डॉ. देविका गद्रे
पायावरच्या नसांना औषध काय, काळ्या निळ्या शिरांचं म्हणणं तरी काय?
या वाक्यावरुनच आजचा विषय सहज ओळखता येईल. हो, व्हेरिकोज व्हेन्स. अनेकांच्या सुंदर पायाचं रूप घालवणाऱ्या या varicose veins आजाराबद्दल आज थोडक्यात माहिती घेऊ.
व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे काय?
हा शरीराच्या रक्ताभिसरण क्रियेमधल्या अडथळ्यामुळे होणारा आजार आहे. रक्ताभिसरणात २ मुख्य क्रिया असतात. हृदयाने शुद्ध केलेले रक्त म्हणजे ऑक्सिजनयुक्त रक्त शरीरात सर्वत्र पाठवणे व शरीरातील अशुद्ध रक्त हृदयाकडे पाठवणे. शुद्ध रक्त शरीरात पोचवण्यासाठी आर्टरी नावाच्या शिरा असतात तर अशुद्ध रक्त वाहून नेण्यासाठी व्हेन्स असतात. पायाकडून अशुद्ध रक्त गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने हृदयाकडे पोचवावे लागते म्हणून व्हेन्समध्ये विशिष्ट प्रकारच्या झडपा असतात ज्याला व्हॉल्व म्हणतात. या झडपांमुळे रक्त उलटे मागे न येता हृदयाकडे वाहून नेले जाते. जर या झडपांचे कार्य नीट झाले नाही तर साहजिकच पायांवर वाईट प्रभाव होतो. रक्त साठण्याची सुरुवात झाल्यामुळे हळूहळू व्हेरिकोज व्हेन्सची लक्षणे दिसू लागतात.
हा आजार साधारणतः स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. उभं राहून काम करणारी लोकं जसं की शिक्षक, ट्रॅफिक पोलीस, नर्स इत्यादींमध्ये व्हेरिकोज व्हेन्सचा धोका अधिक असतो.
(छायाचित्र-गुगल)
व्हेरिकोज व्हेन्स मध्ये दिसणारी लक्षणे..
१) अशुद्ध रक्त साठल्याने शिरा फुगीर होणे.
२) काळ्या निळ्या नसा दिसणे.
३) पायाला जडत्व येणे.
४) पायात चमक भरणे.
५) मुंग्या येणे.
६) पायात असह्य वेदना होणे.
७) पोटऱ्या दुखणे.
८) घोट्याला व पायाला सूज येणे व काळवंडणे.
९) कधीकधी शिरांमधून रक्तस्रावही होतो.
१०) गंभीर त्रासामध्ये जखम होऊन अल्सर निर्माण होतात.
वेळीच उपचार न घेतल्यास गंभीर स्वरूपाचे आजार होऊ शकतात.
१) एक्झिमा वा डरमॅटिटिस: त्वचेला सतत खाज येणे व त्यामुळे जखम होणे.
२) लिपोडरमॅटोस्क्लेरॉसिस: त्वचा अत्यंत कडक व कोरडी बनते.
३) थ्रोम्बोफ्लेबायटिस: सुजलेल्या रक्तवाहिन्यांमद्धे रक्ताच्या गाठी बनणे.
(छायाचित्र-गुगल)
व्हेरिकोज व्हेन्स होण्यामागे कोणती करणे असतात?
१. तत उभे राहणे, काही प्रमाणात अनुवंशिकता, लठ्ठपणा, काही वेळा गरोदरपणात हा त्रास उद्भवतो.
२.सातत्याने धूम्रपान करणे, व्यायामाचा अभाव, उंच टाचांच्या चपलांचा वापर
या आजाराचे निदान कसे होते?
सर्वप्रथम रुग्णाची लक्षणे बघितली जातात. त्या अनुषंगाने त्याचा इतिहास विचारला जातो म्हणजेच कधीपासून हा त्रास होत आहे, काय काम करता वा दिवसभरात साधारण किती वेळ उभे राहता इत्यादी. ह्या सगळ्याच्या आधारे कलर डॉप्लर टेस्ट करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. ह्यात छोट्या छोट्या रक्तवाहिन्या
सुद्धा दिसून येतात व त्यावरून या आजाराचे निदान केले जाते.
(छायाचित्र-गुगल)
उपचार काय असतात?
