Join us  

दुपारी जेवल्यानंतर छोटीशी डुलकी काढण्याचे ५ फायदे, फिटनेस एक्सपर्ट सांगतात छोट्या झोपेची जादू...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2023 7:07 PM

Should you take a nap after lunch? Here’s what this nutritionist suggests : दुपारी लहानशी पॉवर नॅप काढा, बघा तुमची कार्यक्षमता किती वाढते.

'झोप' हा तसा सगळ्यांच्याच आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांना झोप पूर्णपणे घेता येत नाही. सकाळी लवकर ऑफिसला जाणे आणि उशिरा येणे यांसारख्या अनेक कारणांमुळे काहीजणांची झोप पूर्ण होत नाही. असं पहायला गेलं तर बहुतेक सगळ्यांनाच दुपारी जेवल्यानंतर छोटीशी झोप घेणं फार प्रिय असत. दुपारी जेवणानंतर खूप छान झोप येते अस अनेकांच म्हणण असत. दुपारी मस्त जेवणावर ताव मारून झोपणे म्हणजे स्वर्गसुखच! दुपारच्या झोपेपासून अनेकजण स्वत:ला रोखू शकत नाही. 

अनेक व्यक्तींना दुपारी झोपण्याची सवय असते. ही दुपारची छोटीशी झोप निरोगी आरोग्यासाठी अत्यावश्यक आहे. आपण आपल्या आजूबाजूला बऱ्याच व्यक्ती पाहतो, ज्यांना दुपारी जेवण झाले की डुलक्या येण्यास सुरुवात होते.मात्र, दुपारचे झोपणे योग्य आहे का? अनेक जण म्हणतात दुपारचे थोडे तरी झोपावे. ते आरोग्यासाठी चांगले असते. पण, हे खरे आहे का? तसेच दुपारी कोणी झोपणे आवश्यक आहे आणि का? त्याचप्रमाणे दुपारी झोपण्याचे फायदे काय आहेत, सुप्रसिद्ध न्यूट्रिशनिस्ट आणि फिटनेस एक्सपर्ट ऋजुता दिवेकर काय सल्ला देतात ते पाहूयात(Should you take a nap after lunch? Here’s what this nutritionist suggests). 

दुपारी जेवल्यानंतर झोपण्याचे फायदे : - 

१. दुपारी जेवल्यानंतर काही काळाने दुपारची छोटीशी झोप घेणे गरजेचे असते. दुपारची छोटीशी झोप घेणे हे आपल्या हृदयासाठी चांगले असते. विशेषत: अशा लोकांसाठी, ज्यांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे किंवा ज्यांना यापूर्वी हृदयाशी संबंधित कोणतीही समस्या होती.

२. दुपारच्या झोपेमुळे आपल्या शरीरातील हार्मोन्सचा समतोल सुधारण्यास मदत होते. मधुमेह, पीसीओडी, थायरॉईडच्या रुग्णांनी जेवणानंतर काहीवेळासाठी छोटीशी झोप घ्यावी.

३. दुपारच्या झोपेमुळे आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. सतत चिडचिड होणे, अपचनाची समस्या, डोक्यात होणारा कोंडा, चेहेऱ्यावरील ऍक्ने, पुरळ यांसारख्या विविध समस्यांवर मात करण्यासाठी दुपारची झोप घेणे महत्वाचे असते. 

४. आपल्यापैकी बऱ्याचजणांना असे वाटते की, दुपारचे झोपल्यामुळे आपल्याला रात्री झोपच येणार नाही. परंतु हे असे नसून याउलट, दुपारी एक डुलकी घेतल्याने रात्री चांगली झोप लागते. जर आपल्याला झोपेची समस्या असेल किंवा आपण अनेकदा प्रवास करत असाल तर दुपारच्या जेवणानंतरची एक छोटीशी  डुलकी तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे.

५. आपल्याला कोणत्याही प्रकारचा आजार असेल किंवा वर्कआऊट करुन आपले शरीर खूपच थकले असेल तर अशावेळी आपल्या शरीराला लवकर रिकव्हर करण्यासाठी दुपारची झोप अतिशय महत्वाची असते. 

६. दुपारच्या छोट्याशा झोपेमुळे वजन कमी करण्यासदेखील मदत होते. 

 

दुपारी झोपण्याची ही आहे योग्य पद्धत :- 

१. दुपारची झोप घेतल्याने शरीराला अनेक चांगले फायदे होतात. परंतु या सर्व फायद्यांसाठी, दुपारची झोप योग्य प्रकारे घेणे खूप महत्वाचे आहे.

२. सर्वप्रथम, वामकुक्षी म्हणजे आपल्या शरीराच्या डाव्या बाजूवर झोपावे. 

३. दुपारी झोपताना फीटल पोजीशन म्हणजेच बेबी पोजीशनमध्ये झोपले पाहिजे. एखादे लहान मुलं जसे झोपते त्याच स्थितीत आपल्याला झोपले पाहिजे. 

४. दुपारची झोप ही १० ते ३० मिनिटांचीच असावी. त्यापेक्षा जास्त वेळ झोपून राहू नये. 

५. घरांतील लहान मुलं, वृद्ध किंवा आजारी व्यक्ती यांनी एकूण ९० मिनिटांची दुपारची झोप घेतली पाहिजे. 

६. दुपारी १ वाजल्यापासून ते ३ वाजेपर्यंतचा काळ हा दुपारच्या झोपेसाठीचा उत्तम वेळ मानला जातो. 

 

दुपारी झोपा पण ... 

१. संध्याकाळी ४ ते ७ या वेळेत अजिबात झोपू नका. 

२. दुपारच्या जेवणांनंतर चहा, कॉफी, सिगरेट, चॉकलेट यांसारख्या गोष्टी टाळा. 

३. दुपारच्या किंवा रात्रीच्या झोपेपूर्वी मोबाईल फोनचा किंवा इतर कोणत्याही गॅजेट्सचा वापर करणे टाळा. 

४. टीव्ही बघत बघत झोपणे संपूर्णपणे टाळावे.

टॅग्स :फिटनेस टिप्स