आपण सकाळी डोळे उघडले की ओट्यापाशी जातो आणि कामं करायला सुरुवात करतो. सध्या शाळा, महाविद्यालये सुरू झाल्याने महिलांना तर उठल्यावर ब्रश करुन चहा घ्यायलाही वेळ होत नाही. उठल्यापासूनच त्या नाश्ता, स्वयंपाक, भांडी आवरणे यांसारख्या कामांना सुरुवात करतात. मुलं जोपर्यंत शाळेत किंवा कॉलेजला आणि नवरा ऑफीसला जात नाही तोपर्यंत त्यांना अजिबातच उसंत मिळत नाही. त्यानंतर आपण ब्रश करुन पाणी पितो आणि मग पुढच्या गोष्टी करतो. मग आपली आवरायची आणि ऑफीसला वेळेत पोहोचायची घाई सुरू होते. संध्याकाळी घरी आल्यावरही जेवणाची तयारी, सकाळची राहिलेली कामं आणि दुसऱ्या दिवशीची तयारी असं करता करता घड्याळात रात्रीचे कधी ११ किंवा १२ वाजतात आपलं आपल्यालाच कळत नाही (Spend At least 10 Mins In a Busy Day for Your Health).
या सगळ्या धावपळीत आपल्याला स्वत:कडे, आपल्या आरोग्याकडे पाहायला अजिबातच वेळ होत नाही. पण कितीही बिझी असलो तरी दिवसातून किमान १० मिनीटे का होईना स्वत:साठी आवर्जून वेळ काढायला हवा. या १० मिनीटांत नेमके काय करायचे ते आज आपण पाहणार आहोत. इन्स्टाग्रामवर योगा प्रशिक्षक असलेल्या स्मृती आपल्याला काही खास आसने सांगतात. ही आसने अतिशय सोपी असून आपण ती अगदी सहज करु शकतो. सोपी असली तरी ही आसनं आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असल्याने त्याचे नेमके काय फायदे होतात पाहूया...
१. पद्दोत्तानासन
पाठीवर झोपून पाय कंबरेतून पूर्ण वर घ्यायचे आणि बोटे छताकडे ताणून घ्यायची. यामुळे पाठ, मांड्या, पाय, कंबर अशा सगळ्याच स्नायूंना आराम मिळण्यास मदत होते. किमान १ मिनीटासाठी तरी हे आसन करायला हवं. पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी, मासिक पाळी नियमित होण्यासाठी, केस आणि त्वचेचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आणि पुरुषांमध्येही सेक्स निगडीत समस्या दूर होण्यासाठी या आसनाचा चांगला उपयोग होतो.
२. उत्तान शिशोसन
पार्श्वभाग वरच्या बाजूला करुन हात पुढे जास्तीत जास्त ताणायचे. यामुळे कंबरेच्या स्नायूंना चांगले स्ट्रेचिंग होते. खांदे आणि पाठीचा ताण कमी होण्यास मदत होते. मन शांत होण्यास या आसनाची अतिशय चांगली मदत होते.
३. सुप्त उपविष्ट कोनासन
पाठ जमिनीला, कंबर भिंतीला टेकून ठेवायची आणि दोन्ही पायात जास्तीत जास्त अंतर घेण्याचा प्रयत्न करायचा. दिवसाचे बहुतांश तास बसून काम असेल तर पायाच्या स्नायूंना आराम मिळण्यास चांगली मदत होते. शरीरातील नकारात्मकता दूर होण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो.
४. भ्रामरी प्राणायम आणि श्वसन
किमान २ मिनीटांसाठी भ्रामरी प्राणायम आमि ५ मिनीटे श्वासोच्छवास क्रिया अवश्य करावी. यामुळे शरीराती अशुद्ध गोष्टी बाहेर येऊन ताजी हवा शरीरात जाण्यास चांगला उपयोग होतो. नियमितपणे हे सगळे केल्यास त्याचा नक्कीच चांगला फायदा झालेला दिसून येतो.