डॉ. देविका गद्रे
परवा एका ओळखीच्या काकूंच्या घरी गेले होते. काकू हौशीने शिरा करायला गेल्या. पण वरच्या कपाटातून रव्याचा डबा काढता येईना. खांद्यातून हात वर जाईना. काकू हळू हळू सांगू लागल्या, आजकाल असंच होतं. हात वर जात नाही आणि खांदा खूप दुखतो. डॉक्टरांनी फ्रोझन शोल्डर सांगितलंय. तुमच्या फिजिओथेरपीमध्ये असतात का ग काही उपाय? काकूंना म्हंटलं, स्त्रियांना सगळ्यात जास्त जाणवणारी खांद्याची तक्रार कोणती असं विचारलं तर एकमुखाने फ्रोझन शोल्डर हे उत्तर येईल. फ्रोझन शोल्डर हा त्रास बरा होऊ शकतो असा जरी असला तरी बरं व्हायला लागणारा वेळ मात्र नक्कीच वेळ लागतो. रुग्ण बरा झाला तरी काम करतांना त्याचे चुकीचे स्नायू काम करतात. योग्य त्या स्नायूंचा वापर व्हावा म्हणून योग्य ते व्यायाम शिकणं महत्वाचं आहे आणि यातच फिजिओथेरपी मदत करते.
पण फ्रोझन शोल्डर म्हणजे नक्की काय? आणि तो कशामुळे होतो?
प्रत्येक स्नायूला कॅप्सूल नावाचं एक आवरण असतं. ही कॅप्सूल जर घट्ट झाली वा हाडाला चिकटून राहिली तर फ्रोझन शोल्डरचा त्रास सुरु होतो. याला शास्त्रीय भाषेत अधेसिव्ह कॅप्सुलायटिस किंवा पेरीअर्थराइटिस असेही म्हणतात. ह्याच्या लक्षणांना ३ टप्प्यात विभागता येईल.
१) फ्रिझिंग स्टेज (0- ६ महिने): पहिल्या टप्प्यात सुजेचं प्रमाण जास्त असतं. ज्याला सायनोव्हायटिस असेही म्हणतात. यात रुग्णाला अत्यंत वेदना जाणवतात. विशेषतः रात्री वेदना जास्त असतात.
२) फ्रोझन स्टेज (६ महिने- १२ महिने): दुसऱ्या टप्प्यात रुग्णांच्या हालचाली कमी होतात. सांधा हळू हळू आखडायला लागतो. यात लवचिकता कमी होते.
३) थोइंग स्टेज (१२ महिने- १८ महिने): यात बऱ्याचदा हालचालींमध्ये सुधारणा आढळते. गोष्टी पूर्वपदाला येऊ लागतात. परंतु खांद्याचे स्नायू कमजोर झाल्याने त्यांचं काम आजूबाजूचे स्नायू करू लागतात. रोजच्या जीवनातील कामांवर याचा परिणाम होतो.
वयाच्या चाळीस ते साठ ह्या वर्षांमध्ये फ्रोझन शोल्डर अधिक प्रमाणात आढळतो. हल्लीच्या काही संशोधनातून असं दिसून आलाय की डायबेटीसच्या व थायरॉईडच्या रुग्णांना फ्रोझन शोल्डरचा अधिक धोका असतो. तसेच स्त्रियांमध्ये याचे प्रमाण जास्त दिसून येते.
आधीच्या बायकांना कधी नाही व्हायचा फ्रोझन शोल्डर?
असं नाही. आधीच्या बायकांची कामं वेगळी होती, जीवनपद्धती वेगळी होती. हात वर-खाली करणं सारखं चालू असायचं. आपली कुठे हल्ली वेळ येते वर हात करून हालचाली करायची? त्यामुळे या फ्रोझन शोल्डरचं निदान व्हायला वेळ जातो. दुखणं चालू झालं की मग आपल्या लक्षात येतं आणि मग आपण डॉक्टरकडे पळतो.
पण फ्रोझन शोल्डर ओळखायचा कसा? काय काय लक्षणं असतात? उपचार कोणते?
प्रामुख्याने दोनच लक्षणं असतात. दुखणे आणि सांध्याभोवती असणाऱ्या स्नायूंमद्धे घट्टपणा आणि त्यामुळे हालचाली करताना होणार त्रास.