१) कॉम्प्रेशन स्टोकिंग्स: हे एक प्रकारचे मोजे असतात. पायाच्या घोट्यापासून ते मांडीपर्यंत जाणाऱ्या या मोज्यांमुळे पायाची सूज व वेदना कमी होण्यास मदत होते. कोणत्याही नेहमीच्या वैद्यकीय दुकानांमद्धे हे उपलब्ध असतात. ह्याच्या दिवसभर केलेल्या वापरामुळे पायास एक प्रकारचा आधार मिळतो व क्रिया सुखकर होतात.
२) लेझर थेरपी: अत्याधुनिक लेझर किरणांच्या साहाय्याने व्हेरिकोज व्हेन्सवर नियंत्रण मिळवणे आता शक्य झाले आहे. ह्यामद्धे फक्त एक छिद्र वापरून व्हेरीकोज व्हेन्स पासून मुक्तता मिळवता येते.
३) शस्त्रक्रिया: हा आजार हाताबाहेर गेल्यास डॉक्टर शस्त्रक्रियेचा सल्ला देतात. ह्यात व्हेन्सचा खराब झालेला भाग काढून टाकला जातो व रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते. तसेच काही इंजेकशन्सचा वापर करून दुखणे कमी करता येते. मोठ्या नसांसाठी स्क्लेरोथेरपी व लहान नसांसाठी मायक्रोस्क्लेरोथेरपीचा वापर केला जातो.
फिजिओथेरपीमधील उपचार कोणते?
योग्य व्यायाम व फिजिओथेरपी तुम्हाला नक्कीच मदत करू शकते. काही व्यायाम येथे खाली देत आहे.
१) पाठीवर झोपा. एक पाय गुढघ्यात दुमडून घ्या. दुसरा पाय सरळ रेषेत वर आणा. मात्र पाय वर आणताना घोट्यातून पाय तुमच्यकडे खेचून घ्या म्हणजे पायाचा पंजा वर येईल. हा व्यायाम १० वेळा एका पायाने व १० वेळा दुसऱ्या पायाने करा.
२) पाठीवर झोपून दोन्ही पाय गुढघ्यात दुमडा. हळू हळू दोन्ही पाय वर उचलून सायकल चालवतो तसा प्रयत्न करा. सुलटे १० वेळा व उलटे १० वेळा असा हा व्यायाम करावा.
३) उभे राहून पायांच्या टाचा वर खाली करणे. १० वेळा हा व्यायाम करावा.
४) उभे राहून दोन्ही पाय गुढघ्यातून वाकवणे व सरळ करणे. मात्र हे करताना गुढघे पायांच्या बोटांच्या पुढे जाऊ देऊ नका. हा व्यायाम सुद्धा १० वेळा करता येईल.
हे सर्व व्यायाम प्रत्येक व्यक्तीसाठी योग्य ठरतील असे नाही. प्रत्येक रुग्णाच्या स्थितीप्रमाणे व आजाराच्या अनुषंगाने फिजिओथेरपिस्ट व्यायाम सुचवत असतात. त्यामुळे कोणतेही व्यायाम करण्याआधी फिजिओथेरपीस्टचा सल्ला घेतलेला चांगला.
(छायाचित्र-गुगल)
व्हेरिकोज व्हेन्स असल्यास कोणती काळजी घ्यावी?
वजन नियंत्रणात ठेवा, योग्य व्यायाम करा, स्ट्रेचिंग साठी योगासने करा, उंच टाचांच्या चपला वापरू नका, झोपताना पायाखाली उशी ठेवा त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत राहतो, जास्त वेळ उभे राहणे टाळा, व्यसनांपासून दूर राहा, एका ठिकाणी जास्त वेळ बसणे टाळा.
व्हेरिकोज व्हेन्स हा काही असाध्य आजार नाही. विज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे अशा आजारांवर उपचार शक्य आहेत. गरज असते ती वेळेत सतर्क होण्याची. छोटी गोष्ट समजून या नसांकडे दुर्लक्ष करू नका. त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्या व व्हेरिकोज व्हेन्सना वेळेत रोखा.
(लेखिका फिजिओथेरपिस्ट आहेत. फिजिओमंत्र, विलेपार्ले, मुंबई)
devikagadre99@gmail.com
https://www.facebook.com/PhysioMantra-108691731387758/