नियमित व्यायाम हाच आरोग्यदायी जीवनाचा मार्ग आहे हे आता सर्वांनाच पटू लागलं आहे. पण म्हणून रोजचा व्यायाम आवडीनं करायला जमतोच असं नाही. उलट व्यायाम करताना उत्साहच वाटत नाही, व्यायामच करावासा वाटत नाही, व्यायामाला काही बूस्टच मिळत नाही अशा अनेकजणींच्या तक्रारी असतात. रोजच्या व्यायामाला उत्साह वाटावा म्हणून अभिनेत्री सारा अली खान हिने एका मासिकाला मुलाखत देताना काही व्यायाम टिप्स सांगितल्या आहेत. तसेच व्यायामातून आपल्याला काय मिळतं याबद्दल सारा म्हणते की व्यायाम केल्यानंतर मला मी सर्वात सुंदर असल्याची जाणीव होते. भावनिक, मानसिक आणि शारीरिक रित्या मला मी सूदृढ असल्याचं जाणवतं. रोजच्या रोज व्यायाम झाला तर मी आनंदी, सकारात्म्क, प्रफूल्लित, ऊर्जाशील असते. आणि म्हणून मला मी सुंदर वाटते. मला सौंदर्य हे केवळ व्यायामातून प्राप्त होतं. व्यायामाला आपल्या जगण्याचा महत्त्वाचा घटक मानणाऱ्या साराला रोज, न चूकता व्यायाम करणं हे सोपं काम नाही याची जाणीव आहे. त्यामुळे व्यायामाच्या तिच्या काही टिप्स आहे ज्या ती स्वत: अवलंबते. या टिप्स इतरांनी अवलंबून पाहिल्यास व्यायाम हा सगळ्यांनाच नक्की आवडेल आणि तो न चुकवता करावासा वाटेल असा विश्वास साराला वाटतो.
काय आहेत सारा अली खानच्या व्यायाम टिप्स
१. दिवसभर उत्साही असण्यासाठी, कामासाठी ऊर्जा निर्माण होण्यासाठी रोज सकाळी घाम निघणं आवश्यक आहे. सारा आपल्या व्यायामात कार्डिओ वर्कआऊटस म्हणजे चालणं, पळणं, सायकलिंग याला खूप महत्त्व देते. या कार्डिओ व्यायाम प्रकारामुळेच आपलं जास्तीचं वजन घटलं असं ती म्हणते. कार्डिओ वर्कआउटस करुन वजन कमी केल्यानंतरच इतर व्यायाम प्रकार करण्यास आपण सुरुवात केल्याचं सारा सांगते. कार्डिओ वर्कआउटसमूळे वजन कमी होण्यासोबतच हदय रोगाचे धोके कमी होतात, रक्तदाब कमी होतो, हदयाची ताकद वाढते. त्याचा परिणाम म्हणजे हदयाकडून स्नायुंना पूरेसा रक्तपुरवठाही होतो.
२. साराच्या मते कार्डिओ वर्कआउटस म्हणजेच पूर्ण व्यायाम नाही. म्हणूनच रोजच्या व्यायाम नियोजनात ती स्नायुंचे व्यायाम करण्यासही ती पुरेसा वेळ देते. स्नायुंच्या व्यायामामुळे स्नायुंना आकार मिळतो. या व्यायाम प्रकारातूनच शरीरयष्टी सुडौल होते. स्नायुंचे व्यायाम करण्यासाठी सारा पायलेटस हा व्यायाम प्रकार करते. या व्यायामानं आपल्याला शक्ती प्राप्त होते, हा व्यायाम प्रकार माझा बांधा सुंदर करण्यात मदत करतो तसेच माझी शारीरिक क्षमताही वाढवतो असं सारा म्हणते. स्नायुंच्या व्यायामामुळे स्नायू विकसित होतात, लवचिकता वाढते आणि ताकदही वाढते. आपल्या शारीरिक हालचालीत एक विशिष्ट प्रकारचा तोल आणि आरेखन असणं आवश्यक असतं. हा तोल आणि आरेखन स्नायूंच्या व्यायामानं साध्य होतं म्हणून सारा रोज स्नायुंचे व्यायाम करण्याचा सल्ला देते.
