Join us  

व्यायाम तर करताय, पण स्ट्रेचिंग करताय का? स्ट्रेचिंग करण्याचे फायदे मोठे आहेत..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2021 7:28 PM

स्ट्रेचिंगमुळे शरीराची लवचिकता वाढते हे खरं आहे. पण म्हणून स्ट्रेचिंगचा एवढाच फायदा नाही. तर शरीराच्या ठेवणीपासून मनाच्या शांततेपर्यंत स्ट्रेचिंगने अनेक फायदे मिळतात.

ठळक मुद्दे स्ट्रेचिंगमुळे सांध्यांच्या हालचालींना स्वातंत्र्य मिळतं. नियमित स्वरुपात स्ट्रेचिंगचे व्यायाम केल्यास स्नायुंना होणारा रक्तपुरवठा सुधारतो.स्ट्रेचिंग व्यायाम केल्यास भविष्यातली पाठदुखी आणि स्नायुंवरचा ताण या समस्या टाळू शकतो असं तज्ज्ञ म्हणतात.

प्रत्येक व्यायाम प्रकारातून शरीर आणि मनाला विशिष्ट फायदे मिळतात. त्यामुळे प्रत्येक व्यायाम प्रकार हा महत्त्वाचा असतो. स्ट्रेचिंगग या व्यायाम प्रकाराचेही अनेक फायदे आहेत. स्ट्रेचिंगमुळे शरीराची लवचिकता वाढते हे खरं आहे. पण म्हणून स्ट्रेचिंगचा एवढाच फायदा नाही. तर शरीराच्या ठेवणीपासून मनाच्या शांततेपर्यंत स्ट्रेचिंगने अनेक फायदे मिळतात. शारीरिक कृतींमधे सुधारणा होते. शारीरिक कृतींसाठी डायनॅमिक स्ट्रेचेस करुन स्नायुंना ते काम करण्यासाठी आपण तयार करत असतो. त्याचा उपयोग इतर व्यायाम प्रकार करतानाही होतो.

स्ट्रेचिंगमुळे काय मिळतं?- शरीराची लवचिकता वाढते. लवचिकता, चपळाई या दोन गोष्टी आपल्या निरोगी आरोग्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात. आपल्या हालचाली आपल्या आरोग्याबाबत खूप काही सांगत असतात. शरीराची लवचिकताही मनातला आणि शरीरातला उत्साह दाखवत असते. ही लवचिकता स्ट्रेचिंगमुळे साध्य होते. या लवचिकतेमुळे रोजची काम करण्यात सहजता येते. शिवाय वयानुसार शरीराला येणारा संथपणा या स्ट्रेचिंगमुळे लांबवता येतो.

- हालचालींचा स्तर वाढतो. सांधे मोकळे असले की आपल्या हालचालींवर मर्यादा येत नाही. स्ट्रेचिंगमुळे सांध्यांच्या हालचालींना स्वातंत्र्य मिळतं. एका अभ्यासात असं आढळून आलं आहे की स्टॅटिक आणि डायनॅमिक स्ट्रेचिंग व्यायाम हे हालचालींसाठी खूप परिणामकारक असतात.

- स्नायूंना पुरेसा रक्तपूरवठा होतो. नियमित स्वरुपात स्ट्रेचिंगचे व्यायाम केल्यास स्नायुंना होणारा रक्तपुरवठा सूधारतो. त्यामुळे स्नायुंचं दुखणं कमी होते किंवा या स्नायूंच्या दूखण्यातून स्ट्रेचिंगमुळे लवकर बाहेर पडता येतं.

- शरीराची ठेवण सुधारते. स्नायूंमधला असमतोल ही खूपच सर्वसामान्य समस्या आहे. याबाबत झालेला एक अभ्यास सांगतो की स्ट्रेन्थनिंग आणि स्ट्रेचिंग या दोन प्रकारच्या व्यायामाचा मेळ घातला तर स्नायुंसंबंधीचं दुखणे जातं आणि शरीराचं संरेखन                  ( अलाइन्टमेण्ट) व्यवस्थित होतं. या दोन गोष्टींमुळे शरीराचे ठेवण सूधारायला मदत होते. आखीव रेखीव दिसण्यासाठी हे स्ट्रेचिंगचे व्यायाम खूप मदत करतात.

- पाठीचं दुखणं हे महिलांमधे प्रामुख्यानं आढळून येणारं दुखणं आहे. याचं मुख्य कारण ताठर झालेले स्नायू असतात. त्यामुळे हालचालींवर मर्यादा येतात. त्याचा ताण पाठीवर येतो आणि पाठीचं दुखणं लागतं. नियमित स्वरुपात स्ट्रेचिंग व्यायाम केल्यास भविष्यातली पाठदुखी आणि स्नायुंवरचा ताण या समस्या टाळू शकतो असं तज्ज्ञ म्हणतात.

- स्ट्रेचिंगचा व्यायाम हा शरीरावरील आलेला ताण घालवणारा असतो. स्नायुंवर आलेला ताण हा शारीरिक आणि मानसिक ताणाला कारणीभूत ठरतो. त्यामूळे स्ट्रेचिंग करताना शरीरातील कोणत्या अवयवाच्या स्नायूंवर ताण आला आहे त्यावर लक्ष केंद्रित करावा. आणि त्या स्नायूंचा स्ट्रेचिंग व्यायाम केल्यास हा ताण जातो.

- स्ट्रेचिंगमुळे शरीराची लवचिकता वाढते तशीच मनाला शांतीही मिळते. स्ट्रेचिंगचा व्यायाम केल्यानंतर ध्यानधारणा केल्यास ध्यानधारणेत मनाची एकाग्रता वाढते आणि मनाला शांती मिळते. 

- स्ट्रेचिंगच्या व्यायामानं डोक्यावरचा ताण निवळतो आणि त्यामुळे जाणवणारी डोकेदुखीही जाते.