वर्किंग वुमन असो की घरी असणारी गृहिणी. दोघींनाही त्यांच्या फिटनेससाठी मोठ्या मुश्किलीने वेळ काढावा लागतो. जीमला जायचे ठरविले तरी मग स्वत:चे ऑफिस, नवऱ्याचे ऑफिस, मुलांच्या शाळेची वेळ आणि घरातल्या इतर सदस्यांच्या वेळा सांभाळत जीम गाठावे लागते. पण आता तर कोरोनामुळे शाळा आणि ऑफिस घरीच आल्यामुळे पुन्हा एकदा वेळेचे सगळे नियोजन कोलमडले असून घरातच २४ तास अडकल्यासारखे झाले आहे. 'आपण भले नी आपले घर भले' असा अनेक जणींचा ॲटिट्यूट झाला असून स्वत:चा फिटनेस सांभाळण्यासाठी आता मात्र घराबाहेर पडणे गरजेचे आहे.
घराबाहेर पडणे का आहे गरजेचे?
ऑफिसच्या निमित्ताने जेव्हा वर्किंग वुमन घराबाहेर जात होत्या, तेव्हा घर ते ऑफिस या मार्गात त्यांची बरीच शारिरीक हालचाल व्हायची. ऑफिसमध्ये कामानिमित्त चालणे व्हायचे. ऑफिसमधून घरी येताना कुणाकडे तरी जाणे, खरेदी करणे अशा काही गोष्टी व्हायच्या आणि त्यामुळेही चालण्याचा व्यायाम नकळत होऊन जायचा.
कंटाळा घालविण्यासाठी या ५ गोष्टी करून बघा
१. तुम्हाला आवडणारा व्यायाम प्रकार शोधा
प्रत्येकाला वेगवेगळा व्यायाम प्रकार आवडत असतो. कुणाला वॉकिंग आवडते तर कुणाला जीममध्ये जाऊन हेवी एक्सरसाईज घेणे पसंत असते. यापैकी तुम्हाला काय आवडते ते ठरवा आणि सुरूवातीचे काही दिवस फक्त चार्ज होण्यासाठी तुमचा आवडीचाच व्यायाम करा. जीममध्येदेखील सुरूवातीचे काही दिवस तुम्हाला जे आवडते तेवढेच करा. कारण आवडीच्या गोष्टी असतील तर निश्चितच आपण वेळ काढतो.
२. हलक्याफुलक्या व्यायामापासून सुरूवात करा
एकदा जीमला जायचे ठरवले की आपण मोठ्या निश्चयाने उठतो, जीम गाठतो आणि खूप व्यायाम करून खूप थकून जातो. मग दुसऱ्या दिवशी पुन्हा जीमला जाण्याचा कंटाळा येतो. असे अनेकांच्या बाबतीत होते. पण असे करणे चुकीचे आहे. एकाच दिवशी खूप वर्कआऊट करून पुन्हा मोठा ब्रेक घेण्यापेक्षा रोज कमी का असेना पण सातत्यपुर्ण व्यायाम करा. हळूहळू व्यायाम वाढवत न्या. जेणेकरून जीमला जाण्याचा कंटाळा येणारच नाही.
३. कोण काय म्हणेल हा विचार सोडा
एवढ्या मोठ्या ब्रेकनंतर आपण जीमला गेलो तर तिथले आपले ट्रेनर काय म्हणतील, आपल्या सोबत तिथे येणाऱ्या मैत्रिणी आपल्याला चिडवतील का, अशा गमतीदार कारणांमुळेही अनेक जणी जीमला जायला नको म्हणतात. आज जाऊ, उद्या जाऊ असे म्हणत त्यांची चालढकल सुरू असते. पण असा समज करून घेण्याचे काहीच कारण नाही. ट्रेनर काय किंवा जीमला येणारे इतर लोक काय, त्यांना कुणालाही तुमच्याशी काहीही देणेघेणे नसते. त्यामुळे तुम्हीही तसाच ॲटीट्यूट ठेवा आणि कुणाचीही भिती किंवा कॉम्प्लेक्स न बाळगता बिनधास्त वर्कआऊटला सुरूवात करा.
४. फिटनेस मोटीव्हेटर काय म्हणतात...
फिटनेसविषयी उत्तम मोटीव्हेट करणारे अनेक व्हिडियोज आपल्याकडे उपलब्ध होऊ शकतात. मनातली मरगळ झटकून टाकण्यासाठी आणि पुन्हा एकदा आपली पाऊले जीमकडे वळविण्यासाठी फिटनेसविषयी प्रेरणादायी बोलणाऱ्या वक्त्यांचे विचार ऐका. त्यामुळेही आपल्याला प्रेरणा मिळू शकते.
५. कपडे आणि बूटांची खरेदी करा
गमतीशीर वाटत असले तरी असे केल्याने आपल्याला जीमला जाण्याची किंवा व्यायाम करण्याची इच्छा हाेते. जीमला जाण्यासाठी मस्त एखादा ट्रॅक सूट, शूज खरेदी करा. नवे कपडे, नव्या एक्सेसरीज पाहूनही नक्कीच जीमला जावेसे वाटेल.