कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं पुन्हा एकदा आपल्या हालचालींवर बंधनं घातली आहेत. पुन्हा एकदा आपलं सुरळीत होऊ पाहाणारं वेळापत्रक अस्तव्यस्त झालं आहे. घरातलं काम, घरुन ऑफिसचं काम, मुलांच्या सुट्या, सतत खाण्यापिण्याचे नवीन हट्ट आणि या सर्व परिस्थितीमुळे आलेला ताण आता प्रत्येकीसाठी नवीन नाही. पण म्हणून या ताणाशी जुळवून हसत खेळत आपली कामं करता येत आहेत असंही नाही. उलट आपली रोजची सर्व कामं कोरोनाच्या दूसऱ्या लाटेनं उद्भवलेल्या परिस्थितीमुळे विस्कळित झालेली आहे. व्यायाम हा त्या अनेक कामांमधलं एक महत्त्वाचं काम. कोरोनामुळे आलेल्या मर्यादांमुळे अनेकींनी आपला व्यायामच बंद करुन टाकला आहे.
पण सध्याची परिस्थिती म्हणजे घरातला, घराबाहेरचा प्रत्येक व्यक्ती प्रत्येक क्षणाला कोरोनाशी, कोरोनाशी संबंधित भयाशी, ताणाशी दोन हात करत आहेत. या लढण्यासाठी शरीर आणि मनाला जी ताकद हवी आहे ती केवळ सकस अन्न आणि कसदार व्यायामानंच मिळणार आहे. मग कोरोना आहे म्हणून व्यायाम टाळून कसं चालेल. उलट कोरोना आहे म्हणून जोमानं व्यायाम करायला हवा. सतत घरात असल्यानं, घरुन ऑफिसचं काम करावं लागत असल्यानं एरवीपेक्षा जास्त काळ एका जागी बसावं लागत आहे. अनेकजण आज भीती, दडपण, ताण, आर्थिक ओढाताण, दु:ख, कंटाळा, आणि एकाकीपणा या बाबींचा सामना करत आहे आणि त्याचा परिणाम खाणं-पिण, आपली रोगप्रतिकारक शक्ती, शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होऊ लागला आहे. एका जागी बसून कामाचा लोड घ्यावा लागत असल्यानं कोरोना काळातलं घरात बसणं आरोग्याच्या दृष्टीनं खूपच घातक झालं आहे. या काळात मनावर सतत येणारा ताण घालवण्यासाठी तोंडात सारखे चटपटीत पदार्थ टाकले जात आहेत. पौष्टिक पदार्थांपेक्षाही कम्फर्ट फूडकडे कल वाढल्यानं त्याचा परिणाम वजन वाढण्यातही दिसतो आहे. इतकंच नाही तर कोरोनानं आपल्या आरोग्यासमोर एवढी आव्हानं उभी केलेली असताना आपल्याला व्यायामाकडे पाठ करुन अजिबात चालणार नाही.
