वजन कमी करण्याचा आणि आरोग्य जपण्यचा उत्तम मार्ग म्हणजे पळण्याचा व्यायाम . हा व्यायाम कोणीही करु शकतं. धावण्याच्या सकरात्मक परिणमांबद्दल खूप बोललं जातं. खरंतर धावण्याचे सकारात्मक परिणाम असतातही जास्त. पण म्हणून धावण्याच्या धोक्यांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. तज्ज्ञ तर वेळोवेळी धावण्याचा व्यायाम करणाऱ्या महिलांना सावध करत असतात. रोज पळण्याचा व्यायाम करणाऱ्या महिलांनी हे धोके समजून घेऊन तशी काळजी घ्यायला हवी.
पळायला जाताना काय काळजी घ्यावी ? यावर पळताना पायात शूज असावेत आणि सोबत पाण्याची बाटली असली तरी पुरते. पण महिलांनी पळण्याच्या व्यायामातले धोके लक्षात घेऊन विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. ती काय घ्यायची हे समजण्यासाठी आधी हे धोके काय आहेत हे समजणंही आवश्यक आहे.
पळण्याच्या व्यायामाचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. महिलांच्या बाबतीत स्तन, गर्भाशय आणि योनीमार्ग यावर सर्वात जास्त परिणाम होतो. पळण्यादरम्यान गुप्तांगात येणाऱ्या घामामुळे योनी मार्गात यीस्ट संसर्गाचा त्रास होतो. पळण्यादरम्यान या नाजूक अवयवांवरचे गंभीर परिणाम टाळण्यासाठी पळण्यादरम्यान काळजी घेणं आवश्यक आहे.
पळण्याचा व्यायाम केल्यानंतर अनेक जणींना अंगावर पांढरा स्त्राव जातो. तज्ज्ञांच्या मतामुनुसार यात घाबरण्यासारखं काही नाही. पळण्यामुळे जास्तीचा पांढरा स्त्राव जात नाही तर पळण्यामुळे तो बाहेर पडतो एवढंच. यामुळे अस्वस्थता येत असेल तर निकर ही पातळ घालावी. पण या स्ग्त्रावामूळे जांघेत लाल चट्टे येत असेल , तिथे आग होत असेल तर काळजी घ्यावी. जांघेतील त्वचेच्या पीएच स्तराचं संतुलन बिघडल्यामुळे हे घडत हे समजून घ्यावं. तसेच यामुळे योनी मार्गात यीस्ट संसर्गाचाही धोका असतो. याबाबत लगेच डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांचा सल्ला घ्यावा.
स्तन हा अतिशय नाजूक अवयव आहे. पळण्याच्या व्यायामादरम्यान स्तनांची हालचाल जास्त होते. जर स्तनांचा आकार जास्त असेल तर पळण्यानं त्यांना बसणाऱ्या धक्यांची तीव्रता जास्त असते. यामुळे स्तन दुखण्याचा त्रास तर होतोच शिवाय स्तनांचा आकारही बिघडतो. स्तनांमधे वेदना असतील तर खांदे आणि हातांच्या हालचालींवर मर्यादा येतात. पळण्यादरम्यान स्तनांवर होणारा आघात टाळण्यासाठी चांगल्या गुणवत्तेची ब्रा किंवा स्पोर्टस ब्रा वापरवी. स्पोर्टस ब्रा मुळे स्तनांची हालचाल होत नाही.
सतत पळण्याचा व्यायाम केल्यास यूरिन लीक होण्याची समस्या निर्माण होऊ शकते. ही अशी स्थिती असते जेव्हा नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करुनही लघवीवर नियंत्रण राहात नाही. हे का होतं? याबाबत स्त्री रोग चिकित्सक डॉ. गीता वडनप म्हणतात की , 'हा त्रास विशेषत: नुकतंच बाळांतपण झालेल्या महिला किंवा रजोनिवृत्तीच्या टप्प्यातील महिलांना होतो. कारण त्यांचे ओटीपोटाचे स्नायू सैल पडलेले असतात. अनेक महिलांमधे ही समस्या ओटीपोटांच्या स्नायूंमधे असलेल्या अशक्तपणामुळे निर्माण होते. पळण्याचा व्यायाम करताना ओटीपोटावरचा दबाव वाढतो. पळण्यादरम्यान बसणाऱ्या धक्क्यांमुळे गर्भाशय हे मूत्राशयावर आणि मूत्रमार्गावर अधिक दाब निर्माण करतं. त्याचा परिणाम म्हणजे प्रयत्न करुनही लघवीवर नियंत्रण राहात नाही.' ही समस्या टाळायची असेल अथवा कमी करायची असेल त डॉ. वडनप म्हणतात की , 'ओटीपोटाचे स्नायू घट्ट करणारे व्यायाम करायला हवेत. शिवाय गर्भाशयासंबधित व्यायाम प्रकारही करायला हवेत!'
पळताना घ्यावी काळजी!
पळण्याचा व्यायाम वजन कमी करण्यास परिणामकारक असतो म्हणून अनेकजणी एकदम पळायला सुरुवात करतात. आणि आठवड्याभर पळ्ण्याचा व्यायाम करतात. पळण्याच्या व्यायामालाही तंत्र असतं. ते समजून न घेता व्यायाम केल्यास त्याचे तोटेच अनुभवायला येतात. जर पळण्याचा व्यायाम आपल्यासाठी नवीन असेल तर एकदम पळायला सुरुवात करु नये. पहिले चालावं आणि मग थोडा वेळ पळावं. पहिल्या आठवड्यात चालणं जास्त ठेवावं, पळणं कमी. दुसऱ्या आठवड्यात पळण्याचा वेग थोडासा वाढवावा. आणि तिसऱ्या आठवड्यात पळणं जास्त आणि चालणं कमी असं व्यायामाचं स्वरुप ठेवावं. सातही दिवस लागोपाठ पळण्याचा व्यायाम करु नये. आठवड्यातले चार ते पाच दिवस पळणं हे योग्य मानलं जातं. खूप पळणं हे महिलांच्या आरोग्यासाठी घातक असतं.