Join us  

सुश्मिता सेनचे जोरदार कमबॅक, अँजिओप्लास्टीनंतर सुरु केला जबरदस्त व्यायाम, पाहा व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2023 1:52 PM

Sushmita Sen Workout Fitness After Angioplasty : वयाच्या ४७ व्या वर्षीची तिच्यातील जिगर आणि उत्साह तरुणींना लाजवणारा आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन कमालीची जिद्दी आहे. हार मानेल ती सुश्मिता कसली याचा प्रत्यय आपल्याला तिच्या सध्याच्या अपडेटसवरुन दिसून येतो. मागील महिन्यातच सुश्मिताला हृदयविकाराचा झटका आला होता आणि त्यामुळे तिची अँजिओप्लास्टीही करण्यात आली. नियमित व्यायाम करणाऱ्या सुश्मिताला असं झालंच कसं असा सवालही तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर उपस्थित केला. सुश्मिता सोशल मीडियावर बरीच अॅक्टीव्ह असून ती सतत काही ना काही पोस्ट करत असते. वयाच्या ४७ व्या वर्षीची तिच्यातील जिगर आणि उत्साह तरुणींना लाजवणारा आहे (Sushmita Sen Workout Fitness After Angioplasty). 

ललित मोदी यांच्यासोबत असलेल्या अफेअरवरुनही मध्यंतरी सुश्मिता बरीच चर्चेत होती. नुकताच सुश्मिताने आपल्या व्यायामाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ती कार्डीओ व्यायाम अतिशय व्यवस्थितपणे करताना दिसत आहे. आता आपल्याला जास्त ट्रेनिंग करायला परवानगी आहे असे म्हणत तिने आपले व्यायाम करतानाचे काही व्हिडिओ यामध्ये पोस्ट केले आहेत. यात ती बऱ्यापैकी अवघड व्यायाम करत असल्याचे दिसते. लवकरच आपण आर्या या वेबसिरीजच्या शुटींगसाठी जयपूरला जाणार असल्याचेही तिने यावेळी सांगितले आहे. यावेळी मला कंपनी देणारे आणि मी पुन्हा रुळावर येण्यासाठी प्रयत्न करणारी माझी माणसं माझ्यासोबत आहेत अशी भावनिक पोस्ट सुश्मिताने केली आहे. 

 

अवघ्या १३ तासांत सुश्मिताच्या या इन्स्टाग्राम पोस्टला १.५ लाखांहून जास्त लाईक्स मिळाले असून अनेकांनी त्यावर सुश्मिताचे कौतुक करणाऱ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. हार्टचा त्रास झाल्यानंतर सुश्मितावर वेळीच उपचार झाले म्हणून ठीक नाहीतर तिच्या मुख्य धमणीत ९५ टक्के ब्लॉकेज होते. आर्या या वेबसिरीजच्या माध्यमातून सुश्मिता आपल्या चाहत्यांसमोर येणार आहे. काही दिवसांपूर्वी तिने आपल्या अँजिओप्लास्टीला १ महिना झाला असून आता आपण आपले आवडते काम कसे करत आहोत याविषयीही इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. 

टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायामसुश्मिता सेन