कोरोनाकाळात व्यायाम आवर्जून का करावा?- सर्वसामान्य परिस्थितीत रोजचा व्यायाम प्रत्येकासाठी गरजेचा आहे. नियमित व्यायाम केल्यानं आपली रोगप्रतिका शक्ती वाढते त्याचा परिणाम शेवटी कोरोनाच्या विषाणूशी लढताना होणार आहे.- सतत घरात असल्यामूळे या काळात आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी बदललेल्या आहेत. एका जागी बसून काम करण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्याचा परिणाम म्हणजे वजन वाढत आहे. नियमित व्यायाम केल्यास हे वाढणारं वजन आपण वेळीच रोखू शकतो.- नियमित व्यायाम केल्यानं आपला मूड दिवसभर चांगला राहतो. त्याचा परिणाम म्हणजे ताण व्यवस्थित हाताळता येतो. ताणाची पातळी कमी होते. शिवाय भावनिक लवचिकता साध्य होते. बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची लवचिकता वाढते.- नियमित व्यायामानं झोपेची गूणवत्ता सूधारते हे शास्त्रीय संशोधनातून सिध्द झालं आहे. अनेकांची झोप या कोरोनानं निर्माण केलेल्या अनिश्चिततेमुळे उडालेली आहे. पण रोज व्यायाम केल्यास लवकर झोप लागण्यास, झोप चांगली होण्यास मदत होते. आरोग्यदायी पुरेशी झोप ही आपली रोगप्रतिकारकशक्तीही वाढवत असते.- नियमित व्यायामानं घरात राहून आलेला आळस, शरीराला आलेला ताठरपणा कमी होतो. शरीराची आणि स्नायुंची ताकद वाढते. व्यायामानं शरीराच्या हालचाली होतात. व्यायामअभावी हदयाचं आरोग्य बिघडण्याचा धोका असतो तो व्यायामानं कमी होतो. व्यायाम करुन कामासाठीची ऊर्जा मिळण्यास मदत होते.
व्यायाम कसा करावा?
अमेरिकन हार्ट असोसिएशन यांच्या सल्ल्यानूसार प्रत्येक प्रौढ व्यक्तीनं आठवड्यातले किमान १५० मिनिटं मध्यम स्वरुपाचा शारीरिक व्यायाम करावा किंवा किमान ७५ मिनिटं जोमदार शारीरिक हालचाली असलेला व्यायाम करावा. हा व्यायाम आवडेल त्या पध्दतीनं करता येतो.- कुटुंबासह व्यायाम करण्यानं एकत्र व्यायामाचा आनंद घेता येतो. शिवाय सोबतीला व्यायामाला आहे म्हणूनही व्यायामात छान लक्ष लागतं. एकत्र घरात किंवा बाहेर थोडा वेळ चालण्यासाठी जाणं, सायकल चालवणं, घरात नृत्याचा सराव करणं, घरातल्या घरात योग करणं अशा वेगवेगळ्य प्रकारे कंटाळा न येता व्यायाम करता येतो.- थोडा वेळ चालण्यासाठी, सायकलिंगसाठी बाहेर पडल्यास छान ताजी हवा मिळते. किमान पंधरा मिनिटं बाहेर व्यायाम केल्यास उत्साह आणि ऊर्जा मिळते. बाकीचा व्यायाम घरात येऊनही करता येतो.- आता व्यायामाचे ऑनलाइन व्हिडिओ असतात. ते बघून नवनवीन व्यायाम प्रकार करुन बघता येतात. दर आठवड्याला शरीराच्या वेगवेगळ्य भागाच व्यायाम होण्यासाठी नवीन व्यायाम प्रकार शिकण्याचं ध्येय ठेवल्यास सर्वांगाचा व्यायाम होतो.- बाहेर जाऊन पूर्ण व्यायाम करण्याची सवय असल्यास घरात व्यायाम करण्याचा अनेकांना उत्साह वाटत नाही. त्यासाठी स्वत:लाच रोज नवीन आव्हान द्यावं. या आठवड्यात योगचे मी अमूक प्रकार शिकणार , व्यायामाचा स्टॅमिना मी अमूक वेळेपर्यंत वाढवणार... अशी आव्हानं दिल्यास मन लावून व्यायाम करण्याचं उद्दिष्टं मिळतं.- घरात असणं म्हणजे कॅलरी वाढवण्यास आयतं आवताण. खाणं आणि बसणं यामूळे कॅलरीज वाढतात. या कॅलरी कमी करण्यासठीचे पर्याय अंगमेहनतीच्या कामातून शोधायला हवेत. बागकाम, घरातील स्वच्छता यामूळे कॅलरीज जळतील शिवाय स्नायुंची ताकदही वाढेल.नियमित व्यायामानं वाढणारी शरीर आणि मनाची ताकद या कोरोना संसर्गात आपल्याला नक्की सुरक्षा देऊ शकते.