दुचाकीचा वाढलेला वापर, बैठे काम करण्याचे वाढलेले तास, सतत एकाच पोझिशनमध्ये बसून काम करावे लागणे, व्यायामाचा अभाव, झोपण्याच्या- चालण्याच्या- बसण्याच्या चुकीच्या पद्धती यामुळे आजकाल तरुण मुलं- मुलीही पाठ दुखतेय, अशी तक्रार करतात. ज्या महिला तिशीच्या आसपास आहेत, ज्यांची एकेक बाळंतपणं झालेली आहेत, अशा महिलांची पाठही कायमच (suffering from back pain?) दुखते. त्यामुळे अशा सगळ्यांसाठीच शिल्पाने सांगितलेला उपाय कामी येणारा आहे.
आपल्याला माहितीच आहे की शिल्पा शेट्टी तिच्या फिटनेसबाबत किती जागरुक आहे... शिल्पाने नुकताच तिचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. “Yoga adds years to your life, and life to your years.” असं तिने या व्हिडिओला कॅप्शन देत सांगितलं आहे. यावरूनच प्रत्येकासाठी योगा किंवा व्यायाम किती महत्त्वाचा आहे, हे कळून येतं. शिल्पा म्हणते हे वाक्यच मला योगासाठी (yoga for back pain) प्रेरीत करतं आणि त्यामुळेच मी कितीही पॅक शेड्यूल असलं तरी योगासाठी वेळ काढतेच..
शिल्पाने तिच्या या पोस्टमध्ये २ योगासनं करून दाखवली आहेत. यापैकी एक आहे एकपाद उत्कटासन आणि दुसरं आहे अंजनीआसन. यापैकी अंजनीआसन हे पाठदुखीसाठी अतिशय उत्तम उपाय आहे. शिल्पा करतेय त्याप्रमाणे ही दोन्ही आसनं जोडून एका नंतर एक केली तर त्याचा अधिक चांगला परिणाम दिसून येतो.
कसं करायचं अंजनीआसन? (anjani aasan or Anjaneyasana)
- अंजनीआसन करण्यासाठी सगळ्यात आधी ताठ उभे रहा.
- यानंतर श्वास घेत घेत दोन्ही हात वर न्या आणि एक पाय शक्य तेवढा मागे न्या. हे आसन करताना काही जण मागच्या पायाचा गुडघा जमिनीवर टेकवतात तर कुणी टेकवत नाहीत.
- पुढे असणारा पाय गुडघ्यातून वाकवा. या पायाचा गुडघ्याखालचा भाग आणि गुडघ्यावरचा भाग यांचा एकमेकांशी काटकोन असावा, अशा पद्धतीने पाय ठेवा.
- आता वर नेलेले हात एकमेकांना जोडा आणि मागच्या बाजूने नेण्याचा प्रयत्न करा.
- असे करताना तुमच्या पाठीचा कणा पुर्णपणे कर्व्ह झाला पाहिजे.
- ही आसनस्थिती काही सेकंद टिकविण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतर सावकाश सोडा.
- त्यानंतर दुसऱ्या पायानेही तेवढ्याच वेळासाठी अंजनीआसन करा.
अंजनीआसन करण्याचे फायदे
- अंजनीआसन करण्याचा सगळ्यात मुख्य फायदा म्हणजे या आसनामुळे पाठदुखीचा त्रास खूप कमी होतो.
- पाठीचा कणा लवचिक होतो.
- बॉडी टोनिंगसाठी हे आसन उपयुक्त ठरतं.
- गुडघेदुखीचा त्रास होत असल्यासही अंजनीआसन करावं.
- पोटऱ्यांचं दुखणं थांबतं.
- पोटरी, मांड्या आणि ओटीपोटावरची अतिरिक्त चरबी कमी होते.
- श्वसनक्रिया सुधारते.
- मासिकपाळीच्या काळतली पोटदुखी कमी होते.