेळात जास्त कॅलरीज घटवायच्या असतील तर धावण्यापेक्षा दोरीच्या उड्या हा उत्तम उपाय आहे. यामध्ये एका मिनिटात १० ते १६ कॅलरीज जळतात. म्हणजे १० मिनिटांचे ३ सेट दोरीच्या उड्या मारल्यास तुमच्या ४८० कॅलरीज जळण्यास मदत होते. तर आठ मिनिटे धावणे हे १० मिनिटे दोरीच्या उड्या मारण्याप्रमाणे आहे. तुम्हाला पोटाचा आणि कंबरेच्या खालचा भाग कमी करायचा असेल तर दोरीच्या उड्या मारणे हा सर्वोत्तम व्यायाम ठरु शकतो. मात्र ज्यांना उच्च रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित समस्या आहेत अशांनी हा व्यायामप्रकार टाळावा.
२. कंबरेखालच्या स्नायूंना बळकट करण्यास मदत
दोरीच्या उड्यांमुळे तुमच्या कंबरेखालचे स्नायू बळकट होण्यास मदत होते. यामध्ये तुम्ही हलक्या पद्धतीने एकसलग उड्या मारल्यास तुमच्या गुडघ्यावर कमी ताण येतो. घोट्याची स्थिरता चांगली होते आणि पोटऱ्यांना चांगला आकार येतो. त्यामुळे ज्यांना कोणत्या कारणाने धावणे शक्य नाही अशांसाठी दोरीच्या उड्या हा अतिशय उत्तम व्यायामप्रकार आहे.
३. समन्वय आणि चपळता येते
दोरीच्या उड्यांमध्ये एकामागे एक उड्या मारायच्या असल्याने चपळता गरजेची असते. तसेच यामध्ये तुमच्या सर्वांगाचा समन्वय आवश्यक असतो. एकीकडे दोरी वर-खाली फिरवणे आणि दुसरीकडे उड्या मारणे अशा दोन क्रिया असल्याने सर्वांगाचा व्यायाम होतो. तोल सांभाळण्यासाठी, ताकद वाढविण्यासाठी आणि चपळता येण्यासाठी दोरीच्या उड्या हा एक उत्तम व्यायामप्रकार आहे.
धावण्याचे फायदे
१. कार्डिओ ताकद वाढण्यास मदत
धावणे हा हृदयाची आणि रक्तवाहिन्यांची ताकद वाढण्यासाठी म्हणजेच कार्डिओसाठी अतिशय उपयुक्त असा व्यायामप्रकार आहे. हृदयाला असलेल्या भिंतींची ताकद वाढविण्यासाठी आणि त्यांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी धावण्याचा व्यायाम उपयुक्त असतो. धावण्यामुळे तुमच्या शरीरातील रक्तप्रवाह चांगला राहतो आणि शरीरातील बॅड कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. जे लोक रोज धावण्याचा व्यायाम करतात त्यांचे हृदय अधिक कार्यक्षम तर असतेच पण त्यांचा पल्स रेटही कमी असतो. त्यामुळे या लोकांना हायपरटेन्शन आणि हृदयाशी संबंधित आजार होण्याची शक्यता ३५ ते ५५ कमी होते.
२. ताण कमी करण्यास मदत
तुम्ही मध्यम गतीने किंवा वेगाने धावल्यास तुमच्या मेंदूमध्ये काही रसायने तयार होतात. एंडोर्फिन, सेरोटोनिन अशी त्याची नाव असून यामुळे तुमचे ताण आणि भिती कमी होण्यास मदत होते. तसेच धावण्यामुळे तुमचे नैराश्य, एकटेपणा आणि इतरांपासून वेगळे राहण्याच्या भावना कमी होतात. या सगळ्यामुळे तुम्हाला रात्री शांत झोप लागण्यास मदत होते.
३. फुफ्फुसे मोकळी होण्यास मदत
फुफ्फुसांमध्ये असणारा जास्तीचा कार्बनडाय ऑक्साइड धावल्यामुळे बाहेर पडतो. तसेच ज्या घटकांमुळ कफनिर्मिती होते ते घटकही धावल्यामुळे कमी होतात. धावल्यामुळे श्वसनमार्गाच्या स्नायूंची ताकद वाढविण्यास मदत होते. हा मार्ग योग्य पद्धतीने मोकळा झाल्याने तुम्ही पुरेसा आणि अधिक मोकळा श्वास घेऊ शकता. त्यामुळे फुफ्फुसांशी संबंधित समस्यांपासून तुम्ही दूर राहू शकता.