स्पॉण्डयलोलायसिस, स्पॉण्डयलोलिस्थेसिस, स्पॉण्डयलायटिस, स्पॉण्डयलोसिस हे शब्द सारखेच वाटत असले तरी त्यात फरक आहे. कंबरदुखीचे रुग्ण बऱ्याचदा दुखण्यापेक्षा या शब्दांनीच जास्त बेजार झालेले असतात. कशाचा काही अर्थ लागत नाही आणि आपल्याला नक्की काय झालंय याचा उलगडा होत नाही. आज आपण या सर्व शब्दांचे अर्थ जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. मुळात हे सगळे शब्द कंबरेच्या त्रासाशी निगडित आहेत हे लक्षात घ्या. नुसती कंबरदुखी होत आहे असं निदान करता येत नाही. तर या चार शब्दांमध्ये तुमच्या त्रासाचे निदान असू शकते.
स्पॉण्डयलोलायसिस म्हणजे काय?
आपल्या पाठीच्या मणक्यामद्धे पार्स इंटरआर्टिक्युलॅरिस नावाचा एक छोटा भाग असतो. या भागाला झालेली इजा किंवा फ्रॅक्चर म्हणजेच स्पॉण्डयलोलायसिस. हा प्रकार आपल्या खालच्या मणक्यांमध्ये म्हणजेच लंबर भागात जास्त आढळून येतो.ह्यात L5 मणक्याला बऱ्याचदा इजा झालेली दिसून येते. एक्स रे मध्ये याचं निदान करता येऊ शकतं. हा जन्मजात असलेला त्रास नसून नंतर सुरु झालेला असू शकतो.
त्याची कारणं काय?
सतत एकाचप्रकारची क्रिया केल्यामुळे, सतत एकाच ठिकाणी इजा झाल्यामुळे, पाठीतून मागे वाकण्याची क्रिया जास्त झाल्यामुळे मुख्यतः हा त्रास उद्भवतो. तसेच जिम्नॅस्टिक, टेनिस, वेट लिफ्टिंग व फुटबॉल सारखे खेळ खेळणाऱ्यांमध्ये याचे प्रमाण जास्त आढळून येते. सतत एकच क्रिया केल्याने स्ट्रेस फ्रॅक्चर होऊन हा तास सुरु होऊ शकतो.
लक्षणं कोणती?
बऱ्याचदा हा त्रास समजून येत नाही. कारण फक्त काही क्रिया व हालचाली करताना कंबरदुखीचा त्रास होतो. कधी कधी मांडीच्या मागे ताण जाणवतो. त्रास सुरुवातीला फारसा जाणवत नसल्यामुळे बहुतेकदा उपचारांसाठी उशीर केला जातो.
स्पॉण्डयलोलिस्थेसिस म्हणजे काय?
अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर मणका आपल्या जागेवरून जेंव्हा घसरतो तेंव्हा हा आजार होतो. शरीरातील प्रत्येक अवयवाची जागा ठरलेली असते. ती जागा जर सोडली वा सुटली तर त्रास सुरु होतो. हा त्यातलाच प्रकार. हा मणका खालच्या मणक्यावरून पुढे घसरल्यामुळे कंबरदुखीची सुरुवात होते व ह्यामध्ये एखाद्या नसेला सुद्धा धक्का लागू शकतो. L5 -S1 हे मानके घसरण्याचं प्रमाण लहान मुलांमद्धे जास्त असतं तर L4- L5 हे मानके घसरण्याचं प्रमाण विशेषतः महिलांमध्ये जास्त असून हे वयोमानापरत्वे होण्याची शक्यता जास्त असते.
स्पॉण्डयलोलिस्थेसिसचे वर्गीकरण खालील प्रमाणे करता येऊ शकते.
प्रकार पहिला: मणक्याची २५% पेक्षा कमी घसरण
प्रकार दुसरा: २५ ते ५०% घसरण
प्रकार तिसरा: ५० ते ७५% घसरण
प्रकार चौथा: ७५ ते १००% घसरण
एक्स रे मध्ये किती प्रमाणात मणका पुढे सरकला आहे हे समजू शकते तसेच रुग्णाच्या देहबोलीमध्येही काही बदल जाणवू शकतात. प्रमाण जास्त असल्यास काही वेळा डॉक्टर शस्त्रक्रियेचा सल्लाही देतात.
