Join us  

रात्री जेवण झाल्यावर चालायला जावं का? रिकाम्या पोटी चालण्याचा व्यायाम बरा की..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 6:14 PM

चालण्याच्या व्यायामाबद्दल नुकताच झालेला एक अभ्यास सांगतो की जर वजन कमी करायचं असेल तर रात्री जेणानंतर अवश्य चालावं. यामुळे केवळ वजनच कमी होतं असं नाही तर आरोग्यास इतरही प्रकारे त्याचा फायदा होतो.

ठळक मुद्देरात्री जेवल्यानंतर चालण्यामुळे आपल्या शरीरातला प्रत्येक भाग आणि स्नायू व्यवस्थित काम करतात.रोज रात्री जेवल्यानंतर किमान 15-20 मिनिटं चाललं तरी स्थूल होण्याचा धोका टळतो.नैराश्याचा आजार असल्यास रात्री जेवल्यानंतर चालणं या आजारची तीव्रता कमी करण्यास फायदेशीर ठरतं.

चालण्याचा व्यायाम हा उत्तम व्यायाम मानला जातो. शिवाय सर्व प्रकारच्या व्यायामा त कोणालाही सहज करता येणारा हा व्यायाम . पायातल्या शुजव्यतिरिक्त इतर कुठल्याही साधनाची या व्यायामाला आवश्यकता नसते. चालण्याचा व्यायाम कधी करता,किती वेळ करता, कसा करता यावर त्याचे शरीरावर होणारे परिणाम अवलंबून असतात.

चालण्याच्या व्यायामाबद्दल नुकताच झालेला एक अभ्यास सांगतो की जर वजन कमी करायचं असेल तर रात्री जेणानंतर अवश्य चालावं. यामुळे केवळ वजनच कमी होतं असं नाही तर आरोग्यास इतरही प्रकारे त्याचा फायदा होतो. अभ्यासक आणि डॉक्टर सांगतात की रात्री जेवल्यानंतर चालण्यामुळे आपल्या शरीरातला प्रत्येक भाग आणि स्नायू व्यवस्थित काम करतात. शरीरात रक्तप्रवाह सुरळीत राहातो. टाइप 2 मधुमेहाच्या बाबतीत तर रात्री जेवल्यानंतर फिरणं फारच परिणामकारक आणि लाभदायक मानलं जातं.

छायाचित्र- गुगल

किती वेळ चालावं?

डॉक्टर सांगतात की, रोज रात्री जेवल्यानंतर 15-20 मिनिटं चाललं पाहिजे. जर वेळेची काही अडचण नसेल तर जास्त वेळ चालावं. पण एक आहे जेवण झाल्यानंतर एक तासाच्या आत चालायला जायला हवं , तरच त्याचा फायदा होतो.

रात्री जेवल्यानंतर चालल्यास..

1. रात्री जेवल्यानंतर चालल्यास आपलं पचन तंत्र सुधारतं. शरीरावरची सूज कमी होते. बध्दकोष्ठता होत नाही. शिवाय पोटाशी संबंधित इतर समस्यांवर रात्री जेवल्यानंतर चालणं फायदेशीर ठरतं.

2. रोज रात्री जेवल्यानंतर किमान 15-20 मिनिटं चाललं तरी स्थूल होण्याचा धोका टळतो. कारण चालण्यामुळे चयापचय क्रिया सुधारते. वजन कमी होण्यासाठी किंवा वजन वाढू नये यासाठी आपली चयापचय क्रिया उत्तम असणं आवश्यक आहे.

3. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी रात्री जेवल्यानंतर चालण्याचा फायदा होतो. रात्री जेवल्यानंतरचं चालणं आपल्या रोगप्रतिकार व्यवस्थेतून विषारी घटक बाहेर पडतात. आपल्या शरीराची आतील व्यवस्था नीट काम करण्यासाठी रात्री जेवल्यानंतर चालायला जायला हवं.

छायाचित्र- गुगल

4. आरोग्य तज्ज्ञ सांगतात की, जेवल्यानंतर काही वेळानं आपल्या शरीरात रक्तातील साखरेचं प्रमाण वाढायला लागतं. जेव्हा आपण रात्री जेवल्यानंतर चालायला जातो तेव्हा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहाते. यामुळे हायपरग्लेसेमिया हा रक्तातील साखरेसंबंधीच्या आजाराचा धोका टळतो.

5. रात्री जेवल्यानंतर चालण्यामुळे आपल्या शरीरात एंडोर्फिन नावाचं हार्मोन स्त्रवतं. हे हार्मोन मनावरचा ताण घालवतो. त्यामुळे मन आनंदित होतं आणि शांत होतं. तसेच नैराश्याचा आजार असल्यास रात्री जेवल्यानंतर चालणं या आजारची तीव्रता कमी करण्यास फायदेशीर ठरतं.