३. व्यायाम हा कितीही आवश्यक असला तरी रोज उठून व्यायाम करणं ही आवडीची गोष्ट नसते याची जाणीव साराला आहे. रोज आनंदानं व्यायाम करता यावा असा ‘बूस्ट’ आवश्यक असल्याचं तिचं मत आहे. स्वत:पुरतीचा हा बूस्ट तिनं शोधून काढला आहे. व्यायाम करताना ती आवडीची गाणी ऐकते. सर्वच आवडीची गाणी आपण जो व्यायाम करतो त्याच्या वेगाशी मिळती जुळती नसतात. पण यू ट्यूबनं तिचं काम सोप केलं आहे.यूट़्यूबमधे एक अशी सूविधा आहे ज्यामूळे मूळ गाण्याचा वेग दिडपट दुप्पट करता येतो. अशा प्रकारे आपल्या आवडीची गाणी त्या व्यायाम प्रकाराला आवश्यय त्या स्पीडनूसार ऐकत सारा रोजचा व्यायाम आनंदानं करते. आपला व्यायाम बूस्ट आपण शोधायला हवा असं सारा म्हणते. पण संगीत ऐकत व्यायाम केला तर व्यायामानं जी दमछाक होते ( ज्यामूळे व्यायाम नकोसा वाटतो) त्याकडे दुर्लक्ष करणं संगीत ऐकण्यातून साधू शकतं. तसेच गाणी किंवा संगीत ऐकत आपण व्यायाम केला तर व्यायामाला एक लय ताल येते. चालताना, पळताना, दोरी उड्या मारताना संगीत ऐकत असल्यास त्याचा फायदा व्यायाम अधिक परिणामकारक होण्यास मदत होते. कारण संगीत आपल्या मेंदूतील हालचालीच्या केंद्रांना उत्तेजन देतो.
४ मूडनुसार व्यायाम प्रकार निवडायला हवा असं सारा म्हणते. ती स्वत:ही मूडनुसारच व्यायाम करते. जर पूर्ण आठवडाभर जर शारीरिकदृष्ट्या दमवणारं काम झालेलं असेल तर ती योग आणि स्नायूंचे व्यायाम करते. जर संपूर्ण आठवडा डोक्याला आणि मनाला ताण देणारं काम झालं असेल तर ती ४५ मीनिटं बॉक्सिंग करते. शरीरात सकारात्मक ऊर्जा आणि उत्साह निर्माण होण्यासाठी अॅड्रेनॅलिन हे संप्रेरक महत्त्वाचं असतं. ते या व्यायाम प्रकारनं निर्माण होतं असं सारा म्हणते.
५. कितीही बिझी असली तरी रोज दीड तास व्यायाम करणं हा व्यायामाचा नेम सारा कधीही चुकवत नाही. पण रविवारी मात्र ती व्यायामाला सुटी घेते. सारा म्हणते की आठवड्यातला एक दिवस शरीराला आराम देणं गरजेचं आहे. स्नायुंचा विकास होण्यासाठी त्यांची दुरुस्ती होणं गरजेचं असतं. रेस्ट डे च्या दिवशी स्नायू दुरुस्त होण्यास त्यांना अवकाश मिळतो. व्यायामानं स्नायूंवर ताण येतो. रेस्ट डे मूळे स्नायूंमध्या पेशी बऱ्या होण्यास आणि वाढण्यास अवधी मिळतो. एक दिवस पूर्ण आराम मिळाला की दुसऱ्या दिवसापासून आठवडाभर व्यायाम करण्याची ताकद निर्माण होते म्हणून रोज जसा व्यायाम महत्त्वाचा तसाच आठवड्यातला एक दिवस व्यायामासाठी रेस्ट डेही तितकाच महत्त्वाचा असतो.