यावर उपचार आहेत ना. अगदी ऑपरेशन कारण्यापासूनचे सगळे उपाय असतात. पण आपली ती स्टेज आहे की नाही हे डॉक्टर ठरवतात आणि मुळात लगेच काही गाडी ऑपरेशनवर जात नाही. त्याआधी सुद्धा काही पर्याय असतात. हायड्रो डायलटेशन नावाचा एक प्रकार असतो. ज्यात खांद्यात सलाईन आणि वेदनाशामक औषध इंजेक्शनच्या साहाय्याने दिलं जातं. सूज कमी होण्यासाठी व कॅप्सूल मोकळी करण्यासाठी ह्याचा वापर होतो. तसेच योग्य प्रकारचे व्यायाम ज्याने ताकद व लवचिकता वाढेल ह्यासाठी फिजिओथेरपी मदत करते. फिजिओथेरपीच्या व्यायामांनी स्नायुंमधील घट्टपणा कमी होऊन हालचाली सुधारतात. तसेच स्नायूंची ताकद वाढल्यावर दुखणे कमी होण्यासही मदत होते.
१) फ्रोझन शोल्डरची सुरुवात झाल्यावर जेव्हा दुखणं जास्त असतं तेव्हा फिजिओथेरपिस्ट पेंडुलर एक्सरसाईज या प्रकारातील व्यायाम सांगतात. म्हणजेच गुरुत्वाकर्षणाचा वापर करून केले जाणारे व्यायाम. खाली वाकून हाताला खांद्यातून सैल सोडणे व त्याच्या विविध हालचाली करणे असे ह्याचे स्वरूप असते. तसेच स्वतः फिजिओथेरपिस्ट मोबिलाइझेशन करतात. कॅप्सूल घट्ट झाल्यामुळे ज्या हालचाली कमी झालेल्या असतात त्या पूर्ववत होण्यासाठी मोबिलायझेशन मदत करतं. तसेच वेदनाशामक औषधांचाही उपयोग होतो.
२) दुसऱ्या स्टेजमध्ये जेव्हा स्नायूंचा घट्टपणा जास्त असतो त्यावेळी मोबिलायझेशन सोबतच काही व्यायाम पण गरजेचे असतात. खांदयाच्या आजूबाजूचे स्नायू ताकदवान करण्यासाठीचे व्यायाम: खांद्याच्या मागे म्हणजेच पाठीच्या बाजूचे स्नायू आपल्या बऱ्याच हालचालींना मदत करत असतात. म्हणूनच त्याची ताकद वाढवणे गरजेचे आहे. तसेच हात वर करण्यासारख्या हालचालींमद्धे खांद्याच्या पुढच्या बाजूच्या स्नायूंचा वापर होतो. ह्या सर्व स्नायूंचे खांद्याभोवती एक आवरण बनते. ज्याला शोल्डर गर्डल असे म्हणतात. रोटेटर कफ नावाच्या स्नायूंच्या समूहासाठी देखील ताकदीचे व्यायाम गरजेचे आहेत.
३) तिसऱ्या स्टेजमध्ये सुधारणा होत असल्याने यात थेराबॅंडच्या व्यायामांना प्राधान्य दिलं जातं. तसेच स्ट्रेचिंग चे व्यायाम फायदेशीर ठरतात. कॅप्सूलची लवचिकता वाचवण्यासाठी व्यायाम: वेगवेगळ्या स्थितींमद्धे कॅप्सूलला मोकळे करण्यासाठी काही व्यायाम दिले जातात ज्याला कॅप्सुलर स्ट्रेचेस असं म्हणतात. या स्ट्रेचेसना ४ ते ५ वेळा करण्याचा सल्ला दिला जातो व एक स्ट्रेच साधारणतः ३० सेकंद धरून ठेवता येऊ शकतो.
तुम्हाला सुद्धा खांद्याचं दुखणं असल्यास लगेचच डॉक्टरला दाखवा. जितक्या लवकर निदान होईल तितक्या लवकर उपचार मिळून बरं होता येईल हे लक्षात ठेवा!
(लेखिका फिजिओथेरपिस्ट आहेत. फिजिओमंत्र, विलेपार्ले, मुंबई)
devikagadre99@gmail.com
https://www.facebook.com/PhysioMantra-108691731387758/