योगा से ही होगा... या संकल्पनेवर शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) दांडगा विश्वास आहे. म्हणूनच तर काहीही झालं तरी ती रोजचा व्यायाम आणि रोजचा तिचा योगा काही सोडत नाही. आता काही दिवसांपुर्वीच तिला अपघात झाला आणि तिचा पाय मोडला. पण तरी देखील तिने तिचं रोजचं वर्कआऊट मात्र सोडलेलं नाही. मागच्या आठवड्यात तिने व्हिलचेअरवर बसून काही स्ट्रेचिंगचे (stretching) व्यायाम करून दाखवले आणि आता या आठवड्यात तिने तिच्या चाहत्यांना आणखी जबरदस्त फिटनेस मोटिव्हेशन दिलं आहे (dumbbell workout).
शिल्पाने नुकताच जो व्हिडिओ शेअर केला आहे, त्यामध्ये ती व्हिलचेअरवर बसून डंबेल्स वर्कआऊट करते आहे. पैर टुटा है, आर्म नही... असं म्हणत तिने तिच्यातली जिद्द आणि खिलाडू वृत्ती दाखवून दिली आहे. हे जे वर्कआऊट ती करते आहे, त्यात ती मसल्स बिल्डिंगसाठी व्यायाम करताना दिसते आहे. कंबरेच्या वरच्या शरीराचं वर्कआऊट होण्यासाठी हा व्यायाम करावा, असं तिचं म्हणणं आहे. त्यामुळे ज्यांना व्यायामाचा कंटाळा आला आहे, ते अगदी एकाजागी बसून तिच्यासारखं वर्कआऊट करू शकतात. व्यायामात खंड पडण्यापेक्षा असा व्यायाम करणं कधीही चांगलंच..
शिल्पा नेमका कसा व्यायाम करते आहे
- या व्हिडिओमध्ये तिने हातात डंबेल्स घेतले असून सुरुवातीला ते वर खाली यापद्धतीने हलविण्याचा व्यायाम ती करतेय.
- त्यानंतर पुढे- मागे अशा पद्धतीने ती हातांची हालचाल करते आहे.
- तिसऱ्या प्रकारात डंबेल्स छातीसमोर धरायचे आणि नंतर हात दोन्ही बाजूंना लांबवायचे, पुन्हा जवळ आणायचे, अशा पद्धतीचा तिचा व्यायाम सुरू आहे.
डंबेल्स वर्कआऊटचे उपयोग
- हाताच्या, खांद्याच्या आणि मानेच्या स्नायूंना बळकटी देण्यासाठी हा व्यायाम उपयुक्त आहे.
- पाठ दुखत असेल तर हा व्यायाम करणे फायद्याचे ठरते.
- पाठीच्या कण्याची लवचिकता वाढविण्यासाठी उपयुक्त व्यायाम.
- बॉडी पोश्चर सुधारण्यासाठी या व्यायामाची मदत होते.