स्पॉण्डयलायटिस म्हणजे काय?
मणके व सॅक्रोइलियाक या सांध्यांना त्रास होतो म्हणजेच मणक्याला सूज येते. खालच्या मणक्याला म्हणजेच लंबर स्पाईनला व सर्वात वरच्या मणक्यांना म्हणजेच सर्व्हायकल (Cervical) स्पाईनला ह्याचा जास्त धोका असतो. यात दोन प्रकार आढळून येऊ शकतात.
१. टीबी स्पाईन
२. अंकायलोसिंग स्पॉण्डयलायटिस
यात बांबू स्पाईन आढळतो. म्हणजेच मणक्याच्या सुजेपासून सुरुवात होऊन संपूर्ण मणके एकमेकांना चिकटेपर्यंत हा आजार वाढतो. त्यामुळे एक्स रे मध्ये आपले मणके म्हणजे एक बांबूच आहे असे भासते. एक्स रे मध्ये सहज ओळखता येण्यासारखा हा प्रकार. प्रोटीन HLA -B२७ बऱ्याच रुग्णांच्या रक्तात आढळून येते.
यात वेगवेळी लक्षणे दिसून येऊ शकतात. मात्र CT स्कॅन किंवा MRI चा वापर करून नक्की निदानापर्यंत पोहोचता येऊ शकतं. कोणत्याही न्यूरॉलॉजिकल तक्रारींबद्दल सतर्कता बाळगावी लागते व तशी लक्षणे दिसल्यास मात्र त्वरित डॉक्टरांना दाखवणे योग्य ठरते.
स्पॉण्डयलोसिस म्हणजे काय?
दोन लागोपाठच्या मणक्यांमधली जागा कमी झाल्यामुळे मधल्या नसा दाबल्या जाऊन त्यांना इजा होते. या इजेला रॅडिक्युलोपॅथी असे म्हणतात. यामुळे दुखणे, संवेदना कमी होणे, स्नायूंमधली ताकद कमी होणे अशा प्रकारची लक्षणे जाणवू शकतात. याच धोका सर्व्हायकल स्पाईन मध्येही असतो. जेंव्हा तिथे स्पायनल कॉर्डला धक्का लागतो तेंव्हा त्याला मायलोपॅथी असे म्हणतात.
थोडक्यात हा प्रकार म्हणजे वयानुसार घडत गेलेल्या बदलांमुळे झालेला त्रास असतो. ह्याला स्पाईनचा अर्थराइटिस असेही म्हणता येईल. एक्स रे मध्ये ह्याचे निदान होते व औषधे आणि अन्य योग्य उपचारांनी रुग्णाचा त्रास कमी होऊ शकतो. फिजिओथेरपीचे व्यायाम जर योग्य प्रकारे केले तर दुखणे नक्की कमी होऊ शकते.
या सर्वांचे निदान करण्यासाठी डॉक्टरांकडे जाणे महत्वाचे आहे. नंतर व्यायामासाठी फिजिओथेरपीस्टचा सल्ला घेणे विसरू नका. फिजिओथेरपिस्ट तुम्हाला तपासून तुमच्या आजाराला बरं करण्यासाठी योग्य ते व्यायाम शिकवतील. कंबरदुखीचा रुग्ण म्हणजे एक ठरलेला व्यायामाचा संच शिकवायचा असे नसते. प्रत्येक आजारामागे त्याचे मूळ कारण असते. चुकीचे व्यायाम केले गेले तर दुखणे अधिक वाढण्याचा संभव असतो. आजाराचे कारण शोधून त्या अनुषंगाने व्यायाम शिकवण्यासाठी फिजिओथेरपिस्ट असतात. म्हणूनच ह्या बाबतीत लोकांच्या सल्ल्याची वाट न बघता तज्ञांचा सल्ला घ्या.
मुळात प्रत्येक अवयव आयुष्यात एकेकदा मिळालेला असतो. त्याची योग्य प्रकारे काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. विज्ञान प्रगत झाल्यामुळे हल्ली बऱ्यचशा आजारांवर औषध मिळालं असलं तरी जे उपजत मिळालं आहे त्याची काळजी घेणेच सर्वात शहाणपणाचे!