लहान असताना दोरीवरच्या उड्या (skipping rope) हा खेळ प्रत्येकीनं खेळलेला असतो. कोण न थांबता किती उड्या मारतो, एका मिनिटात कोणाच्या किती उड्या होतात अशा स्पर्धाही मैत्रिणींशी लावलेल्या असतात. पण जसजसं मोठं होतो तसा हा खेळ मागे पडत जातो. पण विषय जेव्हा फिटनेसचा येतो, वजन कमी करण्याचा येतो, व्यायामाचा येतो तेव्हा लहानपणीचा हा खेळ व्यायाम म्हणून खूप महत्वाचा ठरतो. वजन कमी करण्यासाठी, फिटनेस राखण्यासाठी (exercise for fitness) रोज किमान 45 मिनिटं व्यायाम करणं गरजेचं असतं. पण व्यस्त दिनचर्येमुळे अनेक महिलांना 45 मिनिटं व्यायामासाठी काढणं अवघड होतं. फिटनेस तर हवा, पण वेळ नाही अशी समस्या अनेकींच्या समोर असते. त्यांच्यासाठीचं सोपं उत्तर म्हणजे रोज फक्त 15 मिनिटं काढा आणि दोरीवरच्या उड्या (skipping for fitness) मारा. दोरीवरच्या उड्या मारुन वजन , वाढलेलं पोट कमी करता येतं आणि इतरही फायदे मिळवता येतात. फिटनेस तज्ज्ञ अक्षय चोप्रा दोरीवरच्या उड्या मारण्याच्या फायद्यांबद्दल सविस्तर माहिती सांगतात. त्यांच्या मते वजन कमी करणं, फिटनेस राखणं यासोबतच त्वचा आणि ह्दयाच्या आरोग्यासाठी दोरीवरच्या उड्या मारणं (benefits of skipping rope) हे फायदेशीर ठरतं असं अक्षय चोप्रा सांगतात.
Image: Google
दोरीवरच्या उड्या मारण्याचे फायदे..
1. दोरीवरच्या उड्या हा व्यायाम करण्याचा सर्वात प्रभावी आणि फायदेशीर मार्ग आहे. कमी वेळात जास्त उष्मांक जाळण्यासाठी हा व्यायाम उपयुक्त ठरतो. केवळ 15 मिनिटं दोरीवरच्या उड्या मारल्याने वजन कमी होण्यापासून बाॅडी डिटाॅक्स होवून त्वचा चांगली होण्यापर्यंतचे फायदे मिळतात. कमी वेळात जास्त फायदे मिळवून देणारा व्यायाम म्हणून दोरीवरच्या उड्या या व्यायाम प्रकाराकडे बघितलं जातं. वजन कमी करण्यासाठीचा प्रभावी व्यायाम म्हणजे दोरीवरच्या उड्या मारणं. दोरीवरच्या उड्या नियमित मारल्यास शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो. शरीरातील अतिरिक्त चरबी जळते. शरीर सुडौल होतं. केवळ 15 मिनिटं दोरीवराच्या उड्या मारल्यानं 370 कॅलरीज जळतात.
2. शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांसाठी वेगवेगळे व्यायाम प्रकार करावे लागतात. पण वेळेअभावी प्रत्येक अवयवाचा व्यायाम शक्य नसतो अशा वेळी एकाच वेळी संपूर्ण शरीराचा व्यायाम होण्यासाठी दोरीवरच्या उड्या माराव्यात. दोरीवरच्या उड्या या व्यायाम प्रकाराने एकाच वेळी संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. दोरीवरच्या उड्या मारताना हात, पाय, पोट ,मान यांचा चांगला व्यायाम होतो. हाता पायाचे स्नायू मजबूत होतात. तसेच दोरीवरच्या उड्यांमुळे शरीर सुडौल होतं.
3. वेळेअभावी शारीरिक व्यायाम पुरेसा होत नसल्यास पाय दुखणं, पायांवर सूज येणं अशा समस्या उद्भवतात. पण दोरीवरच्या उड्या नियमित मारल्यास पाय आणि स्नायू मजबूत होतात. शरीरातील अवघडलेपण दूर होवून शरीर लवचिक होतं.
Image: Google
4. दोरीवरच्या उड्या मारणं हा उत्तम कार्डियो व्यायाम प्रकार आहे. या व्यायामानं हदयरोगाचा धोका कमी होतो. हदयाच्या धमन्या आणि नसांमध्ये रक्त प्रवाह सुरळीत होण्यास दोरीवरच्या उड्यांचा उपयोग होतो. तसेच संपूर्ण शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा होतो. दोरीवरच्या उड्यांमुळे शारीरिक क्षमता वाढते.
5. शरीरात साठून राहाणारे विषारी घटक आजाराचं कारण बनतात. त्यामुळेच रोज घाम येणं अत्यंत आवश्यक असतं. दोरीवरच्या उड्या मारल्यानं जास्त घाम निघतो. त्यामुळे घामावाटे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून शरीर डिटाॅक्स होण्यास मदत होते.
Image: Google
दोरीवरच्या उड्या मारताना..
दोरीवरच्या उड्या मारणं हा महिलांच्या आरोग्यासाठी कमी वेळात जास्त फायदे मिळवून देणारा व्यायाम प्रकार आहे. फक्त दोरीवरच्या उड्या मारताना काही नियम पाळणं आवश्यक आहे. दोरीवरच्या उड्या मारताना पोट रिकामं असावं. काही खाऊन पिऊन दोरीवरच्या उड्या मारु नये. तसेच उड्या मारताना खूप उंच उड्या मारु नये. दोरीवरच्या उड्या मारताना त्या घाईत न मारता सुरुवातीला उड्या मारण्याचा वेग कमी ठेवावा. हळूहळू वेग आणि उड्या मारण्याची क्षमता वाढवावी.