दीर्घायुष्यासाठी हेल्दी लाईफस्टाईल असणं फार महत्वाचं असतं. खाण्यापिण्याच्या सवयींचा परिणाम आयुष्यावर होत असतो. महिलांचं अनेकदा आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. व्यायामासाठी व्यवस्थित वेळ देता येत नाही. अशावेळी नुकताच समोर आलेला रिसर्च महिलांसाठी फायदेशीर ठरू शकतो. नव्या संशोधनानुसार रोज ७००० पाऊलं चालल्यानं मृत्यूचा धोका ५० ते ७० टक्क्यांनी कमी होतो. हा अभ्यास जामा नेटवर्क ओपन जर्नलमध्य प्रकाशित करण्यात आला आहे.
फिजिकल एक्टिव्हिटी एपिडेमायोलॉजिस्ट आणि या अभ्यासाचे प्रमुख लेखक अमांडा पलुच यांनी सांगितले की, '' १० हजार पाऊलांपेक्षा जास्त चालल्यानं किंवा वेगानं चालल्यानं जास्तीचे फायदे मिळत असल्याचं आढळून आलेलं नाही. १० हजार मीटर चालणं जापानी पेडोमीटरसाठी जवळपास एक दशक जुना मार्केटिंग कॅपेनचा भाग होता.''
या संशोधनासाठी तज्ज्ञांनी कोरोनरी आर्टरी रिस्क डेव्हलपमेंट इन यंग एडल्ड (CARDIA) या संशोधनातून माहिती घेतली. १९८५ मध्ये हा अभ्यास सुरू झाला होता. ३८ ते ५० वर्ष वयोगटातील २ हजार १०० स्वयंसेवकांना २००६ मध्ये एक्सीलेरोमीटर वापरण्यास सांगितले त्यांचे जवळपास ११ वर्षांपर्यंत निरिक्षण करण्यात आले.
२०२०-२१ च्या माहितीचे विश्लेषण करण्यात आले. यात सहभागी असलेल्या वॉलेंटिअर्सना तीन वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये विभागण्यात आले. पहिला लो स्टेप वॉल्यूम ( रोज ७००० पाऊलांपेक्षा कमी चालणं) दुसरी स्टेप (७००० ते ९००० पाऊलं चालणं) तिसरी स्टेप (१० हजारांपेक्षा जास्त पाऊलं चालणं.) या अभ्यासाच्या आधारे तज्ज्ञांनी सांगितलं की, रोज ७००० ते ९००० पाऊलं चालत असलेल्या स्वयंसेवकांच्या तब्येतीवर चांगला परिणाम झाला. पण प्रतिदिवशी १० हजारापेक्षा जास्त पाऊलं चालत असलेल्यांच्या शरीरावर फारसा परिणाम झाला नाही. रोज ७००० पेक्षा जास्त पाऊलं चालत असलेल्यांमध्ये मृत्यूचा धोका ५० ते ७० टक्क्यांनी कमी होतो.
जेवण झाल्यावर किती चालायचं?
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, रोज रात्री जेवल्यानंतर 15-20 मिनिटं चाललं पाहिजे. जर वेळेची काही अडचण नसेल तर जास्त वेळ चालावं. पण एक आहे जेवण झाल्यानंतर एक तासाच्या आत चालायला जायला हवं , तरच त्याचा फायदा होतो.
सकाळी चालण्याचे फायदे
जेव्हा आपली नीट झोप झालेली असते तेव्हा शरीराचं तापमान वाढलेलं असतं. म्हणूनच सकाळी उठल्यानंतर चालायला गेल्यास शरीरातील विषारी पदार्थ सहजपणे बाहेर टाकले जातात. सकाळी चालण्यामुळे शरीराचं शुध्दीकरण होतं. तसेच आपल्या फुप्फुसांना शुध्द हवा आणि ऑक्सिजन मिळतो. ही हवा आणि ऑक्सिजन आपल्या फुप्फुसांसोबतच मेंदूचं आरोग्यही चांगलं राखण्यास मदत करतं. आयुर्वेद आणि विज्ञान या दोन्हींच्या मते चांगल्या आरोग्यासाठी सकाळी चालण्याला पर्याय नाही.
अनेक अभ्यासाचे निष्कर्ष सांगतात की सकाळच्या चालण्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. पोटाचं आरोग्य चांगलं राहातं. भूक चांगली लागते. आपण जो आहार घेतो तो अंगी लागतो. पचनक्रिया सुधारल्याने शरीराला आहारातून पोषक घटक मिळतात त्याचा परिणाम म्हणजे रोगप्रतिकार शक्ती वाढते.
चालण्याआधी हे लक्षात ठेवा
वॉर्म अप केल्याशिवाय मुख्य व्यायाम सुरु करायचा नाही. आता मुळात चालण्याइतक्या सोप्या व्यायामप्रकारात अजून वॉर्म अप काय करणार असं सहज वाटू शकतं. कारण आपण इतर व्यायामासाठी वॉर्म अप म्हणून चालतो. मग चालण्यासाठी काय वॉर्म अप करायचा तर सुरुवातीची ३ ते पाच मिनिटं कमी वेगाने चालायचं.
मुख्य व्यायाम संपल्यावर कूलिंग डाऊन व्यायाम करायचा. म्हणजे पुन्हा एकदा शेवटची एखाद दोन मिनिटं कमी वेगाने चालायचं. वेगात चालणं थांबवून हुश्श करून पटकन खुर्चीत बसायचं नाही.
व्यायाम हा व्यायाम केल्यासारखा करायचा. हळूहळू, निवांत, गप्पा मारत चालून व्यायाम होत नाही. व्यायाम करतांना आपल्या हृदयाची गती वाढली पाहिजे आणि आपल्याला घाम आला पाहिजे. हे अर्थातच पहिल्या दिवसापासून होणार नाही. पण आपला प्रवास त्या दिशेने झाला पाहिजे.