Lokmat Sakhi >Fitness > सायटिकाचा असह्य त्रास होतो आहे? कशानं छळतो हा शूटिंग पेनचा 'शार्प' त्रास? उपाय काय?

सायटिकाचा असह्य त्रास होतो आहे? कशानं छळतो हा शूटिंग पेनचा 'शार्प' त्रास? उपाय काय?

सायटिकाचा त्रास होतो अशी तक्रार अनेकजण करतात, काहीजणांचा त्रास लवकर कमी होत नाही असंही दिसतं, त्याची कारणं काय, उपाय कोणते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2021 04:41 PM2021-08-16T16:41:13+5:302021-08-16T17:05:23+5:30

सायटिकाचा त्रास होतो अशी तक्रार अनेकजण करतात, काहीजणांचा त्रास लवकर कमी होत नाही असंही दिसतं, त्याची कारणं काय, उपाय कोणते?

Sciatica: Causes, Symptoms, Treatment, and what is the best exercise for sciatica | सायटिकाचा असह्य त्रास होतो आहे? कशानं छळतो हा शूटिंग पेनचा 'शार्प' त्रास? उपाय काय?

सायटिकाचा असह्य त्रास होतो आहे? कशानं छळतो हा शूटिंग पेनचा 'शार्प' त्रास? उपाय काय?

Highlightsअनेकदा दुखणं किती जुनं आहे यावर उपचारांची दिशा व बरं व्हायला लागणारा वेळ ठरतो.  त्यामुळे वेळ वाया न दवडता वेळीच लक्षणे ओळखा व दुर्लक्ष न करता डॉक्टरांकडे जाऊन योग्य सल्ला व पुढील उपचार घ्या.

डॉ. देविका गद्रे

बऱ्याच जणांना सायटिका हा शब्द माहित असतो मात्र ह्याचा त्रास नेमका कशामुळे सुरु होतो, त्याची लक्षणे काय असतात व त्यावर उपचार काय असतात याबद्दल त्रोटक ज्ञान असते. घराघरात पडणाऱ्या या प्रश्नांची उत्तरे शोधायचा आज प्रयत्न करू.
सायटिका ही आपल्या शरीरातील सर्वात मोठी नस आहे. ५ नसांनी मिळून ही एक मोठी नस बनते. गुढघ्याच्या मागच्या भागात ती २ इतर नसांमध्ये विभागली जाते. एका नसेला टीबीएल तर दुसरीला कॉमन पेरोनिअल असे म्हणतात. सायटिकाचे दुखणे हे विशेषतः कंबरेपासून मांडीच्या मागच्या बाजूला जाणवू लागते. बऱ्याचदा हे खाली येत पसरत जाऊ लागते. हे दुखणे कुठे व किती प्रमाणात जाणवणार हे सायटिक नस कंबरेत कुठे दाबली गेली आहे यावर अवलंबून असते. या दुखण्याला बहुदा शूटिंग पेन किंवा शार्प पेन अशा शब्दात मांडले जाते.

(छायाचित्र : गुगल)

लक्षणं कोणती?


१) कंबरेपासून एका बाजूचा पार्श्वभाग, मांडीचा मागचा भाग दुखणे.
२) पोटरीत असह्य वेदना होणे.
३) जडपणा वा बधीरपणा येणे.
४) पावलांमद्धे कमजोरी वाटणे.
५) मुंग्या आल्यासारख्या वेदना होणे.
६) हालचाल केल्यास अधिक वेदना होणे.

कशाने होतो हा त्रास?


१) हरनिएटेड डिस्क: एखादा मणका आपल्या जागेवरून सरकणे किंवा मणक्याचा काही भाग सरकणे. यात ४ टप्पे असतात. जसजसा एक एक टप्पा पुढे जातो तसतसे दुखणे वाढत जाते व लक्षणेही बदलतात.
टप्पा पहिला (Disc Degeneration): फक्त कंबरदुखी
टप्पा दुसरा (Prolapse): कंबरदुखी व पायदुखी
टप्पा तिसरा (Extrusion): कंबरदुखी, पायदुखी व न्यूरॉलॉजिकल त्रास
टप्पा चौथा (Sequestration): अतोनात पायदुखी.

(छायाचित्र : गुगल)

सुरुवातीला काय लक्षणं दिसतात?


शिंकताना किंवा खोकताना वा पुढे वाकण्यास त्रास होणे. हा त्रास ३० ते ५० वर्षे वयामध्ये सुरु होतो.
हरनिएटेड डिस्क हे साएटिकाचे सर्वात मुख्य कारण आहे.
जर हरनिएटेड डिस्क हे कारण असेल व दुखणे वाढतच गेल्यास काहीवेळा डॉक्टर शास्त्रक्रियेचाही सल्ला देतात. यात  मणक्याचा जो भाग नसेला दाबत असतो तो भाग काढून टाकण्याचा उपाय असतो. यामुळे नसेला होणारी इजा थांबून लवकर बरे होण्यास मदत होते. हल्ली नवीन तंत्रज्ञानामुळे ही शस्त्रक्रिया मायक्रोस्कोपच्या आधारे करता येऊ शकते.
२) स्पायनल स्टेनोसिस, आरथ्रायटिस व डिजेनेरेटिव्ह डिस्क डीसइझ: स्टेनोसिस म्हणजे निमुळते होणे. कण्यातील जागा निमुळती होत गेल्यामुळे नसा दाबल्या जातात. हा वयानुसार होणारा त्रास आहे. उभे राहिल्यावर वा चालताना त्रास होऊ लागतो व बसल्यावर कमी होतो. साधारण ५० वर्षे वयाच्या पुढे हा त्रास दिसून येतो.

