जीने चढणे हल्ली काहीसे दुर्मिळच झाले आहे. प्रत्येक सोसायटीला आणि ऑफीससाठी अगदी मॉलमध्ये किंवा रेल्वे स्टेशनवरही लिफ्ट आणि सरकते जीने असल्याने जीने चढणे काळाच्या ओघात काहीसे मागे पडले. असे असले तरी कधी वीज गेली किंवा काही तांत्रिक बिघाड झाला की आपल्याला जीने चढावेच लागतात. एखाद्या ठिकाणी लिफ्ट नसेल तर जीने चढण्याशिवाय पर्यायही नसतो. अशावेळी आपल्याला जीने चढायचे म्हणजे टेन्शन येते. प्रत्यक्षात जीने चढणे ही फार थकवणारी गोष्ट नसली तरी त्याची सवय नसल्याने आपल्याला आधीच टेन्शन येते (What causes shortness of breath climbing stairs).
जीने चढण्याची सवय नसल्याने आपल्याला दोन जीने चढले तरी खूप दम लागतो, घाम येतो आणि वर जाऊच नये असे वाटायला लागते. दम लागल्याने जीना चढताना आपल्या नकळत आपल्या हृदयाचे ठोके वाढतात. जीना चढताना आपण गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरुद्ध दिशेने जात असल्याने दम लागणं स्वाभाविक आहे. मात्र हा दम प्रमाणापेक्षा जास्त लागत असेल तर त्यामागचं कारण शोधायला हवं. हल्ली व्यायामाला वेळ नसल्याने व्यायाम म्हणून जीने चढण्याचा सल्ला तज्ज्ञ मंडळई देतात. मात्र दुसरीकडे आपल्याला एखादवेळी जीना चढताना दम लागत असेल तर वेळीच जागे होण्याची आणि आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे हे लक्षात घ्यायला हवे. आता जीने चढताना इतका दम का लागतो याविषयी समजून घेऊया...
१. श्वसनासंबंधी समस्या
श्वास घेण्यासाठी आपल्याला डोके, नाक आणि फुफ्फुसांची आवश्यकता असते. श्वसनाच्या प्रक्रियेमध्ये आपण ऑक्सिजन शरीरात घेऊन कार्बनडाय ऑक्साईड बाहेर टाकतो. श्वसनाच्या कार्यात अडथळा आला तर आपल्याला श्वास घेताना काहीसा त्रास होतो. हा त्रास जास्त प्रमाणात होत असेल तर आपल्याला श्वसनाशी संबंधित काहीतरी त्रास आहे हे लक्षात घ्यायला हवे. इतकेच नाही तर असा दम लागणे ही एकप्रकारची अॅलर्जी किंवा दम्याचे लक्षण असी शकेल.
२. लठ्ठपणा
आपल्या शरीरावर आपल्याला पेलवेल त्यापेक्षा जास्त प्रमाणात चरबी असली तर आपल्याला शरीर उचलणे अवघड जाते. त्यामुळे आपल्याला जास्त दम लागू शकतो. त्यामुळे जीना चढताना प्रमाणाबाहेर दम लागत असेल आणि आपण लठ्ठ असू तर वेळीच हा लठ्ठपणा कमी करण्याची गरज आहे हे यावरुन लक्षात घ्यायला हवे. ही धोक्याची घंटा आहे असे समजून लठ्ठपणा कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
३. कमकुवत हृदय
जीने चढताना खूप दम लागणं आणि घाम येणं, छातीत दुखणं हे हृदयाचे कार्य सुरळीत नसल्याचे लक्षण असू शकते. त्यामुळे असे होणाऱ्यांनी त्वरीत हृदयाची तपासणी करुन घ्यायला हवी. यामुळे हृदयरोगाचा धोका टळून आपला जीव धोक्यात जाणार नाही याची खबरदारी आपण घेऊ शकतो. हृदयाचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करणे आणि ताणविरहीत जीवन जगणे आवश्यक आहे, हे लक्षात ठेवा.