महिलांच्या बाबतीत फिटनेसची व्याख्या खूप मर्यादित असण्याची शक्यता असते. अनेकींना वाटतं की फिट म्हणजे सुडौल शरीर. अनेक महिला आणि मुली फक्त या सुडौल शरीरासाठी व्यायाम करतात. स्नायू, हाडांची ताकद या महत्त्वाच्या बाबींकडे म्हणूनच त्यांचं लक्षही नसतं. शक्ती प्रशिक्षण अर्थात स्ट्रेन्थ ट्रेनिंग हे महिलांसाठी नसतंच असा अनेकींचा समज आहे. वेट लिफ्टिंग हा स्ट्रेन्थ ट्रेनिंगचा महत्त्वाचा भाग. पण आपल्याला कुठे बॉडी बिल्डिंग करायची आहे असं अनेकींना वाटतं. पण फिटनेस क्षेत्रातील तज्ज्ञ हे स्ट्रेन्थ ट्रेनिंग हे महिलांसाठी महत्त्वाचं आहे आणि त्याचे परिणाम तपासण्यासाठी जिममधे जाऊनच व्यायाम करायला हवा असं नाही असं म्हणतात. स्ट्रेन्थ ट्रेनिंग हे टप्प्याटप्यानं डम्बल्सचं वजन वाढवत आणि घरातल्या गोष्टींचा वापर करत केलं तरी चालतं. स्ट्रेन्थ ट्रेनिंगने स्नायूंना ताकद मिळते, शरीरातील फॅटस कमी होतात, मानसिक आरोग्य चांगलं राहातं आणि महत्त्त्वाचं म्हणजे या प्रकारच्या व्यायामामुळेहाडांचं आणि सांध्यांचं रक्षण होतं.
स्ट्रेन्थ ट्रेनिंग करायला खूपशा साधन सामग्रीची गरज नसते. वेट ट्रेनिंग केलं तरी पुरतं. आणि याचा किती परिणाम होतो हे सहज मोजता मापता येतं. स्ट्रेन्थ ट्रेनिंगचे फायदे बघायचे असेल तर टप्प्याटप्प्यानं आपले स्नायू जास्तीत जास्त वजन पेलू शकता आहेत ना याकडे बघावं.स्ट्रेन्थ ट्रेनिंगकडे महिला जरी हा पुरुषी व्यायाम प्रकार म्हणून बघत असल्या तरी प्रत्यक्षात या फरकाला काहीच महत्त्व नाही. तज्ज्ञ सांगतात की पुरुषांसाठी आणि महिलांसाठीचं स्ट्रेन्थ ट्रेनिंग हे सारखंच असतं. स्वत:च्या शरीराचं वजन, डम्बेल्स, रेझिसटन्स बॅण्डस एवढ्या मर्यादित साधनांचा उपयोग करुन स्नायूंची बांधणी, स्नायूंची क्षमता वाढवता येते. शारीरिक फायद्यापासून मानसिक आनंदापर्यंत स्ट्रेन्थ ट्रेनिंगचे फायदे दिसत असले तरी जगभरातील अजूनही केवळ २० टक्के महिलाच स्ट्रेन्थ ट्रेनिंग करतात.स्ट्रेन्थ ट्रेनिंग करण्याचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे टप्प्याटप्प्यानं वजनाचे व्यायाम करुन भार पेलण्याची, तोलून धरण्याची स्नायूंची क्षमता वाढवणं हा आहे. या व्यायामात सातत्य असेल तर दिवसेंदिवस भार पेलण्याची स्नायूंची क्षमता वाढते. त्यामूळे शरीराची ताकद वाढते.
कोणत्या फायद्यांसाठी महिलांनी स्ट्रेन्थ ट्रेनिंग करावं?
-स्ट्रेन्थ ट्रेनिंगने आडदांड दिसू असा महिलांचा समज असतो. पण तो खरा नाही. कारण पुरुषांइतकं महिलांमधे टेस्टोस्टेरॉन हे संप्रेरकं नसतं. या संप्रेरकामूळे स्ट्रेन्थ ट्रेनिंगमुळे पुरुषांचं शरीर पिळदार होतं. स्ट्रेन्थ ट्रेनिंगमुळे महिलांचे हाडं विकसित होतात. स्ट्रेन्थ ट्रेनिंगमधे हाडांवर ताण आल्याने हाडांची घनता वाढते . यामूळे हाडांची झीज, ऑस्टेओपोरोसिससारखे हाडांचे गंभीर आजार होत नाहीत.
- रजोनिवृत्तीच्या टप्प्यातल्या महिलांसाठी या स्ट्रेन्थ ट्रेनिंगचा खूप फायदा होतो. रजोनिवृत्तीत आणि रजो निवृत्तीनंतर हाडांची घनता झपाट्यानं कमी होते. पण नियमित स्ट्रेन्थ ट्रेनिंगमुळे हे टाळता येतं.
- या व्यायाम प्रकाराने स्नायू बळकट होतात. आणि त्यामुळे वय वाढल्यानंतर तोल जाण्याचा धोका कमी होतो
- व्यायामानं कमरेचं दुखणं निर्माण होतं असा एक समज होता. पण संशोधनातून हे सिध्द झालं आहे की, स्ट्रेन्थ ट्रेनिंगमुळे कमरेचं, पाठीचं दुखणं कमी होतं. फक्त स्ट्रेन्थ ट्रेनिंग हे जपून , काळजी घेऊन करायचं असतं. म्हणूनच कमी वजनानं या व्यायामाची सुरुवात करावी आणि टप्प्याटप्प्यानं वजन वाढवत नेणं हे योग्य ठरतं असं तज्ज्ञ सांगतात.
- स्ट्रेन्थ ट्रेनिंगमुळे जगण्याची गुणवत्ता वाढते. रोजची कामं पूर्ण क्षमतेनं करण्याची ताकद वाढते. स्नायू आणि हाडं बळकट असतील तर हालचाली सुलभ होतात. तसेच इतर व्यायाम प्रकार करणं सोपं जातं. कोणतीही कृती आणि काम करताना आपल्यात ताकद असल्याची जाणीव होते आणि कामं व्यवस्थित पार पडतात. स्ट्रेन्थ ट्रेनिंगने केवळ हालचालीच सुलभ होतात असं नाही तर यामुळे गंभीर हाडांचे आजार, हदयरोग, नैराश्य , मधूमेह यासारख्या आजारांचा धोकाही कमी होतो.
- स्ट्रेन्थ ट्रेनिंग हे रजोनिवृत्तीच्या काळात वाढणारं वजन नियंत्रित करण्यास मदत करतं. या व्यायाम प्रकारामुळे चयापचय क्रिया सुधारते, स्ट्रेन्थ ट्रेनिंग केल्यानंतर उष्मांक घटण्याची क्रियाही वाढते.
- स्ट्रेन्थ ट्रेनिंगचा फायदा हा फक्त शारीरिक स्तरापुरताच मर्यादित असतो असं नाही तर त्यामुळे मेंदू तल्लख होतो तसेच आपल्या चित्तवृत्ती सूधारतात. आनंदी राहातात. अभ्यासातून असं दिसून आलं आहे की स्ट्रेन्थ ट्रेनिंग केल्यानंतर मनाला शांती मिळते. त्यामुळे मानसिक आरोग्यासाठी हा व्यायाम प्रकार उत्तम असतो. एका अभ्यासाच्या निष्कर्षानुसार आठवड्यातले दोन ते तीन दिवस स्ट्रेन्थ ट्रेनिंग केल्यास सौम्य किंवा मध्यम स्वरुपाचं नैराश्य कमी होतं.