Join us  

डोकं ठणकायला लागलं की काही सुचत नाही? ४ सोपी योगासनं, डोकेदुखीपासून आराम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2021 3:51 PM

डोकेदुखीने हैराण आहात? काळजी करु नका, औषधे खाण्यापेक्षा ही योगासने करा...

ठळक मुद्देडोकेदुखी सतावत असेल तर औषधं घेण्यापेक्षा योगासने करा...योगासनं ठरतील डोकेदुखीवरील रामबाण उपाय....

डोकेदुखी ही आरोग्याशी मिगडीत एक मोठी समस्या आहे. अनेकांना डोकेदुखीचा त्रास हैराण करुन सोडतो. कधी अपुरी झोप, कधी अॅसिडीटी, खाण्याच्या वेळांमध्ये होणारे बदल तर कधी मायग्रेन नाहीतर आणखी काही. वेगवेगळ्या कारणांनी मागे लागलेली ही डोकेदुखी एकदा सुरू झाली का काय करावे ते कळत नाही. मग मेडिकलमध्ये जाऊन औषधे घेऊन तात्पुरती ही डोकेदुखी थांबवली जाते. पण काही वेळाने ती पुन्हा डोके वर काढते. मुख्य म्हणजे अशाप्रकारे सतत गोळ्या घेणे आरोग्याच्यादृष्टीने धोक्याचे ठरु शकते. पण अशी काही योगासने आहेत जी केल्याने तुम्हाला डोकेदुखीपासून निश्चित आराम मिळू शकतो. या आसनांमुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल. पाहूयात डोकेदुखी दूर करण्यासाठी उपयुक्त असलेली काही आसने...

(Image : Google)

१. बालासन 

डोके शांत करण्यासाठी हे आसन अतिशय उपयुक्त असते. हे आसन करण्यासाठी वज्रासनात बसा. श्वास घेऊन दोन्ही हात डोक्याच्या वरच्या दिशेला न्या. श्वास सोडून दोन्ही हात जमिनीला टेकवा आणि डोकेही जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हातांची बोटे एकमेकांना टेकवून श्वासोच्छवास सुरू ठेवा. या आसनामुळे तुम्हाला खूप रिलॅक्स वाटेल.

२. सेतूबंधासन 

या आसनामुळे तुमच्या शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते. सुरुवातीला पाठीवर झोपा. पाय गुडघ्यातून मांड्यांजवळ आणा. पाठीचा आणि मांड्यांचा भाग वर उचला आणि डोके, मान आणि खांद्यांवर सगळा भार द्या. दोन्ही हात पाठीखाली जमिनीवर एकमेकांत अडकवा. श्वासोच्छवास नियमितपणे सुरू ठेवा. काही वेळ हे आसन करुन पुन्हा पूर्वस्थितीत या. रक्तप्रवाह सुरळीत झाल्यामुळे डोकेदुखी थांबण्याची शक्यता असते. 

३. पदंगुष्ठासन 

दोन्ही पायांत थोडे अंतर घेऊन सरळ उभे राहा. हळूहळू कंबरेतून पायाच्या दिशेने खाली वाका. दोन्ही हाताने पायाचे अंगठे धरा. हात थोडे मागच्या बाजुला नेऊन टाचा दोन्ही हातांनी धरण्याचा प्रयत्न करा. असे करताना नकळत डोके गुडघ्याला टेकेल. काही वेळ याच पोझमध्ये उभे राहा. डोके खालच्या बाजुला आल्याने डोक्याच्या बाजुचा रक्तप्रवाह वाढण्यास मदत होईल. त्यामुळे डोकेदुखी थांबण्याची शक्यता असते. 

४. पश्चिमोत्तानासन 

जमिनिवर बसून पाय पुढच्या बाजुला पसरुन बसा. श्वास घ्या आणि पुढच्या बाजुला वाका. हाताने पायाचे अंगठे धरण्याचा प्रयत्न करा. अंगठे न्यवस्थित पकडता आले तर डोकेही गुडघ्याला टेकेल. मणक्याला आणि डोक्याच्या दिशेने जाणाऱ्या शिरांना आलेला ताण कमी होण्यास या आसनामुळे मदत होईल.  

 

टॅग्स :आरोग्यहेल्थ टिप्सयोगासने प्रकार व फायदे