तुम्ही झिरो फिगर आहात का? तसे असाल तरच तुम्ही सुंदर दिसता आणि मिरवण्याजोगे असता असे अनेकींना वाटते. मग साइज झिरो होण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. पण अशी साइज झिरो असल्यानेच तुम्ही फीट आणि फाइन असता असे नाही. तर तुमचा साइज विशेष महत्त्वाचा नसून तुमची तब्येत चांगली असणे महत्त्वाचे आहे. असे मॉडेल अंकिता कोवर हिने नुकतेच सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले आहे. अभिनेता मिलिंद सोमण आणि त्याची पत्नी अंकिता कोंवर सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असल्याचे पाहायला मिळते. हे दोघेही फिटनेस फ्रिक असून फिटनेसशी निगडित व्हिडियो, फोटो किंवा पोस्टच्या माध्यमातून ते कायम काही ना काही अपलोड करत असतात. या माध्यमातून ते त्यांच्या चाहत्यांना फीट राहण्याची प्रेरणा देत असतात.
अंकिता तिची लाईफस्टाईल आणि फिटनेसमुळे प्रचंड चर्चेत असते. अलिकडेच अंकितानं एक फोटो शेअर केला असून त्यामध्ये ती मुलींना साइज झिरो असण्याची गरज नाही तर तुम्ही आरोग्यदायी असणं गरजेचं आहे असं सांगते. तिने नुकतीच इन्स्टाग्रामवर याविषयीची पोस्ट केली असून त्या माध्यमातून ती तरुणींशी संवाद साधत असल्याचे दिसते. अंकिताने २०१८ मध्ये मिलिंद सोमणशी लग्न केले. तेव्हापासून त्या दोघांच्या वयातील अंतरामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले. मात्र त्यांनी त्यांचे कपल गोल्स कायम ठेवले. नुकतेच त्यांनी आपले समुद्रावरचे अनेक फोटो आणि व्हिडियोही पोस्ट केले होते.
अंकिता तिच्या आताच्या पोस्टमध्ये म्हणते, सध्या अनेक जण साइजकडे लक्ष देऊ नका हे सांगत आहेत ही चांगली गोष्ट आहे. तुम्हाला जीवनाचा पुरेपूर आनंद घ्यायचा असेल तर तुमची तब्येत चांगली असणे महत्त्वाचे आहे यावर अंकिता आपल्या पोस्टमध्ये भर देताना दिसत आहे. शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिकदृष्ट्या फीट असाल तर ते तुमच्या कसे फायद्याचे आहे हेच अंकिता या पोस्टमधून सांगत आहे. शारीरिकदृष्ट्या चांगले असाल तर तुम्हाला पाहिजे ते तुम्ही करु शकता. मानसिकदृष्ट्या तुम्ही चांगले असाल तर आयुष्यातील वाईट दिवसांच्या पलिकडे जाणे तुम्हाला शक्य होते आणि अध्यात्मिकदृष्ट्या तुम्ही सबळ असाल तर तुम्ही आयुष्य समजून घेत त्याचा आस्वाद घेऊ शकता.
यानंतर अंकिता म्हणते मला माझ्या कंबरेची साइज, माझे वजन यापेकी काहीही माहित नाही. पण माझी तब्येत चांगली आहे हे मी नक्की सांगू शकते कारण मागील काही वर्षांपासून मी त्यासाठी कष्ट घेत आहे. ही माझ्यासाठी एक शिकण्याची प्रक्रिया असून मी रोज काहीतरी नवीन शिकत आहे. तुम्हीही तुमच्यासाठी काय महत्त्वाचे आहे ते पाहणे महत्त्वाचे आहे.