Join us  

फोटो काढताना श्वास रोखून ढेरी आत ओढताय, मिनी माथूरने शोधलाय यावर भन्नाट उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2021 1:01 PM

फोटोमध्ये आपली सुटलेली ढेरी येऊ नये, म्हणून अनेक जणांना खूप कसरत करावी लागते. फोटो काढून होईपर्यंत श्वास रोखून पोट आत ओढून घेताना चांगलीच दमछाक होते. शिवाय सगळ्यांसमोर अतिशय लाजिरवाणे वाटते, ही गोष्ट वेगळीच. पण अशी ओढाताण करायची नसेल, तर काय करायला पाहिजे हे अभिनेत्री तसेच ॲन्कर मिनी माथूर हिने नुकतेच सोशल मिडियावर शेअर केले आहे.

ठळक मुद्देमागील एक ते दिड वर्षांपासून व्यायाम आणि आहार या दोन गोष्टींवर सातत्याने फोकस केल्यामुळे पोटावरची चरबी कमी करणे शक्य झाल्याचे मिनीचे प्रामाणिक मत आहे.मला आणि माझ्या नवऱ्याला टमी फ्लॅट करताना प्रचंड संघर्ष करावा लागत आहे, असेही मिनीने काही दिवसांपुर्वी इन्स्टाग्रामवर एक व्हिडियो शेअर करून सांगितले होते. यात मिनी आणि तिचा पती कबीर दोघेही योगा करताना दिसतात. 

गोड चेहरा आणि कायम चेहऱ्यावर असणारे स्मित हास्य यामुळे मिनी माथूर हिने नेहमीच चाहत्यांचे मन जिंकले आहे. ४५ वर्षीय मिनी माथूरने तिची फिटनेस जर्नी नुकतीच इन्स्टाग्रामवर शेअर  केली आहे.  तिचा फिटनेस आणि बाॅडी टोनमध्ये दिसून येणारा जबरदस्त फरक अनेकांसाठी प्रेरणादायी  ठरणारा आहे.  म्हणूनच तिचा फोटो आणि पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत असून तिने हा बदल कसा घडवून आणला, याचा शोध घेण्याचा प्रयत्न फिटनेस प्रेमी करत आहेत.

 

 

मिनी माथूरने जी पोस्ट शेअर केली आहे, त्यात तिचा एक मिरर सेल्फी आहे. यामध्ये ती अतिशय स्लीम- ट्रीम दिसत असून तिचे पोट बऱ्यापैकी फ्लॅट झाले आहे. या पोस्टमध्ये मात्र मिनीने एका गोष्टीची प्रामाणिकपणे कबुली दिली आहे. ती म्हणते की, सोशल मिडियावर ही पोस्ट शेअर करण्यासाठी मला एक स्टाईलिश बॉडी सेल्फी घेताना खूपच कसरत करावी लागली. याचे सगळ्यात मुख्य कारण म्हणजे सुटलेले पोट. पण तरीही आता नियमित व्यायाम आणि परफेक्ट डाएट या गोष्टी कटाक्षाने पाळल्यामुळे मला पोटावरची चरबी लपविण्यासाठी खूपच कमी मेहनत घ्यावी लागत आहे.

या पोस्टमध्ये मिनीने असेही म्हटले आहे की, तिच्या ओटीपोटावरील चरबी आता झपाट्याने कमी झाली  असून हे प्रमाण आता अवघे २५ टक्क्यांवर आले आहे. नियमित व्यायामामुळे केस गळण्याची समस्या  देखील कमी झाली असून व्यायामातून खूपच उर्जा मिळते. अनफिट राहणे हे खूपच सोपे आणि सहज आहे. पण मला मात्र प्रचंड फिट रहायला आवडते, असेही मिनीने या पोस्टद्वारे शेअर केले आहे. 

 

ओटीपोटावरील चरबी ही महिलांसाठी एक डोकेदुखीच असते. बाळांतपण झालेल्या बहुुतांश महिलांना ही समस्या अक्षरश: छळते. सुटलेल्या पोटामुळे कपड्यांची निवडही खूपच सांभाळून करावी लागते. सुटलेले, बेढब पोट ज्या कपड्यांमधून लपेल असेच कपडे घेण्याकडे बहुतांश महिलांचा कल असतो. पण मिनी माथूरप्रमाणे तुम्हालाही ही समस्या कमी करायची असेल तर व्यायाम आणि डाएट या दोन गोष्टी सांभाळल्याशिवाय पर्याय नाही, हेच तिच्या पोस्टवरून प्रकर्षाने जाणवते. योगा, झुंबा आणि वर्कआऊट यामुळे आपल्याला हे शक्य झाल्याचेही मिनीने सांगितले आहे. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सआरोग्ययोगवेट लॉस टिप्स