सुंदर साजिरा श्रावण आला.... असं म्हणत श्रावण महिन्याला सुरूवात झाली आहे. व्रतवैकल्यांनी सजलेला श्रावण महिना म्हणजे महिला वर्गाची एकच लगबग. पुजाअर्चा, व्रतवैकल्ये, देवदर्शन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपवास ही श्रावणाची वैशिष्ट्ये. यामध्ये श्रावणी सोमवार तर बहुसंख्य महिला आणि तरूणी करत असतात. काही जणी तर श्रावणात एकभुक्त म्हणजे महिनाभर एकदाच जेवण अशा प्रकारचा उपवासही करतात.
याशिवाय मागील काही वर्षांपासून उपवासाचा एक नवाच ट्रेण्ड आला आहे. एरवी तोंडावर ताबा राहत नाही आणि त्यामुळे मग वजन कमी होत नाही. पण जर श्रावणात उपवास केले तर आपोआपच उपवास कसा मोडायचा, म्हणून तोंडावर नियंत्रण राहील आणि त्यामुळे मग वजनही आटोक्यात राहील, असा विचार अनेकजणी करत आहेत. त्यामुळे आता डाएटींगचा उत्तम पर्याय म्हणूनही काही जणी श्रावणातल्या उपवासांकडे पाहत आहेत. तुमची श्रद्धा असेल, तर उपवास जरूर करा. पण आपल्याला तो उपवास लाभतोय ना, आपल्या आरोग्याला तो मानवतोय ना, याची काळजी जरूर घ्या.
उपवासाची पथ्ये
१. उपवास म्हणून दुप्पट खाऊ नका. पचनसंस्थेला आराम मिळावा, यासाठी मुख्यत: उपवास केला जातो. मात्र आपण उपवासाची सगळी परिभाषाच बदलून टाकली आहे. एकदशी आणि दुप्पट खाशी असा प्रकार करू नका. कारण यामुळेच उपवासाचा फायदा तर सोडा पण त्रासच जास्त होऊ शकतो.
२. उपवासाच्या दिवशी जर शेंगदाणा लाडू, साबूदाना खिचडी यांचे सेवन खूप जास्त केले तर शरीरातील आम्लप्रवृत्ती वाढते आणि त्यामुळे मग उपवासाच्या रात्री किंवा दुसऱ्या दिवशी ॲसिडीटीचा त्रास होऊ शकतो.
३. उपवासाच्या दिवशी भगर, राजगिरा, लाडू, शिंगाड्याचे पदार्थ, मोसंबी, संत्री, पेरू, अननस, अक्रोड, काजू, बदाम, खारीक अशी टणक कवच असलेली फळे सेवन करावीत. हे पदार्थ शरीराला भरपूर जीवनसत्वे देतात. त्यामुळे उर्जा मिळते आणि थकवा जाणवत नाही.
४. अवेळी जेवण करणाऱ्या व्यक्तींनी, ज्यांचे हिमोग्लोबीन १२. ५ पेक्षा कमी आहे अशा व्यक्तींनी किंवा ज्यांचे उंचीच्या मानाने वजन खूप कमी अथवा खूप जास्त आहे, अशा व्यक्तींनी उपवास करणे टाळावे.
५. उपवास केल्याच्या दुसऱ्या दिवशी जर थकवा जाणवत असेल, तर उपवास करताना आपले खाण्या- पिण्यात काही चुकले आहे, असे समजावे आणि उपवासाची पद्धत बदलण्याचा प्रयत्न करावा.
६. ज्या व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे, जी व्यक्ती रोजचा सकस आहार योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात घेते, अशा व्यक्तींनी उपवास करण्यास हरकत नाही.
तज्ज्ञ सांगतात...
योग्य पद्धतीने उपवास करणे चांगलेच आहे. मात्र उपवासाचा तुमच्या शरीराला लाभ होतो, अथवा नाही हे पाहणेही तितकेच गरजेचे आहे. उपवास केल्यावर दुसऱ्या दिवशी तुम्हाला उत्साह वाटत असेल, तर उपवास तुमच्यासाठी लाभदायक आहे, असे समजावे. मात्र थकवा जाणवत असेल तर उपवास करण्याच्या पद्धतीत बदल करावा. उपवासाच्या दिवशी आहारात फळांचा वापर केल्यास नक्कीच उपवास लाभदायक ठरतो.
- डॉ. अलका कर्णिक. आहारतज्ज्ञ