वृषाली जोशी-ढोके
झोप. जीवनातली मूलभूत गरज आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. पण आज आपण कॉम्प्रमाइज करायचे ठरवले की आधी झोपेवर गदा आणतो. कारण बऱ्याच जणांना झोप घेणे म्हणजे निव्वळ वेळ वाया घालवणे आहे असे वाटते आणि बाहेरच्या स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर अभ्यासासाठी, प्रोजेक्ट्स फायनलायझेशनसाठी, ऑफीसच्या कामासाठी, परीक्षेआधी सर्रास "नाईटस मारल्या" जातात. त्यात आता ओटीटी. त्यांचा तर नंबर एकचा शत्रू झोप, ते म्हणतातच की आमची माणसाच्या झोपेशी स्पर्धा आहे. दिवसाचे चोवीस तासही जागे राहून काम पूर्ण केले तरी वेळ पूरणार नाही अशी स्थिती. पण शरीराला झोप जर पूर्ण मिळाली नाही तर त्याचे अनेक दुष्परिणाम होतात. निद्रानाश, अपचन, ॲसिडीटी, हृदयविकार, चिडचिडेपणा हे सारं छळतंच, ते ही आयुष्यभर. मग हे वेळेचे आणि झोपेचे गणित जुळवायचे कसे? यावर सोप्पा उपाय किंवा झोपेचा शॉर्टकट मंत्र म्हणून यौगिक रीलॅक्सेशन (योगनिद्रा) करा असे सांगितले तर सगळेच जण खुश होतील. मात्र ती ही नीट समजून-उमजून करायला हवी.
'योगनिद्रा' ही योगशास्त्रातील विसाव्या शतकात उदयाला आलेली अतिशय सोपी पण परिणामकारक प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया शिकवायची गरज नाही तर फक्त आपल्या कानांनी ऐकून कृतीत आणण्याची गरज आहे. आसनांचा अभ्यास करताना आपण शवासानाचा अभ्यास करतो त्यामुळे आसनामध्ये आलेला शारीरिक ताण आपण काढून टाकू शकतो. पण शारीरिक ताण, भावनिक ताण आणि मानसिक ताण हे आपले सगळेच शत्रू योगनिद्रे मध्ये काढून टाकता येतात आणि मनाला कमालीची शांतता प्राप्त होते आणि सरावाने ती टिकवता पण येते. योगनिद्रा ही जागृती आणि सुषुप्ती यामधील स्थिती आहे. रोज निद्राधीन होताना आपण या मधल्या स्थितीमध्ये एक ते दोन मिनिटे असतो, योगनिद्रेमध्ये मात्र ती स्थिती अर्धा तास टिकते. मनाच्या एकूण ४ अवस्था आहेत. जागृती, सुषुप्ती, स्वप्न आणि तूर्यावस्था. तुर्या अवस्था ही केवळ ध्यानात प्राप्त होते असे म्हणतात, परंतु योगनिद्रेमध्ये ती सहज शक्य होते. योगनिद्रेमध्ये शवासन, जागे राहण्याचा निश्चय, संकल्प, अवयव ध्यान, श्वसन ध्यान, दृश्य दर्शन, असे छोटे छोटे १० टप्पे सांगितले आहेत. या टप्प्यातून सुप्त मनातील नको असलेले संस्कार पुसले जातात आणि त्या जागी नवीन विचार रुजवता येतात.योगनिद्रा घेण्यासाठी शांत व प्रसन्न हवेशीर खोली असणे गरजेचे आहे. सतरंजी किंवा ब्लँकेट खाली अंथरावे जेणेकरून जमिनीचा गारठा लागणार नाही. योगनिद्रा रोज ठराविक वेळीच घ्यावी. सैलसर कपडे असावेत ज्याचा ताण शरीरावर जाणवणार नाही. योगनिद्रेची सीडी सोबत असावी आणि आधी थोडा योगाभ्यास केलेला असावा म्हणजे झोप लागणार नाही.
योगनिद्रेचे काही फायदे ..
१. परीक्षेची भीती निघून जाते.२. वक्तृत्व सुधारणे, बुद्धिमत्ता वाढवणे.३. तणाव मुक्ती, स्थूलता निवारण, उच्च रक्तदाब, निद्रानाश दूर करणे.४.चोरी, व्यसन, दारू, यासारखे संस्कार सुप्त मनातून पुसून टाकणे.५. मानसिक संघर्ष, भावनिक उद्रेक या वर प्रभावी पणे काम करते.
संमोहन आणि योगनिद्रा यात फरक आहे. योगनिद्रेमध्ये स्वयंसूचना आहेत. आणि संमोहनामध्ये दुसरा व्यक्ती आपल्यावर अधिकार गाजवतो. अधिक माहिती साठी www.yogapoint.com या संकेत स्थळावर भेट देता येईल.
( लेखिका आयुष मान्य योगशिक्षिका, योगा वेलनेस इन्स्ट्रक्टर आहेत.)