Lokmat Sakhi >Fitness > चालायला जाणं हा उत्तम व्यायाम हे मान्य, पण चालायला जायचा 'कंटाळा' येतो, त्याचं काय करायचं?

चालायला जाणं हा उत्तम व्यायाम हे मान्य, पण चालायला जायचा 'कंटाळा' येतो, त्याचं काय करायचं?

आपण चालण्याचा व्यायाम सुरु करण्यापूर्वी हे लक्षात घेतलं पाहिजे की हा व्यायाम काही काळाने कंटाळवाणा होऊ शकतो आणि त्याप्रमाणे आपली व्यूहरचना केली पाहिजे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 03:39 PM2021-03-20T15:39:52+5:302021-03-20T15:47:22+5:30

आपण चालण्याचा व्यायाम सुरु करण्यापूर्वी हे लक्षात घेतलं पाहिजे की हा व्यायाम काही काळाने कंटाळवाणा होऊ शकतो आणि त्याप्रमाणे आपली व्यूहरचना केली पाहिजे.

walking is a best exersice but it's boring, how to get away from walking board? | चालायला जाणं हा उत्तम व्यायाम हे मान्य, पण चालायला जायचा 'कंटाळा' येतो, त्याचं काय करायचं?

चालायला जाणं हा उत्तम व्यायाम हे मान्य, पण चालायला जायचा 'कंटाळा' येतो, त्याचं काय करायचं?

Highlightsकंटाळ्याचा कंटाळा येईतो चालत राहणं एवढंच हातात असतं.

गौरी पटवर्धन

चालणे हाच व्यायाम करायचा असं आपण ठरवतो, उत्साहाने पहाटे उठून फिरायला जातो. चाळीस मिनिटं चालणार म्हणजे चालणारच असं म्हणतो. तसं जातोही आठ-दहा दिवस आणि काहीच दिवसात त्यात एक अडचण यायला लागते. भयंकर गंभीर पेच. ती अडचण अशी की तिचा आपल्याला रागही येतो. मग स्वत:चाही राग येतो पण ही अडचण कशी सोडवावी हे आपल्याला अजिबात लक्षात येत नाही. आपण कशीही सोडवायला गेलो तरी ती अडचण  सहजासहजी सुटत नाही. कोणाला विचारावं तर त्यांनाही तीच अडचण दर काही दिवसांनी येत असते. आणि ती अडचण अशी असते ती जर वेळेवर सोडवली नाही, तर आपला व्यायाम त्यामुळे थेट बंद होऊ शकतो.

काय असेल ही अडचण?


तर कंटाळा…
भयंकर कंटाळा…
रोज आपणच ठरवलेल्या व्यायामाच्या वेळी आपल्यालाच व्यायाम बुडवण्यासाठी वेगवेगळी कारणं सुचवणारा कंटाळा…
आपले सगळे संकल्प आणि फिटनेसची स्वप्नं धुळीस मिळवणारा कंटाळा…
कंटाळा कुठल्याही व्यायामाचा येऊ शकतो, पण चालण्याचा कंटाळा फार लवकर आणि फार जास्त येतो. कारण त्या व्यायामाचं स्वरूप तसं खरं म्हणजे कंटाळवाणंच आहे. रोज त्याच वेळी उठायचं, तेच बूट घालायचे आणि त्याच त्याच रस्त्यावरून तीच झाडं, त्याच दुकानांच्या पाट्या बघत, त्याच रहदारीतून वाट काढत काढत चालून यायचं. बरं, या कंटाळ्याचा रामबाण उतारासुद्धा चालणाऱ्यांकडे नसतो.
म्हणजे असं, की आपण चालण्याचा व्यायाम सुरु केला आणि भराभर वजन उतरायला लागलं, किंवा जुने ड्रेसेस छान व्हायला लागले तर आपला उत्साह टिकून राहण्याची शक्यता वाढते. त्या कमी होणाऱ्या वजनाकडे किंवा कमरेच्या इंचांकडे बघून आपण त्या कंटाळ्याशी दोन हात करू शकतो. पण चालण्याच्या व्यायामाने इतक्या पटकन काहीच रिझल्ट्स दिसत नाहीत. आणि मग हळूहळू हा कंटाळा दबा धरून बसतो आणि एक दिवस डाव साधून आपल्या व्यायामाची शिकार करतो.
कितीही दिवस आपण निग्रहाने चालायला गेलो, तरी एखादा दिवस असा येतोच की त्या दिवशी घरात फार काम असतं, आपले पाय दुखत असतात, सकाळपासून दोन वेळा कामासाठी बाजारात जाऊन झालेलं असतं, आणि मग आपल्याला असं वाटतं, की एखादा दिवस नाही चालायला गेलं, तर काय होणार आहे? उद्या जाऊ…
आणि मग तो उद्या येण्याच्या शक्यता कमी कमी होत जातात. कारण उद्या दुसरं काहीतरी सापडतं. त्याच्या उद्याच्या दिवशी अजून काहीतरी...
हे व्हायला नको असेल, तर आपण चालण्याचा व्यायाम सुरु करण्यापूर्वी हे लक्षात घेतलं पाहिजे की हा व्यायाम काही काळाने कंटाळवाणा होऊ शकतो आणि त्याप्रमाणे आपली व्यूहरचना केली पाहिजे. आपल्याला कंटाळा येऊच नये, आणि आलाच तरी तो व्यायामापेक्षा मोठा होऊ नये याची सोय आधीच करून ठेवली पाहिजे. त्यासाठी आपण आपला स्वभाव आणि आजूबाजूची परिस्थिती यानुसार काही उपाय करू शकतो.

तर का उपाय..


१. पहिला उपाय म्हणजे रोज वेगवेगळ्या ठिकाणी चालायला जाणं.
२. दुसरा उपाय म्हणजे वेगवेगळ्या वेळी चालायला जाणं. 
३. तिसरा उपाय म्हणजे व्यायामाला साथीदार शोधणं. एकीला कंटाळा आला तर दुसरी तिला निग्रहाने व्यायामाला घेऊन जाऊ शकली पाहिजे.
४. चौथा उपाय म्हणजे गाणी किंवा ऑडिओबुक्स किंवा रेडिओ ऐकणं. पण रस्त्यावर चालतांना हेडफोन्सचा आवाज रहदारीच्या आवाजापेक्षा कमी ठेवला पाहिजे.
या कंटाळ्याचा कंटाळा येईतो चालत राहणं एवढंच हातात असतं.

Web Title: walking is a best exersice but it's boring, how to get away from walking board?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.