चुकीचे निदान होण्यामागची काही कारणे


पायरिफॉर्मिस सिंड्रोम: पार्श्वभागावर असलेल्या या ‘V’ आकाराच्या स्नायुमद्धे जर ताठरता आली असेल तर साएटिका नसेला हा स्नायू कात्रीसारखा दाबू लागतो. या अतिरिक्त दाबामुळे साएटीकाचा त्रास सुरु होतो. ही विशेष उल्लेखाची गोष्ट आहे कारण ती अनेकदा चुकीचे निदान होण्यास कारणीभूत ठरते. हा स्नायू सेक्रल स्पाइनला मांडीच्या हाडाच्या वरच्या भागाशी जोडतो आणि काही क्रियांमद्धे मदत करतो. साएटिक नस अतिशय जवळ असल्याने, पायरिफॉर्मिस स्नायूला कोणतीही दुखापत किंवा जळजळ "सायटिकाची लक्षणे" दिसू शकतात. अतिदाब दिल्यास वेदना वाढणे, वाकताना किंवा पायऱ्या चढताना वेदना वाढणे आणि खुब्याच्या हालचाली कमी होणे अश्या समस्या दिसतात. फिजिओथेरपीमद्धे ह्यासाठी पायरिफॉर्मिस स्ट्रेचिंग, तसेच हॅमस्ट्रिंग स्ट्रेच दिले जाते. ह्या स्नायूंमधील ताण कमी झाल्यास वेदना कमी व्हायलासुद्धा मदत होते. याचबरोबर योग्य तेवढी विश्रांती घेणेही अत्यंत महत्वाचे आहे.

एसआय जॉईंट पेन:  म्हणजे जिथे मणके संपून पार्श्वभागाची सुरुवात होते तिथल्या सांध्याला बऱ्याचदा कंबरदुखी समजून चुकीच्या प्रकारे हाताळले जाते. ह्यात सतत चालल्याने वा उभे राहिल्याने त्रास होतो तर बसल्याने त्रास थांबतो. म्हणूनच सायटिकाचे निदान करताना संपूर्ण मूल्यांकन आणि निदानासाठी संपूर्ण इतिहास आणि शारीरिक तपासणी आवश्यक असते. नक्की कारण कळण्यासाठी एक्स रे व एमआरआयच्या साहाय्याने निदान करता येणे शक्य आहे.

उपचार काय?


वैद्यकीय उपचारांमध्ये डॉक्टर वेदनशामक व स्नायू शिथिल करणारी औषधे देतात.
  फिजिओथेरपीमध्ये शिकवले जाणारे व्यायाम व दुखणे कमी करण्यासाठी वापरली जाणारी उपकरणे ह्यांच्या साहाय्याने सायटिकामधून बरे होण्यास नक्कीच मदत होते. 
तसेच ताकद वाढवण्याच्या व्यायामांसोबतच स्ट्रेचिंग ह्या प्रकारातील व्यायामसुद्धा सांगितले जातात व अतिशय उपयुक्तही ठरतात. 
दुखणे कमी करण्यासाठी गरम पाणी किंवा थंड बर्फाचा वापर करू शकता. तसेच ज्या क्रियांमुळे दुखणे वाढते अशा क्रिया टाळा व ताठ बसण्याचा सराव करा. 
शक्ती वाढवण्यासाठी व्यायामांमध्ये विविधता आणा. जसे की झोपून व्यायाम जमत असतील तर बसून अथवा उभे राहून पायाचे व्यायाम करण्यावर भर द्या. 
नियमित हलके व्यायाम जसे की चालणे, पोहणे इत्यादी थांबवू नका. कंबरेच्या व पायाच्या स्नायूंना मजबूत करण्यावर भर द्या.
अनेकदा दुखणं किती जुनं आहे यावर उपचारांची दिशा व बरं व्हायला लागणारा वेळ ठरतो.
 त्यामुळे वेळ वाया न दवडता वेळीच लक्षणे ओळखा व दुर्लक्ष न करता डॉक्टरांकडे जाऊन योग्य सल्ला व पुढील उपचार घ्या.

(लेखिका फिजिओथेरपिस्ट आहेत. फिजिओमंत्र, विलेपार्ले, मुंबई)
devikagadre99@gmail.com
https://www.facebook.com/PhysioMantra-108691731387758/

Web Title: Sciatica: Causes, Symptoms, Treatment, and what is the best exercise for sciatica

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य