Join us

Summer Special : उन्हाळ्यात दिवसभर फ्रेश राहायचं तर करा ४ योगासनं, भर उन्हातही राहाल ताजेतवाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2022 12:57 IST

Summer Special : पाहूयात ही आसने कोणती आणि त्यामुळे आपल्या शरीराला कसा फायदा होईल.

ठळक मुद्देउन्हाळ्यात काही ठराविक आसने नियमित केल्यास त्याचा आपल्याला फ्रेश राहण्यासाठी निश्चितच फायदा होतो. सतत येणारा घाम, तहान आणि पित्त यांसाठी उपयुक्त आसने पाहूया

उन्हाळ्याच्या दिवसांत हवेतील तापमानामुळे आपल्यालाही एकदम थकल्यासारखे होते. उन्हाचा तडाखा वाढला की काहीही करावेसे वाटत नाही आणि शरीराची लाहीलाही होते. मग दुपारच्या वेळी ग्लानी येणे, आळस येणे असे व्हायला लागते. डोक्यावर उन्ह आले की आपल्या शरीरातील काम करायची ताकदच कमी होऊन जाते. पण कामांना तर पर्याय नसतो. (Summer Special) कितीही घाम येत असला, काही करण्याची इच्छा नसली तरी रोजची कामे करावीच लागतात. 

उन्हाळ्याच्या दिवसांत ताजेतवाने राहण्यासाठी ज्याप्रमाणे भरपूर पाणी प्यायला सांगितले जाते. त्याचप्रमाणे उन्हाळ्यात काही ठराविक आसने नियमित केल्यास त्याचा आपल्याला फ्रेश राहण्यासाठी निश्चितच फायदा होतो. प्रसिद्ध डॉ. नितिका कोहली कायम आपल्या फॉलोअर्सना काही ना काही चांगली माहिती देऊन त्यांची तब्येत चांगली राहावी यासाठी प्रयत्न करत असतात. उन्हाळ्यात सतत लागणारी तहान, घामाघून होणे आणि पित्ताचा त्रास कमी व्हावा यासाठी नितिका यांनी नुकतीच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी उन्हाळ्याच्या दिवसांत करायच्या आसनांबद्दल माहिती दिली आहे. ही आसने केल्यास आपल्याला दिवसभर फ्रेश राहण्यास मदत होईल असे त्यांचे म्हणणे आहे. पाहूयात ही आसने कोणती आणि त्यामुळे आपल्या शरीराला कसा फायदा होईल.

(Image : Google)

१. ताडासन

अतिशय सोपे आसन असून यामध्ये शरीर ताणले जाते. या आसनामुळे स्नायूंना एकप्रकारचा ताण मिळाल्याने आपल्याला उन्हामुळे आलेला आळस काही प्रमाणात कमी होण्यास मदत होते. ताडासनामुळे आपला रक्तप्रवाह चांगला होण्यास मदत होते तसेच श्वासोच्छवासाची क्रियाही सुधारते. या आसनामुळे आपल्याला ताजेतवाने वाटत असल्याने ते नियमित करायला हवे. 

२. शवासन

साधारणपणे सगळ्यांना आवडणारे हे आसन. अतिशय सोपे वाटत असले तरी आपण दिवसभर नुसते धावत असतो. त्या नादात आपण शरीर आणि मन शांत करण्याकडे लक्ष देत नाही. पण शवासनामध्ये शरीर आणि मन एकाग्र करायचे असल्याने मन शांत होण्यास मदत होते. मानसिक ताण असणाऱ्यांसाठी हे आसन अतिशय उपयुक्त ठरते. शरीराचा रक्तप्रवाह सुरळीत होण्यासाठी आणि रिलॅक्स होण्यासाठी या आसनाचा अतिशय चांगला फायदा होतो. 

३. भुजंगासन 

भुजंगासन ही सूर्यनमस्कारातील एक महत्त्वाची क्रिया आहे. भुजंगासनात आपण पोटाच्या वरच्या भागाला ताण देत असल्याने छातीचे स्नायू ताणले जातात. त्यामुळे हृदय आणि फुफ्फुसांची क्रिया चांगली होण्यास मदत होते. भुजंगासनामुळे हात, पाठ, पोट, मांड्या या सगळ्या स्नायूंना ताण पडत असल्याने हे आसन नियमितपणे केल्यास त्याचा चांगला फायदा होतो. 

४. अंजनेयासन 

एका पायात वाकून वरच्या दिशेने नमस्कार करायच्या या आसनामध्ये शरीराच्या बहुतांश स्नायूंना ताण पडतो. या आसनामुळे आपली एकाग्रता वाढण्यास मदत होते. तसेच स्नायू ताणले गेल्यामुळे आपण भर उन्हातही नकळत फ्रेश राहतो. 

(Image : Google)

५. सिंहासन

सिंहासनामध्ये आपण तोंडाने श्वास बाहेर सोडत असल्याने आपल्या शरीरावर असलेला ताण कमी होण्यास मदत होते. चेहरा आणि छातीच्या भागात असणारा ताण यामुळे कमी होतो. ज्यामुळे आपल्याला काहीवेळानंतर रिलॅक्स वाटते. 

टॅग्स :फिटनेस टिप्सयोगासने प्रकार व फायदेसमर स्पेशल